"ज्यांच्याकडे अजेंडा आणि झेंडा दोन्ही नाही त्यांनी काँग्रेसची दुरावस्था केली!"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला
07-Apr-2024
Total Views | 95
नागपूर : महाविकास आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांनी ज्यांच्याकडे अजेंडा आणि झेंडा दोन्ही नाही त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाची काय परिस्थिती केली याचा काँग्रेसने विचार करावा, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला आहे. त्यांनी रविवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आदित्य ठाकरेंना दुसरं काही काम आहे का? निवडणूक काळात पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका होत असतात. आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवत आहोत. हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अगदी तळागाळात काम करत असतात. फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते काम आम्ही करत आहोत."
"मंत्री आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सगळे तळागळात काम करणारे लोकं आहोत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्यापेक्षा स्वत:चं काय जळतंय ते पाहावं. महाविकास आघाडीत तीन तिगाडा आणि काम बिगाडा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन प्रादेशिक पक्ष ज्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही त्यांनी राष्ट्रीय पक्षाची काय परिस्थिती केली आहे, याचा विचार काँग्रेसने करावा," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "विदर्भात महायुतीचे अतिशय चांगले वातावरण आहे. विदर्भातील सर्व जागा महायूती जिंकेल असं वातावरण आहे. रामटेक आणि यवतमाळ-वाशिम हे दोन्ही मतदारसंघ महायूती मोठ्या फरकाने बहुमताने जिंकेल. येत्या दोन-तीन दिवसांत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारीच्या जागावाटपाचा निर्णय होईल," असेही त्यांनी सांगितले.