मुंबई : 'ऍड फीज' निर्मित आणि 'सक्षम आपल्या मानसिक आरोग्यासाठी' तसेच 'साई निर्णय' प्रायोजित 'चैत्र चाहूल' या गुढीपाडवा विशेष कार्यक्रमाचे आयोजन दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह शिवाजी पार्क येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 9 एप्रिल रोजी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता भाषा अभ्यासक राजीव नाईक यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होईल. यावेळी एकांकिका लोककलेच्या कार्यक्रम तसेच त्या सन्मानाचे वितरण करण्यात येईल. सदर कार्यक्रमाचे संकल्पना विनोद पवार यांची असून संहिता अरुण जोशी यांची आहे. कला गोपी कुकडे, चित्र समीर अनारकर, नेपथ्य अजित दांडेकर, प्रकाशयोजना शितल तळपदे आणि ध्वनी विराज भोसले. तसेच निर्मिती आणि संयोजन महेंद्र पवार करणार आहेत.
रेवन एंटरटेनमेंट निर्मित यावर्षी सवयी प्रेक्षक पसंती ठरलेली एकांकिका हॅलो इन्स्पेक्टर सादर होईल. त्यानंतर रामानंद कल्याण जालना प्रस्तुत लोककलेची अस्सल मेजवानी असलेली महाराष्ट्राची लोकगाणी शाहीर रामानंद उगले आणि सहकलाकार प्रस्तुत करतील. त्यानंतर ध्यासन्मानाचे वितरण करण्यात येईल. यावर्षी लेखक दिग्दर्शक अभिनेते निर्माते अतुल पेठे तसेच लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना ध्यास सन्मान प्राप्त झाला आहे.
'चैत्र चाहूल'तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 'ध्यास सन्मान' या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात वादक, गायक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेले जेष्ठ लोक कलावंत मनोहर गोलांबरे यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
'चैत्र चाहूल'तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष 'ध्यास सन्माना'चे यंदाचे १७ वे वर्षे आहे. या सन्मानाचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रूपये पंचवीस हजार असे असून येत्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला मराठी नववर्ष दिनी होणाऱ्या या सोहळ्यात जेष्ठ भाषा अभ्यासक राजीव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजक विनोद पवार व महेंद्र पवार यांनी सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : महेंद्र पवार - 98692 87870