कल्याणमध्ये उमेदवारीवरून स्थानिक भूमीपुत्राचा वाद उफाळला!
दरेकरांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटात राजीनामा सत्र?
05-Apr-2024
Total Views | 220
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून उबाठा गटाने आपला उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. उबाठाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन आपल्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. उबाठा ने स्थानिक उमेदवार दिला असला तरी तो भूमीपूत्र नाही. स्थानिक भूमीपुत्राला प्राधान्य देण्यात यावे असे आशयाचे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, आता आगामी निवडणुकी आधीच उबाठा गटात ही भूमीपुत्र या मुद्द्यावरून वाद उफाळला असताना सोशल मिडियावरील पोस्ट पाहता दरेकरांपुढील अडचणी वाढताना दिसत आहे. उबाठातील पदाधिकाऱ्यांनी या नाराजीतून राजीनामा देण्याचा पावित्रा घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
उबाठा गटाने दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवार कोण असेल याविषयी घोषणा केली. उबाठातून केदार दिघे, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे अशी नावे चर्चेत होती. सर्व नावे बाजूला सारून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकीकडे माजी आमदार सुभाष भोईर यांचे सर्मथक तर दुसऱ्या बाजूला उबाठा मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले.
ठाकरे गटाने निवडणूकीच्या रिंगणात आणलेला हा पत्ता खरा आहे की खोटा याबाबत देखील चर्चा रंगल्या आहेत. उमेदवारी देण्यावरून वेगवेगळ्य़ा चर्चा रंगल्या असल्या तरी मतदारांच्या मनात मात्र स्थानिक भूमीपूत्रच असल्याचे सोशल मिडीयावर फिरणाऱ्या मेसेजने सिध्द होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मनातील उमेदवार हा उच्च विद्याविभूषित, हिंदू धर्म आणि देशाला मानणारा, गोरगरीबांच्या हाकेला धावून जाणारा, ठाण्यासह कोकण परिसरातील संपूर्ण भारतातील समस्यांची जाण असणारा, प्रदूषण, पर्यावरण, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, सांडपाणी, स्वयंरोजगार, ग्रामविकास इत्यादी समस्यांवर कार्य करणारा, स्थानिक समस्येला प्राधान्य देणारा असावा अशी अपेक्षा आहे.