मुंबई : अयोध्येनंतर आता कोट्यवधी हिंदूंना काशी आणि मथुरेच्या मुक्तीची आस लागलेली आहे. मागील शेकडो वर्षात अनेक वेळा सामान्य हिंदूंनी या तीर्थस्थळांच्या मुक्तीसाठी हसत हसत आपल्या प्राणाच्या आहुत्या या लढ्यांमध्ये अर्पण केलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीव काशीविश्वेश्वराच्या मंदिराबाबत नेमके गूढ काय याची उकल करणारे विक्रम संपत लिखित पुस्तक प्रकाशित झालेआहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होते आहे. या पुस्तकाची प्रकाशन पूर्व नोंदणी अमेझॉन अँपवर सुरु झालेली आहे तर १५ मेपासून पुस्तकाचे वितरण सुरु होईल. 'प्रतीक्षा शिवाची:- सामान्य हिंदूंच्या प्रेरणादायी चिवट लढ्याचा आणि हिंदू नेत्यांच्या संतापजनक शिवद्रोहाचा दुःखदायक इतिहास!' असे पुस्तकाचे नाव आहे तर डॉ. प्राची जांभेकर आणि मैत्रेयी जोशी यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
शिछत्रपतींपासून ते सदाशिव भाऊ पेशवा, बाळाजी बाजीराव पेशवा, मराठे शाहीतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी वेळोवेळी या पवित्र स्थळांना हिंदूंच्या ताब्यात द्या म्हणून त्या त्या भागातील तत्कालीन मुस्लिम शासकांना पत्रे लिहिलेली आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी प्रत्यक्ष ज्ञानवापी मुक्त करता आली नाही तरी बाजूच्या भग्न मंदिरांचा जिर्णोद्धार करून त्याला गतवैभव परत आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. अशा अनेक मुद्द्यांना धरून या पुस्तकाचे लेखन झालेले आहे.
हे पुस्तक वाचताना आपल्या पूर्वजांनी दिलेलं बलिदान, केलेले संघर्ष, उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम हिंदूंच्या मनात काशी बद्दल किती उत्कट भावना होत्या हे वाचताना आपला ऊर भरून येतो आणि त्याचवेळी स्वातंत्र्यलढ्यात काही भूमिका बजावली म्हणून मान मिळालेला हिंदू नेत्यांच्या संतापजनक शिवद्रोहाची कहाणी वाचून आपल्या आतून संतापाचा स्फोट होतो! दुसऱ्या बाजूने अयोध्येच्या मंदिराचा जिर्णोद्धार झालेला बघून आणि दशकानुदशके दाबलेल्या ऐतिहासिक सत्याला आताच्या नव्या माध्यमांमुळे "सत्याचा प्रकाश" दिसला याचं समाधान मिळतं आणि आता ज्ञानवापीच्या बाहेर शेकडो वर्षे आपल्या आराध्याची संयमाने प्रतीक्षा करणाऱ्या नंदीला लवकरच आपल्या आराध्याचं दिमाखात दर्शन होईल याचीही मनोमन खात्री पटते. अशी समीक्षा विनय जोशी यांनी केली आहे.