संदेशखाली प्रकरणाचा तपास सीबीआय करणार!, कोलकाता उच्च न्यायालयाचे निर्देश
10-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशीचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता शाहजहान शेख याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, खंडणी यांसारखे अनेक आरोप आहेत. सदर प्रकरणी आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, संदेशखाली प्रकरणात बंगाल पोलिसांनी शाहजहान शेख, शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी एस शिवज्ञानम व न्यायमूर्ती हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने दि. १० एप्रिल रोजी प्रकरणाशी संबंधित ५ जनहित याचिकांवर सुनावणी केली आहे. या सुनावणीत सीबीआयला तपास अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच पुढील सुनावणी दि. ०२ मे २०२४ रोजी होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संदेशखाली प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार असून संदेशखालीत १५ दिवसांत परिसरात सीसीटीव्ही-स्ट्रीट लाइट बसवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला दिले आहे. यासोबतच गरजेनुसार येथे एलईडी आदी बसवावेत, तसेच सर्व खर्च बंगाल सरकार उचलणार असून या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवणार असल्याचेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संदेशखाली प्रकरणातील न्यायालयाच्या आदेशावर वकील आलोक श्रीवास्तव म्हणाले, “उच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक आदेश दिला आहे. संदेशखळी लैंगिक छळ, बलात्कार आणि इतर प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय तपासासाठी नुकताच आदेश पारित करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, जमीन हडप प्रकरण आणि ईडीवरील हल्ल्याचा सीबीआय तपास सुरू असून बंगाल सरकारला सीबीआय अधिकारी आणि संदेशखळीच्या पीडितांना पुरेशा सुविधा आणि सुरक्षा पुरवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.