राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय

    09-Mar-2024
Total Views | 198
Rajamata and Chhatrapati Shivray


मावळवासिनी स्वराज्यलक्ष्मी राष्ट्रउभारणी शिवरायांची परात्पर शक्ती अशा दिव्यरूप लाभलेल्या जिजाऊ माऊलीनेच आचारशील, वरदवंत, शीलवंत, जाणता राजा घडविला. अशा सामर्थ्यशील जिजाऊ मातेचे बाल शिवरायांना घडविण्याचे, त्यांच्या मनात धर्माचे बीज पेरण्याचे, स्वराज्य उभारण्यासाठी सामर्थ्य देण्याचे, त्यांच्या जीवनाला आकार देण्याचा सर्व इतिहास व त्याचे पुनरावलोकन आजच्या आधुनिक स्त्रियांच्या समोर मांडावे यासाठी राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर साकार करण्यासाठी, हा लेख प्रपंच.

गेल्या महिन्यात दि. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा झाला. या भारतभूमीत असे एकमेव राजे होते-ज्यांची जयंती इतक्या उत्साहात देशभर साजरी होते. महाराजांच्या जीवन चरित्रावर चिंतन व मनन करताना मला सर्वप्रथम आठवतात, त्या त्यांच्या मातोश्री जिजाऊ. ‘जिजाऊ’ शब्दाचा अर्थ समजून घेणे फार आवश्यक आहे. जी म्हणजे ’जिज्ञासा’, ‘जा’ म्हणजे ’जागृती’, ‘उ’ म्हणजे ’उत्कर्ष’. जिज्ञासा आली तर जागृती येते. एकदा का जागृती आली की, माणसाचा उत्कर्ष होण्यास सुरुवात होते. म्हणजे आधी जिज्ञासा, जिज्ञासातून जागृती आणि जागृतीतून उत्कर्ष. जिजाऊंना काय अपेक्षित होते, हे यातून लक्षात येते. हे त्रिसूत्र आपल्याही लक्षात आले, तर घराघरात जिजाऊ तयार होतील. घराघरात जिजाऊ तयार झाल्यास, आजही घरोघरी शिवबा तयार व्हायला वेळ लागणार नाही.

राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगितल्या. रामायण आणि महाभारत हे जगण्याचे विषय आहेत, हे राजमातेने शिवबांच्या मनावर ठसवले. त्यातूनच महानतेचा मानदंड महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज घडले. माझ्या मते, अगदी याची सुरुवात जिजाऊंच्या गर्भात शिवबा असताना झालेली दिसून येते. महाभारतात ज्याप्रमाणे अभिमन्यू आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूहाचे ज्ञान मिळवतो, अगदी त्याप्रमाणे आईच्या गर्भात असतानाच, त्यांच्यावर सभोवताली घडणार्‍या अनेक घटनांचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. याच कालखंडात बहामनीतील पाच पातशाह्यांमध्ये सतत संघर्ष सुरू असतो. या पातशाह्यांकडे मराठा सरदार सेवा किंवा चाकरी करण्यात धन्यता मानत असतात. पातशाह्यांमधील आपापसातील संघर्षात मराठा सरदारांचा चुराडा होत असे. या सत्ताधीशांप्रति आपली निष्ठा दाखविण्याच्या नादात हे मराठी सरदार एकमेकांविरोधात नको-नको ती कृत्ये करून बसत.


त्यातून मिळणारी जहागिरी, वतन किंवा पाटीलकी यावरच त्यांना समाधान वाटे. एकमेकांविषयी संशयाचे वातावरण, अविश्वास यांमुळे मराठी सरदारांमध्ये व त्यांच्या कुटुंबांमध्ये भांडणे सुरू होती. यासारख्या गोष्टींचा परिणाम निजामशाच्या दरबारातच जिजाऊंच्या वडिलांचा व भावांचा निजामशाहकडून निशस्त्र असताना खून होतो. त्यावेळी शिवबा आईच्या गर्भात असतात. आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटनांचा परिणाम आईच्या गर्भात असणार्‍या बाळावर होत असतो. जिजाऊंचे पती शहाजीराजे हेसुद्धा त्या धामधुमीच्या कालखंडात सतत कोणत्या ना कोणत्या मोहिमेवर असत. जिजाऊंच्या सुरक्षेसाठी शहाजींनी शिवनेरीची निवड केली होती. तेथील किल्लेदार शहाजींचे विश्वासू होते. दि. १९ फेब्रुवारी १६३०ला महाराजांचा शिवनेरी गडावर जन्म होतो. गडावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव ‘शिवबा’ ठेवण्यात येते. शिवबा लहानाचे मोठे होऊ लागतात. जिजाऊंनी बाल शिवबाला लहानपणापासून रामायण, महाभारत व पौराणिक कथेच्या गोष्टी सांगितल्या. शास्त्रज्ञान व शस्त्रज्ञान दिले. याशिवाय आपल्या देशावर पूर्वीपासून होत असलेल्या परकीय आक्रमकांचा इतिहासही सांगितला. त्यात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांची आक्रमणे सत्ता व संपत्ती प्राप्त करण्याच्या उद्देशाने आलेल्या आक्रमकांसह त्यानंतर आलेल्या म्हणजे इ. स. ७३० नंतर आलेल्या आक्रमकांचा उद्देश हा केवळ सत्ता व संपत्ती मिळवणे हा नसून, धर्मप्रसार करणे हाही होता. तो उद्देश सफल करण्यासाठी, ते अन्याय व अत्याचाराच्या सीमा पार करत.

यामध्ये इ. स. ७३० मध्ये इराणच्या राजाचा सेनापती मोहम्मद बिन कासीम व सिंधचा राजा दाहीर यांच्यातील संघर्ष, इ. स. १००० मध्ये गजनीच्या मोहम्मदचे आक्रमण, इ. स. ११९२ची पृथ्वीराज चव्हाण व मोहम्मद घोरी यांच्यातील तराईची लढाई, इ. स. १३१०च्या जवळपास झालेली देवगिरी किल्ल्याजवळील अल्लाउद्दीन खिलजी व रामदेवराय यांच्यातील लढाई, इ. स. १५२६चे बाबर व इब्राहिम लोधी यांच्यातील पानिपतचे पहिले युद्ध, इ.स.१५२७चे बाबर व राणासंघातील खांडवाचे युद्ध, इ. स. १५५६ अकबर व हेमू यांच्यातील पानिपतचे दुसरे युद्ध, इ. स. १५६५चे विजयनगर व बहामनीच्या पाच पातशहा राज्यातील राक्षसतागडीचे युद्ध. या सर्वच युद्धांमध्ये भारतीयांचा पराभव झाला. बर्‍याच भारतीय राजांना आक्रमकांच्या उद्दिष्टांचे आकलनच झालेले दिसून येत नाही. युद्धात पराभव होत असल्यास यशस्वी माघार घेणे किंवा यशस्वी तह घडून आणणे, हे अनेक भारतीय राजांना जमले नाही. हा सर्वच इतिहास जिजामातेने बाल शिवबा राजांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला.
 
त्याचाच परिणाम म्हणून महाराजांनी त्यांच्या जीवनात अशा सर्व बाबींचा सखोल अभ्यास आणि उपयोग केलेला दिसून येतो. त्यामुळे महाराजांचे धोरण अभ्यासतांना आपल्याला असे स्पष्टपणे जाणवते की, त्यांनी शक्यतो हत्तीवर बसून युद्ध करण्याचे टाळले. सैन्याच्या जलद हालचालींसाठी घोडदळाला प्राधान्य दिले. त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत सक्षम होते. शत्रू गोटातील खडान्खडा माहिती त्यातून त्यांना मिळे व शत्रू गाफील असताना गनिमी काव्याच्या पद्धतीने ते शत्रूवर हल्ला करीत. त्यामुळे अत्यंत कमी सैन्य असतानाही महाराजांनी मोठमोठे विजय मिळवले. अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी करण्यासाठी, अमावस्येच्या रात्रीचाही आधार घेतला, तर समुद्रावर जाणे रुढी-परंपरांना मान्य नसतानाही, त्यांनी स्वराज्य हिताच्या दृष्टीने सक्षम आरमार उभे केले आणि डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आणि सिद्दी या सागरी शत्रूंवर जरब बसवली.

ज्याप्रमाणे महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाचा सेनापती कालयवनचा वध करण्यासाठी, आधी रणांगणातून पलायन केले व पाठलाग करणार्‍या कालयवणाचा चातुर्याने गुहेत निद्राधीन असलेल्या, राजा मुचकुंदाकरवी वध घडवून आणला, अगदी त्याचप्रमाणे प्रचंड सैन्य घेऊन आलेल्या, अफजलखानाला केवळ आपल्या शब्द चातुर्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी केवळ दहा अंगरक्षकांसह येण्यास भाग पाडले. ज्याप्रकारे पौराणिक कथांमध्ये नरसिंहाने वाघनखांच्या साह्याने हिरण्यकश्यपूचा वध केला, अगदी त्याचप्रमाणे महाराजांनी वाघनखांचा मारा करत, अफजलखानाचा वध केला. रामायणामध्ये भगवान श्रीरामांना सीता ही पवित्र आहे, हे माहीत असतानासुद्धा जनतेच्या मनात संशय आहे म्हणून ते सीतेचा त्याग करतात. अगदी त्याचप्रमाणे राज्याभिषेकानंतर, जनतेतील काही लोकांनी नाराजी प्रकट केली म्हणून महाराजांनी जनक्षोभ टाळण्यासाठी व जनतेच्या समाधानासाठी दुसरा राज्याभिषेक घडवून आणला. महाभारतात ज्याप्रमाणे लाक्षागृहातून पांडवांनी स्वतःला सुरक्षितपणे वाचवले, अगदी त्याचप्रमाणे महाराजांनी आग्य्राच्या काळ कोठडीतून स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेने एक संदेश देशभर पोहोचला, तो म्हणजे मुघल अजिंक्य नाहीत. थोडक्यात, या सर्वच घटनांचा विचार करता, जिजामातेने लहान शिवबावर केलेले संस्कार व घेतलेले परिश्रम भविष्यात त्यांना किती उपयुक्त ठरले, हेच आपल्याला दिसून येते.

थोडक्यात, महाराजांना परकीय आक्रमकांच्या उद्दिष्टांचे योग्य आकलन झालेले दिसून येते. जे इतर भारतीय राजांना झालेले नव्हते. हे सर्व महाराजांना शक्य झालं; कारण त्यामागे जिजाऊ असल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसते. तात्पर्य अनेक राजे, महाराजे, राष्ट्रपुरूष, यांच्या चारित्र्यातून नवीन सुसंस्कारित पिढी घडविता येते. म्हणून संस्कारांचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, निष्ठावान, वरदवंत, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हा एक चिरंतन प्रेरणास्रोत आहे. एकदा काही करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली की, पुढचं काम सोपं होतं. व्यक्ती त्या ध्येयावर काम करायला सुरुवात करतो, त्यासाठी मार्ग काढतो.
 
राजमाता जिजाऊंजवळ असणार्‍या निरीक्षण शक्तीच्या जोरावर त्यांनी भूतकाळापासून बोध घेत, आपला वर्तमान आणि भविष्य बदलून दाखवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दाखविली. खरं तर हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिघांना एकमेकांशी जोडणारा, स्वराज्य निर्मितीची आकांक्षा जागवणारा एक समान धागा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. आपल्या मुलाला म्हणजे बाळराजे शिवबांना चांगले मित्र मिळावेत म्हणून या मातेने अनेकविध प्रयत्न केले. आपल्या मुलांचे मित्र चांगल्या वळणाचे, विचारांचे असतील तर आपले मूल आपोआप चांगल्या वळणावर जाईल. ते जर वाईट वळणाचे असतील, तर मूल वाईट मार्गाला जायला वेळ लागणार नाही. तानाजी, बाजी, येसाजी असे जीवलग बालमित्र महाराजांना मिळालेत.

याच मातेच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्य उभे राहिले. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या. एकूण त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला, तर असे सहज लक्षात येते की, त्यांचा जन्मच मुळी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी झाला होता आणि अखेर तो दिवस उगवला-दि. ६ जून १६७४. वाद्यांचा कडकडाट, ढोल, ताशे, सनई, चौघडे, नौबती, तुतार्‍या झडू लागल्या. चारही दिशांना तोफा दुमदुमू लागल्या. राष्ट्रभूमीला राजे छत्रपती लाभल्याची आनंदवार्ता देशभरात पसरली. जणू वारा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये जाऊन सांगत होता, राजे छत्रपती झाले. रयतेचे राज्य स्थापन झाले. कित्येक शतकानंतरची ती पहिली अलौकिक स्वातंत्र्याची रम्य पहाट होती. त्या अद्वितीय सकाळी रायगडाचा परिसर सूर्याच्या सोनेरी प्रकाशात भगव्या रंगाने न्हाऊन निघाला होता. राजमाता जिजाऊंचे डोळे या अलौकिक आनंद सोहळ्याने पाणवले होते. याचसाठी केला होता अट्टाहास, ते त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले होते.
 
पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले. त्यांना आपल्या जीवनाचे कार्य पूर्ण झाल्याची जाणीव झाली. राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांतच त्यांनी अखेरचा निरोप घेतला. विद्यमान पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नवीन शैक्षणिक धोरणानुसार, प्राचीन संस्कृतींचे पुनरुज्जीवन व समस्त भारतीय भाषांना चांगले दिवस येणार आहेत. वय वर्ष तीनपासूनची मुले शाळेत येतील म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचा वैभवशाली व गौरवपूर्ण इतिहास आपण मुलांना बाळगुटीप्रमाणे लहान असल्यापासून देऊ. यातून भविष्यातील राष्ट्राभिमानी पिढी निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल.

देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे, एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा देश उद्या आत्मनिर्भर होऊन, जगात विश्वगुरू होईल, यात शंकाच नाही. कर्तव्यदक्ष माणसांमधूनच कामाला शिस्त येईल. प्रत्येकाने देशासाठी एकच केले पाहिजे, जे महात्मा गांधीजी म्हणत. “देशाच्या विकासासाठी जो बदल व्हावा, असे तुम्हांला मनापासून वाटते, सर्वप्रथम तो बदल स्वतःमध्ये करा. मी माझे कर्तव्य नीट करणार आहे. असे वर्तन करणारी जी थोडी माणसे या देशात आहेत, तीच देशाचे भवितव्य घडवतील, यावर माझा ठाम विश्वास आहे.” अशा देशभक्तांची मांदियाळी उभी राहील. एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ’राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय’ हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे वैचारिक मंथन मानवी जीवनाच्या आनंददायक प्रगतीसाठी आवश्यक पण आज प्रतिकूल परिस्थितीत असणार्‍या प्रत्येक गोष्टीच्या विकासासाठी संजीवनी ठरावे, हीच अपेक्षा.

प्रा. प्रशांत शिरुडे
(लेखक के. रा. कोतकर माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे शिक्षक आहेत.)
९९६७८१७८७६
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121