महापालिका आयुक्त बंगल्याकडून १४ वर्षांपासून करभरणा नाही
थकबाकी ४.५६ लाख रुपये
15-Mar-2024
Total Views | 40
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. असे असले तरी खुद्द पालिका आयकतांच्या बंगल्याचा कर थकीत आहे. पालिका आयुक्त बंगल्याची मागील १४ वर्षाची कर थकबाकी ४.५६ लाख रुपये असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीतून समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आयुक्त कार्यालयाकडे दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी अर्ज करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर वीज सुविधांसाठी केलेला खर्चाबाबत मागील पाच वर्षांची माहिती देताना महिन्यावाईज एकूण वीज आकार खर्च, वापरलेले युनिट याची माहिती मागितली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर त्यांच्या सदर थकबाकीची मुदत दि. ५ जून २०२४ पर्यंत असल्याची माहिती दिली.
दि. १ एप्रिल २०१० पासून दि. ३१ मार्च २०२३ पर्यंतची थकबाकी ३.८९ लाख रुपये होती. तर दि. १ एप्रिल २०२३ पासून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंतचे चालू बिल देयक ६७ हजार २७८ रूपये इतके आहे. यात सर्वसाधारण कर आणि जल कराचा समावेश आहे. विशेष म्हणजे जलमापक विरहित जलजोडणी आहे.
जलजोडणीला जलमापक लावणे आवश्यक आहे. आयुक्त असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकांनी वेळेवर कर अदा करणे आवश्यक आहे.