"अडीच वर्ष ठाकरेंना शेतकऱ्यांचं दुःख कळलं नाही!"

भाजपा आमदार प्रविण दरेकरांचा सवाल

    14-Mar-2024
Total Views | 32

Pravin Darekar


यवतमाळ :
अडीच वर्षे सत्ता असताना उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दु:ख कळलं नाही आणि आता ते शेतीवर बोलत आहेत, याबद्दल आश्चर्य वाटतं, असे वक्तव्य भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा आणि शेतीचा काय संबंध? असा सवालही त्यांनी केला आहे. गुरुवारी राळेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे आयोजित लाभार्थी संपर्क अभियान कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते.
 
यावेळी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, "पक्षाला ३०-५० वर्षे झाली तरी उद्धव ठाकरेंना संवाद करावा लागत आहेत. एकीकडे ते संवाद साधण्यासाठी फिरत असताना दुसरीकडे आमचे कार्यकर्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जाताहेत. हा फरक आहे. त्यांनी दोन-तीन सभा घेतल्या की त्यांचे काम संपले. परंतू, आमचा जनतेशी हृदयस्पर्शी संवाद आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - निलेश लंकेंच्या भूमिकेचं महाराष्ट्रात स्वागत : संजय राऊत
 
"लोकशाहीत एखाद्या नेत्याने आरोप केल्यावर उत्तर देण्याचे काम आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे आहे. पंतप्रधान आवास योजना उद्धव ठाकरेंना माहित आहे का? या आवास योजनेच्या माध्यमातून काही कोटींची घरे गरिबांना देण्यात आली. जे ४० वर्षात झालं नाही ते १० वर्षात पंतप्रधान मोदींनी केले. तसेच उज्वला गॅसच्या माध्यमातून महिलांना गॅस देण्याचे काम केले आणि उद्धव ठाकरे विचारतात उज्वला गॅसचे काय झाले? एक रुपया पीक विमा आपल्या सरकारने केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा मिळतोय. तुम्ही काय केलंत? सत्ता नसताना पीक विम्याची कार्यालये फोडलीत. सत्ता आल्यावर अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काही करू शकला नाहीत आणि आता धावता दौरा करून भावनिक वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांचे एकही भाषण टोमणे, द्वेषाने बोलल्याशिवाय पूर्ण होत नाही. उद्धव ठाकरे गद्दार कोण? गद्दार तुम्ही आणि तुमचा पक्ष आहे. मागील विधानसभेला शिवसेना आणि भाजपाला लोकांनी मतदान केले होते. पंतप्रधान मोदींचा फोटो लावून भाजपासोबत सत्तेत राहिला होतात. सत्तेत जिंकून आल्यावर आपल्या विचारधारेच्या विरोधात असलेल्या काँग्रेससोबत बसलात, ही गद्दारी नाही का? उद्धव ठाकरे तुमचे सुपुत्र आदित्य ठाकरे राज्याचे मंत्री झाले. त्यावेळी शिवसेनेचे इतर नेते लायक नव्हते का? असा सवालही दरेकरांनी केला.



अग्रलेख
जरुर वाचा