२१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

    20-Feb-2024
Total Views | 182
International Mother Language Day

दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.
 
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला टंग डे (Tongue Day), मदर लँग्वेज डे (Mother language Day), मदर टंग डे (Mother Tongue Day) , लँग्वेज मूव्हमेंट डे (Language Movement Day) आणि Shohid Dibosh या नावाने देखील ओळखले जाते. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वापराने जगभरातील अनेक मातृभाषा लोप पावत चालल्याचे चित्र आहे. मात्र असे होऊ नये यासाठी युनेस्कोने पुढाकार घेत मातृभाषा आणि त्यासोबत संबंधित संस्कृती टिकावी यासाठी आजच्या दिवसाची निवड केली आहे.

आजच्या सर्व मुलांना व्हॅलेंटाइन डे माहिती आहे. परंतु बहुतांश मुलांना मराठी भाषा दिनाची माहिती नसणार ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषा टिकवण्यासाठी जनजागृती आवश्यक असून, त्याची खरी सुरुवात ही कुटुंबातूनच होणे अत्यावश्यक आहे. जागतिकीकरण ही वस्तुस्थिती असून ते स्वीकारलेच पाहिजे. कारण त्यामुळे आर्थिक विकास झाल्याचे नाकारता येणार नाही. आता जागतिकीकरण खेड्यांपर्यंत पोहोचलेले आहे. जागतिकीकरणात मातृभाषा टिकवण्याचे मोठे आव्हान असून, मातृभाषेला धोका घरातूनच असल्याने मातृभाषा जतनाची सुरुवात कुटुंबातूनच होण्याची गरज आहे.

जागतिकीकरणाच्या जमान्यात मातृभाषेसह आणखी एक भाषा येणे गरजेचे बनले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील 38 टक्के विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्कील पूअर असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. बॅलन्स साधता आला पाहिजे. अमेरिकेतील 155 शाळांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार दोन भाषा येत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रगती असल्याचे दिसून आले आहे.
प्रत्येकाला आपापली मातृभाषा म्हणजे काय हे माहीतच असेल. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपण अनेक भाषा बोलतो आणि शिकतो. परंतु आपल्या मनावर पकड असते ती आपल्या मातृभाषेची.

मी एक परदेशी भाषा शिक्षिका असल्यामुळे मातृभाषेचे महत्व किती आहे. मातृभाषेला मान देणे म्हणजे काय? तसेच आजच्या प्रगत आणि बदलत्या काळात एक जीव दोन नवीन भाषा येणे हे किती महत्त्वाचे आहे त्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे सांगू शकते. जर आपण दाक्षिणात्य राज्यात गेला असाल तर तिथे फक्त एकच भाषा बोलली जाते जी त्या राज्याची राजभाषा असते. जर आपण परराज्यातून असाल तर ती भाषा अवगत केल्याशिवाय गत्यंतर नसते. भाषेचा स्वाभिमान कसा जपावा हे यांच्याकडून आपण शिकले पाहिजे.

याउलट आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठी साठी इतकी तत्परता दाखवली जात नाही. तर सर्रास हिंदी भाषेचा वापर केला जातो. खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये दोन मराठी माणसे देखील एकमेकांशी हिंदी मध्ये संवाद करतात. का? मराठी बोलायची लाज वाटते? व्वा रे “सो कॉल्ड एज्युकेटेड पीपल”. आपल्यालाच आपली मातृभाषा बोलायला का लाज वाटते? आपल्याला कधी आपल्या आईची लाज वाटते का? नाही ना? मग आपण आपल्या मातृभाषेला का हिन लेखतो? जर आपणच तिचा उचित सन्मान नाही केला तर बाकीच्या लोकांकडून अपेक्षा करण हे चुकीचं आहे. नुसते २७ फेब्रुवारीला आणि २१ फेब्रुवारीला एक दिवासापुरत भाषेविषयी प्रेम दाखवून किंवा रॅली काढून , स्पर्धा ठेवून आणि व्हॉट्सॲप वर स्टेटस ठेवून होणार नाही. त्याकरता मनातून आपल्या मातृभाषेचा अभिमान वाटायला हवा. जर का आपण आपल्या मातृभाषेला आदर दिला तिला सन्मान दिला तर आपले स्टेटस हे नक्कीच उंचावेल. मग आपल्याला आपल्या मातृभाषेच्या करता कोणाची लाचारी करायला लागणार नाही. प्रत्येक भाषेविषयी आपल्या मनात आदर हवाच. प्रत्येक भाषेचा दर्जा हा वेगळा आहे.

भाषा ही एकमेकांना जोडण्याचे काम करते आणि मातृभाषा ही आपल्या माणसांना एकत्र आणते. भाषा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपली भाषा आपल्या संस्कृतीची ओळख असते. भाषेत स्वतःचाच एक गोडवा असतो. तो गोडवा आपल्याला जगता आला पाहिजे. शालेय शिक्षणातही मराठी भाषा नाही. मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव पाहता मराठी ज्ञानभाषा होणार असे म्हणता येणार नाही. शालेय शिक्षणात मराठीचा वापर वाढला तरच पुढची पिढी मराठी बोलू शकेल. अथवा मराठीचा विसर पडेल आणि ज्ञानभाषा तर सोडाच बोली भाषा देखील असणार नाही.

तर आजच्या दिवसापासून आपण हा नियम करूयात की आपण निदान महाराष्ट्रात तरी परप्रांती लोकांशी सुद्धा आपल्या मातृभाषेतून बोलुयात. आणि आपल्या मातृभाषेला तिचा उचित दर्जा मिळवून देऊया. मातृभाषेचा सन्मान करू , मातृभाषा जतन करू.

अमृता मोहन संभूस
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121