ढगाळ हवामानाचा कांद्यासह रब्बी पिकांना फटका

पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ...

    04-Dec-2024
Total Views |
Nashik

लासलगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेल्या थंडीची तीव्रता कमी झाल्यामुळे लासलगाव व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ व दमट वातावरण निर्माण झाले आहे. कांदा तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे. या पिकांवर औषध फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढत असून शेतकरी ( Farmers ) वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा अवकाळीचा फटका बसतो की, काय या शंकेने शेतकरी वर्गाचे धाबे दणाणले आहे. निफाड तालुक्यातील अनेक गावात ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कांद्यासह सर्वत्र खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाचा फटका बसतो की काय या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. हिवाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. थंडी ही रब्बी पिकांना पोषक आहे. मात्र दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली आहे. ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्गाचे धाबे दणाणले आहे. या ढगाळ हवामानाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. या पिकांवर मावा, बुरशी व इतर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढल्याने शेतकर्‍यांना औषध फवारण्या कराव्या लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

उत्पादन खर्चात वाढ

गेल्या दोन तीन दिवसांपासून लासलगाव व परिसरात वातावरणामध्ये बदल झाला असून, ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कांदा, गहू, हरभरा या पिकांवर मावा व करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पिकांवर औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.

राजाबाबा होळकर, कांदा उत्पादक शेतकरी, लासलगाव