रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा सुकामेवा वधारला

मागणी २० ते २५ टक्क्यांनी वाढली

    04-Dec-2024
Total Views |
Dried Fruits

नाशिक : हिवाळा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यवर्धक मानला जातो. या दिवसात भूकेच्या प्रमाणात वाढ होत असल्याने रोजच्या आहारात वाढ होते. तसेच, तंदुरुस्त राहण्यासाठी हिवाळा ऋतू सर्वोत्तम मानला जातो. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डिंक आणि मेथीचे लाडू सेवन केले जाते. हे लाडू तयार करताना यामध्ये सुकामेवा ( Dried Fruits ) टाकला जातो. हे लाडू बनविण्याच्या तयारीला घरोघरी वेग येण्यास सुरुवात झाली आहे. थंडीत शक्तीदायक ठरणारे लाडू तयार करण्यासाठी सुकामेव्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे सुकामेव्याचे दरही काहीसे वधारले आहे. सरासरी १५ ते २० टक्क्यांनी दर वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही जीवनमान धकाधकीचे बनले आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही कसर भरुन काढण्यासाठी शक्य होईल तशी आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे थंडीची चाहूल लागताच डिंक आणि मेथीचे लाडू तयार करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये काजू, गहु, बदाम, खारीक, खोबरे, मेथी, डिंक, अक्रोड, पिस्ता, वेलची, तुप अशा शरीराला उर्जा देणार्‍या विविध पदार्थांचा वापर करून लाडू तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
यंदा थंडी उशिराने सुरु झालेली आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये पारा जलद गतीने खाली चालला आहे. त्यामुळे थंडीपासून शरीराचे संरक्षण व्हावे आणि उब मिळावी यासाठी डिंकाचे लाडू तयार केले जात आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या दरात काहीशी वाढ झाली असली तरीदेखील थंडीचा कडाका वाढताच खरेदीची लगबग वाढली आहे. दरम्यान, रोज नवीन आजारांची भर घातली जात आहे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांना लवकर आजार होतो. त्यामुळे केवळ थंडीच्या दिवसाची वाट न पाहता वर्षभर सुकामेव्याचे विविध पदार्थ तयार करण्याकडे कल वाढीला लागला आहे. मात्र मागील १० ते १५ दिवसांपासून मागणी वाढल्याने सुकामेवा महागला आहे.

मागणीत मोठी वाढ

नाशिक जिल्ह्यात शेतीचे प्रमाण अधिक असल्याने वातावरणात वर्षभर गारवा जाणवतो. तर थंडीच्या दिवसात गारव्याचे प्रमाण अधिक पटीने वाढते. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. मेथी आणि डिंकाचे लाडू आरोग्य सुदृढ राहण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे सुकामेवा खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानांवर गर्दी होत आहे. दिवाळीनंतर घट झालेल्या सुकामेव्याच्या मागणीत आता २० ते २५ टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

दर स्थिर राहणार

ही थंडीची सुरुवात आहे. त्यामुळे म्हणावी तशी मागणीत वाढ झालेली नाही. जसजशी थंडी वाढत जाईल तसतशी सुकामेव्याच्या मागणीतही वाढ होत जाणार आहे. पुढील काळात दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

अनिकेत सोनवणे, दुकानदार