नवी दिल्ली : (Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा पाचव्या कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे बोलले जात आहे.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे उच्च अधिकारी आणि निवडसमितीने याआधीच रोहितशी चर्चा केली असून रोहित मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे बोलले जात आहे. निवृत्तीची तारीख अद्यापही समोर आलेली नाही. तथापि, जर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर रोहित निवडकर्त्यांकडून काही काळासाठी खेळण्याची परवानगी घेऊ शकतो. रोहितच्या अलीकडच्या वैयक्तिक कामगिरीतील घसरणीमुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याने तीन कसोटी सामनाच्या ५ डावात केवळ ३१ धावा केल्या आहेत.
मेलबर्न पराभवावर काय म्हणाला रोहित शर्मा ?
मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव झाला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या पराभवावर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्याच्या मनाप्रमाणे होत नाहीत. हा पराभवाचा काळ मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक आहे. मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, पण गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नाहीत." तसेच कर्णधार म्हणून त्याची कामगिरी आणि फलंदाजीचा फॉर्म या दोन्हींवर प्रश्नचिन्ह झाले आहे.