कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध : नितेश राणे

‘अभाविप’चे ५९वे कोंकण प्रांत अधिवेशन सुरू

    28-Dec-2024
Total Views |
Kokan Adhiveshan

मुंबई : “कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कोकण प्रांताच्या ५९व्या प्रांत अधिवेशनाला शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे सुरुवात झाली. यावेळी मंत्री राणे उपस्थित होते.

‘विद्यापीठ अनुदान आयोगा’चे सचिव प्रा. मनिष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अभाविप’च्या अधिवेशनाला आरंभ झाला. यावेळी ‘अभाविप’ कोकण प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, कोकण प्रांतमंत्री राहुल राजोरिआ, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै. काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, ‘अभाविप’ सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रा. साईनाथ सितावार, अभाविप सावंतवाडी शहरमंत्री स्नेहा धोटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे पुढे म्हणाले की, “समृद्ध आणि विकसित कोकणासाठी कोकणातील विद्यार्थी विचारमंथन करत आहेत. कोकणाचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी आपण अग्रेसर आहात, हे अभिनंदनीय आहे. आपण सर्व राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत कार्यकर्ते आहात, यामुळे आपण ज्या भूमीतून येतो, ती भूमी विकसित आणि सुरक्षित असावी, यासाठी आपण सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आग्रही असावे.”

प्रा. मनीष जोशी उपस्थितांना संबोधत म्हणाले की, “आपल्या देशाच्या विकासासोबतच देशातील सर्व भागांचा विकास झाला पाहिजे. आपल्या भागातील समस्यांचा विचार करून आपला भाग विकसित झाला पाहिजे. यासाठी विद्यार्थी संघटना आग्रह धरते, हे कौतुकास्पद आहे. कोकण रेल्वेच्या आंदोलनात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि आता कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते चालवत असलेली चळवळ ही खर्‍या अर्थाने अभिनंदनीय आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धरलेला आग्रह यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मातृभाषेत शिक्षण सुरू होत आहे. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते केवळ आजचा विचार न करता पुढील अनेक वर्षांमध्ये देशासमोरील संधी व आव्हाने यावर चिंतन करून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विमर्श तयार करण्याचे काम ‘अभाविप’ करत आहे,” असे ते म्हणाले.

अध्यक्षीय उद्बोधनात कोकण प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अनेक अडचणींवर मात करत अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केले आहे. स्वर्गीय सौंदर्य असणार्‍या कोकणात शाश्वत विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी शासन यंत्रणेसोबत युवाशक्तीची भूमिका महत्त्वाची आहे. कोकण विकासाची सप्तसूत्री पर्यटन, प्रगत शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया उद्योग, वनशेती, वनऔषधी, मत्स्यव्यवसाय यांच्या माध्यमातून कोकणातील तरुणांसाठी कोकणात रोजगारनिर्मिती करू शकतो.”

प्रांतमंत्री राहुल राजोरिआ म्हणाले की, “प्रत्येक विद्यार्थी कार्यकर्ता आपल्या कॅम्पसमध्ये कार्यक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करत असतो. अशा कार्यकर्त्यांसाठी अधिवेशन हा विद्यार्थ्यांचा सोहळा आहे.”"

अग्रलेख
जरुर वाचा