मंत्री नितेश राणेंनी अबू आझमीला सुनावले खडोबोल

    21-Dec-2024
Total Views |
Rane And Azmi

नागपूर : विधानसभेत 'भाईचाऱ्या'वर भाषण देणाऱ्या आमदार अबू आझमी यांना मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी खडेबोल सुनावले. फतवे काढणाऱ्यांना वेळेत भाईचाऱ्याचे 'लेक्चर' दिले असते, तर अशी भाषणे देण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत मंत्री राणे यांनी आझमींची कानउघडणी केली.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदु-मुस्लीम ऐक्यावर भाषण दिले. ते म्हणाले की, "आपला देश एक धार्मिक देश आहे. कोणत्याही धर्माच्या आणि महापुरुषांच्या विरोधात कुणीही बोलल्यास लोक रस्त्यावर उतरतात. कोणत्याही महापुरुषांचा अपमान आपण सहन करु शकत नाही. पण नवरात्री आल्यावर मशीदीसमोर येऊन घोषणा दिल्या जातात. इस देश में रहेना है, तो जय सिया राम कहना है, अशा घोषणा दिल्या जातात. भगवा झेंडा लावला जातो. या प्रकारच्या घटना घडत असल्यास कायदा आणि सुव्यवस्था कशा दुरुस्त होणार? विशाळगडावर मशीदीत घुसून कुराण जाळण्यात आले. ५० लोकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. या सगळ्यामागे केवळ हिंदु आणि मुस्लिमांमध्ये भांडण लावण्याचा उद्देश आहे. बुलढाण्यात परवानगी घेऊन टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली. परंतू, कुणीतरी आग लावली आणि तिथे मोठी दंगल झाली. गरीब मुस्लिमांची घरे जाळण्यात आली. या गोष्टी थांबायला हव्यात. कुणीही धर्म आणि महापुरुषांच्या विरोधात बोलल्यास त्याला कमीत कमी १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कायदा तयार करण्यात यावा. हिंदु-मुस्लिमांनी आपापसात बंधुत्वाची भावना निर्माण करणे गरजेचे आहे," अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, "एक साहेब मशिदीत घुसून मारणार असल्याचे सांगतात. मी कुराणचे पठण करू देणार नाही, लाऊड स्पीकर बंद करेन, असे ते सांगतात. हा देश हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रेमाचा देश आहे. एकमेकांसोबत मिळून राहण्याची आपली संस्कृती आहे. दिवाळी आणि होळी या सणांच्या वेळी मुस्लिमांनी हिंदुंना शुभेच्छा द्याव्या. ईद मध्ये हिंदू बांधवांनी मुस्लिमांना शुभेच्छा द्याव्यात," असेही अबू आझमी म्हणाले.

दुसरी बाजू समजून घ्या!

अबू आझमी यांच्या असंबद्ध भाषणावर मंत्री नितेश राणे यांनी हरकत घेतली. ते म्हणाले की, "अबू आझमी भाईचारा वगैरे बोलतात, ते ठीक आहे. पण ते सभागृहाला चुकीची माहिती देत आहे. ते दुसरी बाजू समजून घेत नाहीत. गणपतीच्या मिरवणुकीवर कोण दगड मारतात? मंदिरे कोण तोडतात? हे भाईचाऱ्याचे 'लेक्चर' त्यांनी फतवे काढणाऱ्या लोकांना वेळेत दिले असते, तर अशी भाषणे देण्याची वेळ आली नसती. आम्हाला त्यांचे भाषण ऐकायचे आहे. आता आम्ही मंत्री झालो आहोत. त्यामुळे आम्ही ऐकणार. पण त्यांनी वस्तुस्थितीला धरून बोलावे. कारण सत्य काय आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे," असे मंत्री नितेश राणे म्हणाले.