स्वातंत्र्ययज्ञातील तेजस्वी अग्निशलाका : हुतात्मा अनंत कान्हेरे

    20-Dec-2024
Total Views |
 
Anant Kanhere
 
‘रणाविन स्वातंत्र्य मिळणार नाही,’ अशी जहाल क्रांतिकारकांची प्रबळ भावना होती. देशबांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याच्या वृत्तीतून 17 वर्षांचा कोवळा युवक, ज्याचे ओठ पिळले तर अजूनही दूध निघेल, असा अत्यंत स्वरुपवान क्रांतिकारक नाशिकला येतो. शेकडो लोकांच्या समक्ष राक्षसी वृत्तीचा इंग्रज कलेक्टर जॅक्सनचा वध करतो आणि स्वातंत्र्ययज्ञात आपली तेजस्वी समिधा अर्पण करून अमर होतो. या तेजस्वी अग्निशलाकेचे नाव आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरे. आज जॅक्सन वधाला 115 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या विरोचित क्रांतिकारी शौर्य घटनेचा घेतलेला आढावा.
 
प्राचीन काळापासून दंडकारण्यातील जनस्थान, आजचे नाशिक ही क्रांतिभूमी आहे. येथील ग्रामदेवतासुद्धा कालिका आणि भद्रकालीच. म्हणूनच की काय, दानवांच्या विनाशासाठी वनवासाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम या भूमीत आले. इथेच सीतामाईंचे हरण झाले आणि स्वधर्म स्थापनेचे निमित्त मिळाले, तेही याच भूमीवरून! चहुकडे म्लेंच्छांचे राज्य. स्वधर्म लोप पावला. अस्मानी-सुलतानीच्या भीषण संकट काळात शेकडो मैल लांबून नारायण सूर्याजीपंत ठोसर नावाचा 12 वर्षांचा बालक येथे येतो. 12 वर्षे तपश्चर्या करतो आणि स्वधर्म स्थापनेचा ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा शंखनाद करतो, याच भूमीवरून. इ. स. 1898 मधील पाशवी पारतंत्र्याचा काळ. 15 वर्षांचा कोवळा विनायक घरातील देवीपुढे ’शत्रूला मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतो. ‘अभिनव भारत’ या क्रांती संघटनेद्वारे सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करतो, तोही याच भूमीवरून!
 
दि. 21 डिसेंबर 1909 रोजी तत्कालीन निजाम इलाख्यातून 17 वर्षांचा कोवळा युवक, ज्याचे ओठ पिळले तर अजूनही दूध निघेल, असा अत्यंत स्वरुपवान क्रांतिकारक नाशिकला येतो. शेकडो लोकांच्या समक्ष राक्षसी वृत्तीच्या कलेक्टरचा वध करतो आणि स्वातंत्र्ययज्ञात आपली तेजस्वी समिधा अर्पण करून अमर होतो, तोही याच नाशिकच्या भूमीवरून. या तेजस्वी अग्निशलाकेचे नाव आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरे!
 
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील आयनी-मेटे ही दोन जुळी खेडी. यांतील आयनी गावात अनंताचे पूर्वज राहात होते. यांचा एक पूर्वज पानिपतच्या लढाईत मारला गेला होता व एक स्त्री आपल्या पतीसह सती गेली होती. हा देशभक्ती आणि हौतात्म्याचा वारसा घेऊन इंदोरला कामासाठी वास्तव्य करणार्‍या लक्ष्मण कान्हेरेंच्या घरी सन 1891 साली अनंताचा जन्म झाला.
 
प्राथमिक शिक्षण इंदोरला होऊन पुढे इंग्रजी शिक्षणासाठी तो तत्कालीन निजाम इलाख्यातील औरंगाबादला आला. अनंताला लहानपणापासूनच व्यायाम व नाटकाची आवड होती. स्वभावाने हुड व बेडर अनंता हिंदी अत्यंत सफाईदारपणे बोलत असे. तो आपले मामा गोविंद भास्कर बर्वे यांच्याकडे औरंगाबादला राहत असे. परंतु, बर्वे मामा कामानिमित्त हैदराबादला गेल्यामुळे अनंता सन 1905-06च्या दरम्यान बार्शीला आला. सन 1908च्या सुमारास पुन्हा औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगरला आला.
 
पारतंत्र्याच्या या काळात शेकडो गुप्त संस्था स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कार्यरत होत्या. अशाच एका गुप्त संस्थेचे सभासद येवल्याचे काशिनाथ दाजी टोणपे यांच्याशी अनंता व त्याचा मित्र गंगाराम मारवाडी यांचा संबंध आला. अनंता व गंगाराम अत्यंत जीवलग मित्र. त्यांच्या मैत्रीवर अनंताने ‘मित्र प्रेम कला’ असे पुस्तकही लिहिले होते. पुढे अनंताचा संबंध नाशिकच्या गुप्त संस्थेशी गणू वैद्यामार्फत आला. कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे, शंकर सोमण, वामन जोशी आदी सभासदांशी त्याचे विचार जुळून तो काहीतरी भव्य दिव्य करण्यास उद्युक्त झाला.
 
व्यक्ती-व्यक्तीचा प्रतिशोध एकाच कृत्यात अंत पावतो, परंतु राष्ट्राचा प्रतिशोध पिढ्यान्पिढ्या चालत असतो. लांडग्याच्या वृत्तीच्या तत्कालीन नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याने अत्याचाराचा कळस गाठला होता. याच सुमारास बंगालमधील ‘अनुशीलन समिती’च्या क्रांतिकारकांकडून नाशिकच्या क्रांतिकारकांना बांगड्यांचा आहेर भेट आल्याने, नाशिकच्या क्रांतिकारकांना स्फुरण चढले होते आणि ते अण्णा कर्वे यांच्या नेतृत्वात जॅक्सनच्या वधासाठी सज्ज झाले. या गुप्त कटाचा संपूर्ण इतिहास अत्यंत तेजस्वी व रोमहर्षक आहे. जॅक्सनची मुंबईला कमिशनर म्हणून बदली झाली, असे कळताच जसे नाशिकच्या प्रतिष्ठितांनी त्यास पानसुपार्‍यांसाठी आमंत्रणं दिली, तसे या राष्ट्रवीरांनी त्याला यमसदनी धाडण्याची सिद्धताही केली.
 
दि. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनच्या सन्मानार्थ तत्कालीन विजयानंद नाट्यगृहात रात्री सुप्रसिद्ध ‘किर्लोस्कर कंपनी’च्या ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आणि त्याचवेळी त्याचा वध करण्याची जबाबदारी अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडेंनी स्वीकारली. वध झाल्यावर अनंताचे वक्तव्य, वध केल्यानंतर विष खाऊन जीवन संपवावे म्हणून अनंताकडे दिलेली सोमल विषाची पुडी, विष कडू लागल्यास त्यावर खाण्यासाठीचा पेढा आणि वधासाठीचे पिस्तुल अशी सर्व सिद्धता झाल्यावर अनंता, अण्णा आणि विनायक सभागृहात रात्री 8.15 वाजेच्या सुमारास आसनस्थ होऊन सावजाची वाट पाहू लागले व त्यासाठी आपापल्या मोक्याच्या जागा धरून बसले. ठराविक वेळी ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग सुरू करण्यात आला आणि काही वेळातच जॅक्सन दोन इंग्लिश स्त्रियांसोबत आत येताना दिसला. लगेच डीएसपीसारखे काही अंमलदार, विशेष अधिकारी त्यास घेण्यासाठी सामोरे उभे राहिले. जॅक्सन आपल्या लवाजम्यानिशी नाट्यगृहाच्या दारात दाखल झाला. तो दारातून खाली उतरू लागताच, ओट्यावरील पहिल्या रांगेत बसलेल्या अनंताने त्वरित त्याच्या पाठीमागून एक गोळी झाडली. परंतु, ती त्याच्या काखेतून पसार झाली. तो एकदम दचकल्यासारखा झाला. क्षणात वीज अंगात संचारल्याप्रमाणे क्रांतीचे तेज अनंताच्या रुपाने काळ बनून त्याच्यासमोर आले. अत्यंत धिटाईने, अतिशय चपळाईने अनंता त्याच्या समोर आला आणि त्याचा मार्ग रोखून कोणाला काही कळायच्या आत एका मागून एक असा चार गोळ्यांचा वर्षाव जॅक्सनच्या छातीवर केला. जॅक्सनने आयुष्यभर केलेल्या अत्याचारांचा बदला या क्रांतिकारकाने एका क्षणात घेतला. त्याच्या छातीची चाळण होऊन जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि जागीच गतप्राण झाला. सोबत असलेल्या एका बाईने लगेच त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. सर्व नाट्यगृह स्तब्ध झाले. ‘शारदा’ नाटकाचे बारा वाजले! नाटकाचा पडदा त्वरित पाडण्यात आला. सगळीकडे चलबिचल सुरू झाली. जो तो घटनास्थळाकडे काय झाले म्हणून धावू लागला. अनंताला काही करता येईना. तो स्थिरच होता. तेव्हा नाशिकचा डीएसपी मारुती पांडू तोरडमल त्वरित पुढे आला आणि अनंताला पकडण्याचा प्रयत्न करू लागला. एवढ्यात इंग्रजांचे भाट जॉली साहेब व मामलेदार पळशीकर तेथे पोहोचले. मामलेदार पळशीकरांनी अंगात सैतान संचारल्याप्रमाणे आपल्या हातातील सोटा आपल्या अंगात असले नसलेले बळ एकवटून जोरात अनंताच्या डोक्यात हाणला. त्याने अनंताच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. प्राणप्रिय भारतमातेला हा अनंताच्या रक्ताचा रुधीराभिषेकच होता. या प्रकाराने अनंताचा निरुपाय झाला. अशाही स्थितीत तो मेघगर्जना करीत पळशीकरांना म्हणाला की, “तू केवळ हिंदी आहेस, म्हणून मी तुला जीवनदान देतो. मी माझे काम केले आहे. मी पळून जाऊ इच्छित नाही.” केवळ 19 वर्षांचा देखणा तरुण मुलगा शेकडो प्रेक्षकांदेखत, जिल्ह्यातील बहुतेक सर्वच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समक्ष अत्यंत धिटाईने पुढे येऊन हे अपूर्व साहस करतो. हा प्रकार म्हणजे मारुतीरायाने रावणाच्या लंकेत जाऊन लंकादहन करण्यासारखे आहे.
 
अशाही परिस्थितीत अनंताचा सडपातळ बांधा, भारदस्त छाती, विशिष्ट पवित्र्यात उभे राहण्याची ढब, डोक्यावरील काळेभोर केस, डोळ्यांतील तेजस्वी चमक, गोरापान वर्ण, सरळ नासिका, मोत्यांच्या कळ्यासारखे शुभ्र दात हे सारे वीराप्रमाणे शोभून दिसत होते. त्याचा हा अवतार म्हणजे जणू औरंग्याच्या दरबारात उभे राहिलेले छत्रपती शिवबा वा देव-देश-धर्मासाठी प्राणार्पण करणारा मूर्तिमंत शंभूराजा! त्याने हाती घेतलेले कार्य पूर्ण केल्याची कृतकृत्यता त्याच्या चेहर्‍यावर ठायी ठायी दिसत होती. एवढेच नव्हे, तर नरवीर तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, वासुदेव बळवंत फडके, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधू अशा अनेक प्रातःस्मरणीय राष्ट्रवीरांच्या पंक्तीत अनंताने आपले स्थान निर्माण केले. त्याच्या या कृत्याचे पडसाद ब्रिटिश संसदेतही उमटले.
 
दि. 18 एप्रिल 1910 रोजी तिघा क्रांतिकारकांना, उद्या तुम्हाला सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. फाशीच्या दिवशी सर्वांना झोपेतून उठवावे लागले. फाशीचा वेश चढवून हिंदूंना प्राणप्रिय वंदनीय अशी भगवद्गीतेची एक एक प्रत तिघांनी हातात घेतली आणि वधस्तंभाकडे जाण्यासाठी सकाळी 7 वाजेच्या आत कोठडीतून बाहेर पडले. अनंताचे धैर्य अतुलनीय होते. मृत्यूच्या आदल्या रात्रीस त्याने फाशी देणार्‍यास सांगितले होते की, “तू फळीला हात लावण्याची आवश्यकता नाही. वेळ झाल्यावर मला सांग म्हणजे मी ती उडवीन.” परकीय, लुटारू, दुष्ट, घातकी, स्वार्थी आणि निष्ठूर इंग्रज शासनाचे फास क्रांतिवीराच्या मानेभोवती अडकविण्यात आले आणि सकाळी ठीक 7 वाजता तिघांच्या पायाखालील फळ्या उडविण्यात आल्या. क्षणभरात भारतमातेचे हे सुपुत्र तिच्याच डोळ्यांदेखत अनंताच्या प्रवासाला निघून गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या शौर्यकृत्याचे एक स्मारकही नाशिकला असावे, अशा अपेक्षेसह शौर्य दिनाच्या राष्ट्रवीरांना कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन!
 
(लेखक ‘हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे’ या पुस्तकाचे संकलक व लेखक आणि इतिहास अभ्यासक आहेत.)
 
देवेंद्रनाथ पंड्या