मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यांना पक्ष संघटनेत संधी मिळणार!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : विजय शिवतारे, प्रकाश सुर्वेंनी घेतली भेट

    20-Dec-2024
Total Views | 47
Eknath Shinde

नागपूर : ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही ते लोक पक्षाचे आणि संघटनेचे काम करणार आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, शुक्रवार, २० डिसेंबर रोजी आमदार विजय शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ज्या आमदारांना आम्ही मंत्री बनवले त्यांची क्षमता आहे आणि ज्यांना नाही बनवले त्यांची क्षमता नाही, असे मानण्याची आवश्यकता नाही. मंत्र्यांची संख्या कमी असल्याने आणि जास्त संख्याबळात लोक निवडून आल्याने काहीजणांना थोडी श्रद्धा सबुरी ठेवावी लागते. जे लोक पहिल्या टप्प्यात मंत्री बनले नाहीत ते पक्षाचे आणि संघटनेचे काम करतील. दुसऱ्या टप्प्यात तेसुद्धा मंत्री होतील. हीच कामाची पद्धत आहे."

आम्ही एक कुटुंब!

"गेल्या पाच दहा वर्षांपासून सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांचे एकनाथ शिंदेंशी एक जीवाभावाचे नाते निर्माण झाले आहे. एकमेकांच्या सुखदुखात धावून जाणारे लोक आम्ही आहोत. त्यामुळे हे एक कुटुंब असून ते कधीही विभक्त होऊ शकत नाही. विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे मला भेटले. एक दोन दिवस माणसाच्या मनात नाराजी असते. प्रत्येकजण आपापल्या भावना व्यक्त करतात. पण शिवसेना हे आमचे कुटुंब आहे आणि त्यातून कुणीही वेगळे होऊ शकत नाही," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

"एवढ्या मोठ्या प्रमाणात जनादेश मिळाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेने सावत्र भावांना घरी बसवले आणि महायूतीला अडीच वर्षांच्या कामाची पोचपावती दिली. पदे येतात जातात. त्यामुळे पदापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात काय आमुलाग्र बदल होणार, हे महत्वाचे आहे," असेही ते म्हणाले.

बीड हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही!

"बीड हत्या प्रकरणी मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर निवेदन केले आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. यातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आणि पोलिस अधिक्षकांची बदली केली आहे. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचे काम करणार नाही. कितीही मोठा गुन्हेगार असला आणि कुणाशीही त्याचे लागेबांधे असले तरी महायुती सरकार कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणारे आणि जनतेला न्याय देणारे सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये सरकार गांभीर्याने काम करत असून यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही," अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

कल्याणमधील घटनेत मराठी कुटूंबाच्या पाठीशी!

"कल्याणमध्ये मराठी कुटूंबासोबत घडलेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटूंबाच्या पाठीशी ठाम आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणी कसे रहावे आणि काय खावे यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही आणि तसे करणे म्हणजे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कुणी शिवीगाळ करून मराठी कुटूंबावर हल्ला केला तर ते कदापि खपवून घेणार नाही," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..