सेनेचे प्रताप सरनाईक एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी
23-Nov-2024
Total Views |
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघात १ लाख ९ हजार ११६ मतांचे लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला.
आमदार सरनाईक यांनी आपल्या मागील १५ वर्षाचा कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांसमोर विकास कामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यामुळे यावेळी सरनाईक यांनी तब्बल पावणे दोन लाख मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर १ लाख ९ हजार ११६ मताधिक्याने विजय मिळवला.
विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, "हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे, तसेच यापुढे सुद्धा ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे." आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर त्यांचा भर राहणार आहे.
प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणारा आहे. चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे.