अविश्वसनीय! सत्तेत बसतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंचे निकालानंतर ट्विट!
23-Nov-2024
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. २८८ पैकी २३० जागांवर महायुतीने दमदार विजय मिळवला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन शब्दातच आपल्या भावना ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर, तर उबाठा गटाकडून महेश सावंत यांच्यात तिहेरी लढत झाली होती. मात्र माहीम मतदारसंघातून या तिहेरी लढतीत राजपुत्र अमित ठाकरे आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांचा पराभव झाला. अखेर माहीमचा हलवा उबाठा गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी खाल्ला असल्याचे चित्र निश्चित झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या एकूण लागलेल्या निकालावर राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. अविश्वसनीय ! "तुर्तास एवढेच...", असे ट्विट शेअर करत दोन शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत विधानसभा निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांना आपले पुत्र अमित ठाकरे विजयी होतील असा विश्वास होता. मात्र आजचा एकूण निकाल पाहता अमित ठाकरेंचा पराभव जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे.
महेश सावंत यांना ५० हजार २१३ मते मिळाली असून त्यापैकी १३१६ मते मिळवत त्यांनी तिहेरी लढतीत विजय मिळवला आहे. तर सदा सरवणकर यांना ४८ हजार ८९७ मते मिळाली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी ३३ हजार ६२ मते मिळवली मात्र ते पिछाडीवर राहिले आहेत.