देशभरात सर्वत्र आदिमाया भगवतीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून,त्यामुळे सर्व शक्तीपिठांमध्ये भगवतीचा भक्तीजागर अहोरात्र सुरु आहे. भगवतीची संपूर्ण कृपेचे सुख आद्य शंकराचार्यांनी अनुभवले. त्यामुळे त्यांनी स्थापन शांकरमठात आजही भगवतीची उत्सवसेवा अव्याहतपणे सुरु आहे. शृंगेरीच्या शारदा मठातील नवरात्रोत्सवाचे हे चित्र...
दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठम अथवा शृंगेरी मठ याची स्थापना इ.स. नवव्या शतकात, अद्वैतमत प्रवर्तक यतींद्र आदि शंकर भागवत्पाद यांनी केली. आदि शंकराचार्य यांनी भारतात चार ठिकाणी मठ स्थापित केले. हे मठ दक्षिणेत शृंगेरी, पश्चिमेत द्वारका, उत्तरेत बदरी आणि पूर्वेस जगन्नाथ पुरी येथे स्थित आहेत. शृंगेरी मठ हा कर्नाटक राज्याच्या चिकमंगळूर जिल्ह्यात, तुंगा नदीच्या तीरावर स्थित आहे. येथे आदि शंकराचार्य यांनी भगवती शारदाम्बा हिची प्रतिष्ठापना केली आणि आपले शिष्य सुरेश्वराचार्य यांना या मठाचे पहिले आचार्य म्हणून नियुक्त केले. ही आचार्य परंपरा गेली बारा शतके अविच्छिन्न पद्धतीने चालत आली आहे. येथील आचार्यांना ‘जगद्गुरू शंकराचार्य’ म्हणून ओळखले जाते. इ. स. चौदाव्या शतकात या मठाचे बारावे आचार्य श्री विद्यारण्य महास्वामीजी यांच्या कारकिर्दीत, या मठाला विजयनगर साम्राज्याच्या शासकांचा राजाश्रय लाभला. त्यानंतर या मठाचे रूपांतर ‘जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थाना’ मध्ये झाले. विजयनगर साम्राज्य स्थापन करण्याकरिता हरिहर आणि बुक्क या दोन बंधूंना, श्री विद्यारण्य महास्वामीजी यांनी प्रेरित करून मार्गदर्शन केले होते. त्यानंतरेअ इ.स. 1336 साली विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली.
शृंगेरी मठाला ’श्री मठ’ असे ही म्हटले जाते. शारदीय नवरात्र हा शृंगेरी मठात सर्वात मोठा उत्सव असतो. भगवती महिषासुरमर्दिनी दुर्गा देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी महिषासुराबरोबर घनघोर युद्ध केले, आणि अखेरीस विजयादशमीच्या दिवशी त्या असुराचा वध केला. हा कालावधी पूर्ण भारतभर शारदीय नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो. शृंगेरी मठात भगवती शारदाम्बा हिच्या शरण नवरात्री उत्सवाचा प्रारंभ श्री विद्यारण्य महास्वामीजी यांच्या काळात झाला. या मठाच्या प्रत्येक जगद्गुरूंनी ही परंपरा तितक्याच शास्त्रशुद्ध पद्धतीने चालू ठेवली आहे. शरण नवरात्री दरम्यान संपूर्ण शृंगेरी नगरात उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. श्री मठाचे भव्य गोपुर, श्री शारदाम्बा सन्निधि, तसेच श्री मठाचे आवार येथे सुंदर रोषणाई केली जाते. ही रोषणाई डोळे दिपवून टाकणारी असते. भारतातून आणि भारताबाहेरून अनेक भक्त, शरण नवरात्री उत्सवातील विशेष पूजांमध्ये सहभागी होण्याकरिता शृंगेरी येथे येतात.
देवी शारादाम्बाच्या दिव्य विग्रहाला रेशमी वस्त्रे आणि मौल्यवान आभरणे यांनी अलंकृत केले जाते. या मध्ये रत्नजडित मुकुट, मोती, पाचु, कंठाभरणे, कंकणे, केयूर आणि इतर अनेक सुवर्ण आभूषणे यांचा समावेश असतो. महालय अमावास्येच्या दिवशी महाभिषेकानंतर देवी शारदाम्बा हिच्या विग्रहाला, जगत प्रसूतिका अलंकार चढवला जातो. हा अलंकार देवीचे जगन्माता या रूपाचे द्योतक आहे. शरण नवरात्री उत्सवाचा आरंभ प्रतिपदेला श्री शारदा प्रतिष्ठेने होतो. या दिवसापासून देवी शारदाम्बा हिला विविध वाहनांनी अलंकृत केले जाते. त्यावेळी ती भगवती ब्रम्हाणी (हंस वाहन), माहेश्वरी (वृषभ वाहन), कौमारी (शिखी वाहन), वैष्णवी (गरुड वाहन), इंद्राणी (गज वाहन), चामुंडा (सिंह वाहन) आणि अश्व वाहिनी अशा विविध रूपांमध्ये भक्तांना दर्शन देते. अश्व वाहिनीचा अपवाद वगळता या इतर देवी ’सप्त मातृका’ म्हणून ओळखल्या जातात. सप्त मातृकांमध्ये वाराही देवीचा ही समावेश केला जातो. पण, श्री मठाच्या शरण नवरात्री उत्सवात वाराही देवीचा समावेश नसतो. उत्सवादरम्यान देवी शारदाम्बाचे दर्शन भाविकांना सरस्वती, मोहिनी आणि राजराजेश्वरी या रूपांत देखील होते. शृंगेरी मठाचे 33वे आचार्य, जगद्गुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामीजी यांनी, त्यांच्या ’भक्तिसुधातरङ्गिणी’ या स्तोत्रसंग्रहात वरील सर्व वाहनांच्या महत्त्वाचे विवरण केले आहे.
शरण नवरात्री उत्सवात प्रातःकालीन अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर, जगद्गुरू शंकराचार्य तुंगा नदीच्या तटावर गंगापूजन करतात. गंगा पूजेनंतर ते श्री मठातील सर्व देवालयांना भेट देऊन तेथील देवतांचे दर्शन घेतात. मध्यानेस जगद्गुरू शंकराचार्य देवी शारदाम्बाची विशेष पूजा करतात. या वेळेस अनेक भक्त या महापूजेचे साक्षीदार असतात. जगद्गुरू शंकराचार्य ललितासहस्रनाम अर्चना, गज पूजा आणि पादुका पूजा देखील करतात. श्री मठाचे आचार्य रोज रात्री श्री चंद्रमौलीश्वर यांची पूजा करतात. हे एक स्फटिक शिवलिंग आहे. श्री चंद्रमौलीश्वर पूजन हे आचार्यांच्या नित्य अनुष्ठानाचा अविभाज्य घटक आहे. शरण नवरात्री उत्सवात ही पूजा झाल्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य रेशमी वस्त्रे, सोन्याचा मुकुट आणि रत्नजडित आभूषणे परिधान करून देवी शारदाम्बाच्या सन्मुख एका सिंहासानावर विराजमान होतात. जगद्गुरूंच्या सुवर्ण अलंकारांमध्ये मूत्तिन सार नावाचे एक कंठाभरण असून, हे अत्यंत प्राचीन आहे. या अलंकाराच्या पदकावर गंडभेरुंड नावाच्या एका काल्पनिक पक्ष्याचे अंकन करण्यात आले आहे. हा पक्षी म्हैसूर राज्याचे एक राजचिन्ह आहे.
विजयनगर कालीन कलेत देखील हा पक्षी अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे. गेल्या काही शतकांच्या कालखंडात देवी शारदाम्बाला अनेक संस्थानांनी, मौल्यवान वस्त्रे आणि आभूषणे अर्पण केली आहेत. ही आभरणे केवळ शरण नवरात्री उत्सवादरम्यान देवी शारदाम्बाचा विग्रह अलंकृत करण्याकरिता मठाच्या कोषागारातून बाहेर काढण्यात येतात. शरण नवरात्री उत्सवात प्रत्येक रात्री श्री शारदाम्बाच्या मंदिरात ‘दरबार’ भरतो. या वेळेस देवीला अष्टावधान सेवा अर्पण करण्यात येते. प्रथम जगद्गुरू शंकराचार्य श्री शारदाम्बाच्या सुवर्ण रथाच्या सन्मुख उभे राहून, मंदिराची प्रदक्षिणा करतात. या रथात देवीची उत्सव मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. या नंतर मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीचे पारायण होऊन, देवीची महामंगल आरती होते. या नंतर पंचांग पठण, चतुर्वेद पारायण, सकल वाद्य सेवा आणि संगीतसेवा इत्यादी पार पडतात. दरबाराची सांगता देवी शारदाम्बाच्या आरतीने होते.
नवरात्रीतील चतुर्थीला जगद्गुरू शंकराचार्य श्री गणेशाची विशेष पूजा करतात. ललिता पंचमीपासून सप्तशतीचे पारायण आणि चंडी होम केले जातात. नवमीला पूर्णाहूती होते. गजपूजा आणि आयुध पूजा देखील याच दिवशी केल्या जातात. जगद्गुरू शंकराचार्य विजयादशमीला रामायणातील ’पट्टाभिषेक’ सर्गाचे पारायण करतात. तसेच देवी भागवत, हरिवंश, ललिता उपाख्यान, लक्ष्मीनारायण हृदय, सूतसंहिता आणि चतुर्वेदांचे पारायण नवरात्री उत्सवात केले जाते. शरण नवरात्री उत्सवात अनेक भक्त शृंगेरीला येऊन , श्री शारदाम्बा आणि जगद्गुरू शंकराचार्य यांची कृपा संपादन करतात.
श्री मठात हा उत्सव अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि नितांत श्रद्धा-भक्तीने साजरा केला जातो. श्री शारदाम्बा ही सकल विश्वाचे कल्याण करणारी जगतजननी आहे. या शरण नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने, भगवती शारदाम्बा आणि शृंगेरी मठाचे उभय जगद्गुरू परमपूजनीय श्री. श्री. भारती तीर्थ महास्वामीजी आणि श्री. श्री. विधुशेखर भारती महास्वामीजी यांची निस्सीम कृपा सर्व सज्जन आस्तिकांवर व्हावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.