सोलापूर, दि.८ : प्रतिनिधी राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोलापूर येथे करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी २७७३ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला आ. सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख, आ. शहाजी पाटील, आ. संजय शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ.राम सातपुते, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपसा जलसिंचन योजनांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी या योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या कामाला मंगळवार, दि.८ रोजी सुरुवात झाली. यासाठी राज्य सरकारने ३३६६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. उपसा जलसिंचन योजनांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि जलसंपदा विभाग सहकार्याने काम करत आहे. जलसंपदा विभागाने सौर ऊर्जीकरण प्रकल्पांसाठी साडेतीन हजार एकर पेक्षा अधिक जमीन उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत ९०५ मेगावॅट इतकी सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. विशेष बाब म्हणजे १२० सहकारी उपसा सिंचन योजनांचेही सौर ऊर्जीकरण या योजनेत करण्यात येणार आहे. आगामी दोन वर्षात ही कामे पूर्ण होतील. राज्याच्या ऊर्जा आणि सिंचन क्षेत्रातील हे ऐतिहासिक पाऊल आहे. या कार्यक्रमात सोलापूर तालुक्यातील महिला शेतकरी महानंदा तेली व द्वारकाबाई गुरव यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून कृषिपंपांचे वीज बिल शासनाने भरल्याची पावती उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.