सिंधुदुर्गवासीयांचो कौल यंदा कोणाक?

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; राणे आणि ठाकरे समर्थक पुन्हा भिडणार

    23-Oct-2024
Total Views | 51
 
sindhudurg 
 
मुंबई : ( Sindhudurg ) ग्रामपंचायतीची निवडणूक असो, वा विधानसभा किंवा लोकसभा. तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच! नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला,तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले. लोकसभेतील या विजयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहे. कणकवली आणि सावंतवाडीच्या जोडीला यंदा कुडाळ मतदारसंघ महायुतीकडे खेचून आणण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खा. नारायण राणेंनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात ते यशस्वी होतील का, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वारे सध्या कोणत्या दिशेला वाहत आहेत, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली पक्षांतरे या वार्‍यांना रोखतील का, याचा आढावा...
 
कणकवली
 
भाजपचे आ. नितेश राणे गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत आहेत. विकासकामांचा झपाटा आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी हा मतदारसंघ अशा पद्धतीने बांधला आहे, की त्यांना पराभूत करणे जवळपास अशक्यच. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी युतीधर्म मोडत नितेश यांच्याविरोधात सतीश सावंतांना उमेदवारी दिली. पण, त्यांना सपाटून मार खावा लागला. यावेळेस त्यांच्याविरोधात लढण्यास कोणीच तयार नसल्यामुळे ठाकरेंवर उमेदवार आयात करण्याची पाळी आली आहे. मनसेतून बाहेर पडलेल्या परशुराम उपरकर यांना ठाकरेंनी नुकतेच पक्षात घेतले आहे. ते कणकवलीतून मशाल चिन्हावर लढल्यास डिपॉझिट जप्त होईल, अशी येथील राजकीय स्थिती आहे.
 
कुडाळ
 
हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. पण, २०१४ मध्ये शिवसेनेने तो हिसकावून घेतला. नारायण राणेंचा पराभव करीत वैभव नाईक जायंट किलर ठरले. त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते. २०१९ मध्ये युतीच्या समीकरणात ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे नाईक यांना पुन्हा संधी मिळाली. परंतु, शिवसेनेतील फुटीनंतर येथील चित्र बदलले आहे. लोकसभेला नारायण राणेंना मिळालेली आघाडी हे त्याचे ताजे उदाहरण. ही संधी हेरत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निलेश राणे यांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. हे समीकरण जुळल्यास वैभव नाईक यंदा माजी आमदार होतील, हे निश्चित.
 
सावंतवाडी
 
शिवसेनेच्या दीपक केसरकर यांना पुन्हा तिकीट जाहीर होईल, असे संकेत मिळत आहेत. २००९ सालापासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिवसेना फुटीनंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलली असली, तरी लोकसभेतील मताधिक्य महायुतीसाठी जमेची बाजू मानली जाते. केसरकर लोकसभेला नारायण राणे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. या मदतीची परतफेड नारायण राणे विधानसभेत करतील, अशी चर्चा मतदारसंघात आहे. दुसरीकडे, उबाठा गटाने भाजपच्या राजन तेली यांना गळाला लावत सावंतवाडीतून उमेदवारीचा शब्द दिला आहे. २०१४ पासून ते या मतदारसंघातून प्रयत्न करीत आहेत. गेल्यावेळी अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी केसरकरांना घाम फोडला होता. राणेसमर्थक असल्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. यंदा मात्र तशी स्थिती नाही. तेली हे नारायण राणे यांच्यावर टीका करून भाजपबाहेर पडले आहेत. त्यामुळे राणे त्या टीकेला वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर देतील, अशा चर्चा आहेत. परिणामी, सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांचे पारडे जड दिसून येत आहे.
 
निलेश राणे यांचा आज शिवसेनेत प्रवेश
 
भाजपचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुडाळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणे पूर्णतः बदलणार आहेत. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर पक्षप्रवेश सोहळा होईल,” अशी माहिती निलेश राणे यांनी दिली. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “वडील नारायण राणेंची राजकीय सुरुवात ज्या पक्षातून, ज्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर झाली, त्याच चिन्हावर मला निवडणूक लढविण्याची संधी मिळत आहे, याचा मला आनंद आणि समाधान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझे प्रेम होते, आजही आहे, यापुढेही राहणार आहे,” असे सांगत निवडणूक जिंकायची, हे आपले प्रथम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा