पुणे : सुमारे ५०० वर्षांच्या अथक लढ्यानंतर अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या आनंदसोहळ्यानिमित्त पुण्यातील रामभक्तांकडून “रामरक्षा देशासाठी.... एक सकाळ रामासाठी....” या प्रेरणेने सामूहिकरित्या "श्री रामरक्षा पठण" व श्री रामनाम जपाचा भव्य सोहळा होणार आहे. यात ‘प्रभू श्रीरामांसाठी – नमन’, ‘देशासाठी – समृद्धी’ आणि आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या ‘सैनिकांसाठी – बल’ अशा तीन संकल्पांनी एकूण तीन वेळा रामरक्षा पठण होणार आहे, तसेच आत्मोन्नतीसाठी श्री रामनाम जपाची एक माळ होणार आहे. भारतभर विविध शहरांमध्ये राम मंदिर पूर्ततेनिमित्त अनेक उपक्रम सुरु आहेत. पुणेकर रामभक्तांचे अनोखे, अध्यात्मावर आधारित आराधानेच्या स्वरुपात योगदान व्हावे या हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे अशी माहिती या उपक्रमाचे निमंत्रक श्री. हेमंत रासने यांनी दिली. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ चालवणाऱ्या भक्तिसुधा फाऊंडेशन, पुणे तसेच समर्थ व्यासपीठ पुणे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सरचिटणीस तसेच पुणे मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने या भव्य उपक्रमाचे निमंत्रक आहेत. रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर हा उपक्रम होणार आहे.
याविषयी या उपक्रमाची संकल्पना मांडणारे संगीतकार आशिष केसकर म्हणाले, “स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या आश्रमातील मुले व मुली व्यासपीठावरून या संपूर्ण समूहाच्या रामरक्षा पठणाचे नेतृत्व करतील. शि. प्र. मंडळी, पुणे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थांच्या विविध प्रशालांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी व्यासपीठावरून सहभागी होतील. पुढच्या पिढीला संस्कार घडविण्याचा संदेश जावा यासाठी लहान मुलामुलींकडे हे नेतृत्व दिले आहे. एक लाख रामभक्तांनी यात सहभागी होऊन रामरक्षा म्हणावी असा संकल्प आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब या उपक्रमात सहभागी होऊन रामभक्तीचे पुण्याचे वेगळे वैशिष्ट्य साऱ्या जगाला दाखवावे.” श्री लक्ष्मणाचार्य रचित “रघुपति राघव राजाराम” या मूळ पदाचे राम मंदिर पूर्ततेच्या पार्श्वभूमीवर प्रथमच सादरीकरण होणार आहे. या पदाचे संगीत श्री. आशिष केसकर यांचे असून चारुदत्त आफळे याचे गायन करणार आहेत. अभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर रामजन्मभूमीच्या इतिहासाबद्दल व आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल उद्बोधन करतील. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे रामरक्षेचे व भीमरूपी महारुद्रा स्तोत्राचे महत्व उलगडून सांगणार आहेत. प्रत्येकाला रामरक्षा व भीमरूपी महारुद्रा छापील स्वरूपात दिली जाणार आहे.
निमंत्रक हेमंत रासने म्हणाले, की “प्रत्येक रामभक्ताला या कार्यात आपला सहभाग झाल्याचे समाधान मिळावे व आपली सेवा प्रत्यक्ष रामचरणी रुजू झाल्याचे भाग्य मिळावे यासाठी या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. आध्यात्मिक पातळीवर संपूर्ण समाजाचा क्रियाशील पाठिंबा हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.” या निमित्ताने हेतूने एक विशेष अभियान राबविले जाणार आहे. प्रत्येक रामभक्ताने येताना एका कागदावर १०८ वेळा “श्रीराम जय राम जय जय राम |” हा जप आपले नाव व गाव लिहून आणायचे आहे. मैदानावर ‘श्री रामनाम कुंभ’ ठेवले जाणार आहेत, त्यात नामजप जमा केले जातील व हे सर्व नामजप एकत्रित करून या दोन संस्थांच्याद्वारे अयोध्येत श्री रामचरणी अर्पण केले जाणार आहेत.समर्थ व्यासपीठाचे सुहास क्षीरसागर म्हणाले, “रामभक्तांना स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर प्रवेशासाठी टिळक रोड कडील प्रवेश द्वाराला “श्रीराम प्रवेशद्वार” असे नाव दिले आहे. लोकमान्यनगर कडील दोन प्रवेशद्वारांना “श्री हनुमान प्रवेशद्वार” व “समर्थ श्री रामदास स्वामी प्रवेशद्वार” असे नाव दिले आहे. तर सन्मानित अतिथींना शि. प्र. मंडळी कार्यालयाजवळील मार्गावरून प्रवेश असणार आहे त्या प्रवेशद्वाराला “महर्षि वाल्मिकी प्रवेशद्वार” असे नाव दिले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून मैदानावर प्रवेश दिला जाणार आहे.”