नवी दिल्ली : निवडणुकीच्या वर्षामध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात नाही. मात्र, निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाल्यावर पूर्ण अर्थसंकल्प मांडू; असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास बुधवारपासून प्रारंभ झाला. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीच्या वर्षात पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात नाही. त्याच परंपरेचे पालन आमचे सरकार करणार असून निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही पूर्ण अर्थसंकल्प मांडू. अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या प्रगतीचा अर्थसंकल्प मांडणार असून देश सतत प्रगतीची नवीन शिखरे पार करत पुढे जाईल, असा विश्वास वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
गोंधळी खासदारांनाही पंतप्रधानांनी यावेळी सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, लोकशाही मूल्यांना फाटा देणाऱ्या सर्व खासदारांनी आत्मपरीक्षण करायला हवे की, गेल्या 10 वर्षात त्यांनी काय केले. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांचा गोंधळ आठवतही नसेल. मात्र, सभागृहात उत्तम विचार मांडून त्याचा देशास झालेला लाभ मतदार दीर्घकाळ स्मरणात ठेवतात. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे पश्चात्ताप करण्याची आणि सकारात्मक पाऊल टाकण्याची संधी आहे. त्यामुळे अशा सर्व खासदारांनी आत्मपरिक्षणाची ही संधी सोडू नये, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.