मुंबई : हिंमत असेल तर मनोज जरांगेंनी मंडल आयोगाला चॅलेंज करुन दाखवावं, असं खुलं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे. दगाफटका झाला तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार, असे वक्तव्य मनोज जरांगेंनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी हे चॅलेंज दिलं आहे.
"मराठा आरक्षणासंबंधीचा कायदा टिकवण्याची जबाबरदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सगेसोयऱ्यांच्या कायद्यात दगाफटका झाला तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार," असे मनोज जरांगे म्हणाले होते.
यावर छगन भुजबळ म्हणाले की, "मनोज जरांगे ३ कोटी मराठ्यांना मुंबईत आणणार होते. पण ३ कोटी किती आहे हे वाशीमध्ये सगळ्यांनी बघितलं. ज्यांना लाख आणि कोटी समजत नाही ते मंडल आयोगाला विरोध करतात. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला चॅलेंज करुन दाखवावं."
त्यानंतर यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "भुजबळांना मराठ्यांची संख्या मोजण्यासाठी पुलावर उभं राहा असं सांगितल होतं. ६४ किलोमीटरची मराठ्यांची रांग होती. एकूण २७ टक्के मराठे आले होते. ते पुलावर थांबलेच नाहीत तर त्यांना ३ कोटी मराठे कसे दिसतील? त्यामुळे भुजबळांना आणखी समजावून सांगा की, मला चॅलेंज देऊन गोरगरिबांचं वाटोळं करु नका. त्यांनी जर पुन्हा अशा काड्या केल्या तर मंडल आयोग कोर्टाने स्वीकारलेला नाही, मी शंभर टक्के मंडल आयोगाला चॅलेंज करेन," असेही ते म्हणाले.