श्रीराम मंदिर ते विकसित भारत - अभिमानास्पद वाटचाल

    21-Jan-2024
Total Views | 44

Sunil Deodhar


श्रीरामजन्मभूमीवर साकारलेले भव्य मंदिर हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. कोट्यवधी भारतीयांच्या भक्तीचे, शक्तीचे हे प्रतीक अयोध्येत साकारत असताना, आपल्या देशाचीही वाटचाल विकासाकडे गतीने होत आहे. म्हणूनच श्रीराम मंदिर ते विकसित भारत ही वाटचाल सर्वस्वी अभिमानास्पद अशीच...
 
सार्‍या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न आज अयोध्येत साकार होत आहे. श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामांचे मंदिर व्हावे, ही आपल्या सर्वांची इच्छा आज पूर्ण होत आहे. प्रत्येक भारतीयाचे मन आनंदाने शब्दशः भरून गेले आहे. हा आनंद संकल्पपूर्तीचा आहे. लाखो कारसेवक आणि कोट्यवधी भारतीय ङ्गरामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगेफ ही घोषणा देत होते. हीच भावना मनात अनेक वर्षे बाळगून होते. ती घोषणा साकार होताना पाहणे हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे.
 
आत्मविश्वास आणि आत्मभान
 
श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्मिती कार्याच्या शुभारंभ कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी फार सुरेख विचार मांडला होता. मी साऱ्या देशात पाहतो आहे की, "देशभर सर्वत्र आनंदाची लहर आहे. शतकानुशतकांच्या इच्छेची परिपूर्ती झाल्याचा आनंद आहे. परंतु, आज सर्वांत मोठा आनंद हा आहे की, भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी जो आत्मविश्वास आणि जे आत्मभान आवश्यक होते, त्याचे सगुण साकार अधिष्ठान बनण्याचा शुभारंभ होत आहे," असे त्या कार्यक्रमात डॉ. मोहनजी भागवत म्हणाले होते.
 
श्रीराम मंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल. हे मंदिर कोट्यवधी लोकांच्या सामूहिक संकल्प शक्तीचे प्रतीक राहील. हे मंदिर साकार झाल्यानंतर केवळ अयोध्येची भव्यताच वाढेल असे नाही, तर या क्षेत्राचे संपूर्ण अर्थतंत्रच बदलून जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या कार्यक्रमात व्यक्त केला होता. या दोघांनी त्यावेळी मांडलेले विचार किती मननीय होते, त्याची प्रचिती आपणा सर्वांना येत आहे.
 
परंपरा आणि विकासाची सांगड
 
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या गतीने आणि विकासाची जी एक संकल्पना समोर ठेवून अयोध्येचा विकास केला जात आहे, ते सारे काम थक्क करणारे असेच आहे. श्रीरामांचे अत्यंत भव्य मंदिर साकार होत आहे. अयोध्या आणि परिसराच्या विकासामुळे तेथील अर्थव्यवस्थेला फार मोठी गती प्राप्त होताना दिसते आहे. धार्मिकता, आस्था, वारसा, परंपरा यादृष्टीने आणि पर्यटनाच्याही दृष्टीने अयोध्येचे महत्त्व वाढणार आहे. लाखो पर्यटक येथे येतील. स्वाभाविकच त्यामुळे या नगरीतील आर्थिक उलाढाल वाढेल. अयोध्येत साकारलेला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानक ही मोदी सरकारच्या उत्तम संकल्पनेच्या अंमलबजावणीची उदाहरणे ठरत आहेत. तेथील रस्ते प्रशस्त केले जात आहेत. भारताच्या परंपरा जपत असताना, त्याच्याच जोडीला विकासाचीही दारे खुली करत होणारी मार्गक्रमणा हे मोदी सरकारचे खरे वैशिष्ट्य आहे.
 
संकल्पना एक, रूपे अनेक...
 
श्रीराम मंदिर ते विकसित भारत ही वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे, हेही आपल्याला अनुभवायला मिळत आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' हाच या विकासाचा मंत्र आहे. देशातील चार कोटी नागरिकांना 'पंतप्रधान आवास योजने'अंतर्गत पक्के घर मिळाले आहे आणि त्यामुळे त्यांना "मेरा भारत बदल रहा हैं' याची प्रचिती आली आहे. 'वंदे भारत' सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांमुळे हजारो प्रवाशांना रोज विकसित भारताचा अनुभव मिळत आहे. 'हर घर नल से जल' या योजनेत देशातील ११ कोटींहून अधिक घरांमध्ये नळातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. या नागरिकांनाही विकसित भारताचा अनुभव मिळत आहे.
 
देशातील विमानतळांचा आणि रेल्वे स्थानकांचा होत असलेला विकास, महामार्गांचे रुंदीकरण, नव्या पुलांची बांधणी, वेगवान वाहतुकीसाठी अनेक महानगरांमध्ये आणि शहरांमध्ये सुरू झालेली मेट्रो ही सारी विकसित भारताचीच साक्ष आहे. मोदी सरकारच्या सर्व योजनांमधील सर्व सहभागींना दिला जाणारा लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो, हे सरकारच्या प्रभावी कार्यशैलीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य. हेही विकसित भारताचेच एक रूप. थोडक्यात म्हणजे, या देशातील प्रत्येक नागरिक समोर ठेवून त्याच्यासाठी जे जे म्हणून करणे शक्य आहे, ते अत्यंत प्रभावीरित्या करायचे हे या सरकारच्या कामाचे सूत्र आहे. विकसित भारत ही मोदी सरकारची मुख्य संकल्पना आहे आणि या संकल्पनेची अनेकविध रूपे नागरिक अनुभवत आहेत.
श्रीराम हे देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत आणि त्यामुळेच अयोध्येत श्रीरामांचे भव्य मंदिर साकारत असताना, आज सारा भारत देश आनंदोत्सव साजरा करत आहे. श्रीराम मंदिर हे आमच्या आस्थेचे केंद्र झाले आहे. त्याच्याच जोडीला या देशाचाही विकास गतीने होत आहे. त्यामुळे श्रीराम मंदिर ते विकसित भारत या प्रवासाचे आपण सारे साक्षीदार ठरत आहोत. हा आनंद खरोखर अवर्णनीय असाच म्हणावा लागेल.
 
- सुनील देवधर 
(लेखक राम मंदिर आंदोलनातील कारसेवक व भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत.)


अग्रलेख
जरुर वाचा