कौसल्येच्या उदरातून रघुवंशाचा दीपक प्रकट झाला. त्या भाग्यनिधानाला आपल्या कुशल हातांनी झेलत धात्री उद्गारली, 'पुत्र, पुत्र!' वैद्यराजांनी आनंदाने हात जोडले आणि धात्रीला पुढील कर्मांचे स्मरण देण्याकरिता सूचना दिल्या. राजज्योतिषी भराभर कुंडली मांडू लागले. चैत्र शुद्ध नवमी, पुनर्वसू नक्षत्र, कर्क लग्न, माध्यान्ह काल... एकामागून एक ग्रहांची स्थिती ते पाहत होते. सूर्य, मंगळ, शनी, गुरु, शुक्र सारे आपापल्या उच्चस्थानी विराजमान होते... अपूर्व स्थिती, दैवयोग ही तर देव कुंडली!!!
अयोध्या... रघुवंशाच्या राजांनी परिश्रमाने वसवलेली, फुलवलेली अतिशय संपन्न, समाधानी, अपराजित नगरी. शरयू तीरावरच्या कोशल साम्राज्याची राजधानी असलेली सुरचित, सुरम्य, सुसंस्कृत नगरी! शरयूच्या जळावर तृप्तीचा तवंग होता. तिच्या जळात आनंदाची सहस्रकमळे सदैव डोलत. अयोध्येत ना कसला भेद, न कुठले द्वैत. समृद्धी आणि समाधान, शौर्य आणि क्षमा, पराक्रम आणि औदार्य, सौंदर्य आणि आरोग्य यांचे अद्वैत आणि अगदी तसेच अद्वैत राजा आणि प्रजेचे. त्यामुळेच तर राजाच्या मनातलं निपुत्रिक असण्याचं शल्य सार्या जनतेला बोचत होतं. राणीच्या मनातल्या औदासिन्याचं सावट नगरीच्या आसमंतावर पसरून राहिलं होतं. हे झालं पृथ्वीवर. तिकडे देवलोकावरही सावट होतं, वेगळ्याच चिंतेचं.
ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे महाबलाढ्य राक्षसराज रावण प्रचंड मातला होता. देव, दानव, असुर, गंधर्व यांच्यापासून त्याला अभय होते. ब्रह्मदेवांसह समस्त देवांनी श्रीविष्णूंना साकडं घातलं. मानव अवतार घेऊन रावणाचा विनाश हाच एकमेव उपाय यावर एकमत झालं आणि अयोध्यापती दशरथ राजा पुत्रप्राप्तीच्या हेतूने यज्ञ करत आहे, त्या यज्ञाचे फळ म्हणून भगवान श्रीविष्णू त्याच्या वंशात जन्म घेतील, हेही निश्चित झालं! आणि मग एकाचवेळी स्वर्ग व पृथ्वी दोन्ही ठिकाणी आकारास येऊ लागली एक महायोजना! श्रीविष्णूंच्या अवताराला साहाय्यक होण्यासाठी विविध देवता आपले अंशावतार सिद्ध करू लागल्या.
इकडे राजा दशरथाला पुत्र आणि अयोध्येला समर्थ वारस मिळावा, याकरिता सर्व ऋषीगण, वैद्यराज, ब्रह्मवेत्ते सारे मिळून विचारविनिमय करू लागले आणि उपाय ठरला. प्रथम अश्वमेध यज्ञाद्वारे राजाचे सामर्थ्य सिद्ध करून अनुकूलता निर्माण करणे आणि त्या पाठोपाठ पुत्रकामेष्टी यज्ञ अर्थात शास्त्रशुद्ध पद्धतीने परिपूर्ण चिकित्सा. देह, मन, आत्मा आणि ग्रहांची शुद्धी, पुष्टी करून त्यांच्या शक्तीला विशिष्ट ध्येयाकडे केंद्रित करणे. ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या साहाय्याला होते आयुर्वेद चिकित्सा पारंगत कश्यप, ऋष्यशृंगहे ऋषी. सूक्ष्मगामी औषधी धूम्र ज्यातून निर्माण होणार होता, त्या यज्ञात राजाने आहुती द्यायची होती भौतिक इच्छा, वासना, अपूर्णता यांची. त्याकरिता यज्ञापूर्वी संकल्प घ्यायचा होता संयम, ब्रह्मचर्य, पावित्र्य आणि धर्माचरण याचा. योजना समजून घेताच राजा उत्साहित झाला आणि ही शुभवार्ता सांगायला सर्वप्रथम महाराणी कौसल्येच्या महाली धावतच गेला.
अस्ताला निघालेल्या सूर्याकडे नजर लावून, गवाक्षाच्या कडेला टेकून कौसल्या उभी होती. सौम्य, सात्विक, सोशिक. वयाने पक्व झालेले सौंदर्य, सुबत्ता आणि स्थैर्य यानं जरा सैलावलेलं शरीर, खोलवर असलेल्या शल्याच्या वेदनेने काठोकाठ भरलेले करुण, अथांग डोळे... राजाच्या मुद्रेवरचा उत्साह पाहून ते डोळे आधी साश्चर्य हसले आणि राजाचा संकल्प ऐकून सानंद पाणावले! दोघांनी हातात हात घेऊन मनोमन संकल्प केला आणि या प्रयत्नाला यश येवो, अशी प्रार्थनाही. तिथून पुढच्या काळाला तर पंखच फुटले! राजा व राणी यांचा शास्त्रशुद्ध आहार-विहार, औषधी सेवन, अनुष्ठाने यात ते दंग झाले. अश्वमेधाचा संदेश घेऊन निघालेला अश्व संपूर्ण यश घेऊनच परतला. आता यज्ञ. त्याची सिद्धता तरी किती!
असंख्य शिल्पी, कारागीर, सेवक, यज्ञकर्मी, ब्राह्मण, ज्योतिषी, शास्त्रवेत्ता, बहुश्रुती, गायक, नर्तक सारेच सिद्धतेला लागले. यज्ञ रचना ठरली. भव्य प्रांगणात उत्तम प्रकारे केलेल्या रेखीव सुवर्ण इष्टिकांनी यज्ञवेदी सिद्ध झाली. त्यात अग्नी प्रज्वलित झाल्यावर खाली पाहत उड्डाण करणार्या गरुडाची आकृती भासमान होत होती. वेदपारंगत ऋषींचे पौरोहित्य, मधुर सामगायन, शुद्ध मंत्रोच्चार, विविध देवतांचे आवाहन, त्यांचे हविर्भाग याने वातावरण भारून गेले. प्रत्यक्ष यज्ञाकरिता राजे, ब्राह्मण, क्षत्रीय, शूद्र सर्वांना त्यांचे मित्र, नातलग, स्नेही यांसह निमंत्रण होते. त्यांच्यासह तापस, श्रमण, वद्ध, रुग्ण, स्त्रिया, बालके सर्वांना भोजन, वस्त्रे, आभूषणे दिली जात होती. अगणित दाने केली गेली. सर्वत्र तृप्तीचा दरवळ पसरला आणि राजाला आशीर्वाद मिळाला, चार अपर सद्गुणी पुत्रप्राप्तीचा.
आता उत्सुकता होती पुत्रकामेष्टी यज्ञाची. अत्यंत विधीपूर्वक होणार्या या शास्त्रशुद्ध यज्ञाचे लक्ष्य सुदृढ, सुलक्षणी संततीची प्राप्ती हे होतेच, पण राजर्षी वसिष्ठ यांनी देवसंकल्पाची स्पष्ट कल्पना देत राजा व राणी यांची मनोभूमीदेखील सिद्ध करवून घेतली होती. आता ते केवळ पुत्रप्राप्ती करता यज्ञ करणार नव्हते, तर समाजाच्या कल्याणाच्या एका दिव्य संकल्पाचे वहन करत होते. या विचाराने अधिकच दृढ होऊन, मोठ्या उत्साहाने, मनःपूर्वकतेने यज्ञ पार पडला. तृप्त मनाने, समाधानाने अंतिम हविर्भाग सुरू झाले.
मंत्रोच्चार आणि घृताच्या धारा, समिधा यांनी तृप्त होऊन साक्षात अग्निदेव त्या यज्ञातून प्रकट झाले. विशाल, प्रकाशमान, शुभलक्षणी असा तो महापुरुष हातात सुवर्णस्थाली घेऊन आला. त्यात होते दिव्य, सिद्ध, ओजस्वी असे पायस. 'ही खीर राण्यांना दे' असे सांगून अग्निदेव अंतर्धान पावले. आनंदलेला राजा दशरथ ती खीर घेऊन आला.
सर्वप्रथम महाराणी कौसल्येला तिचा वाटा मिळाला. अन्य दोघींनीही तो प्रसाद सेवन केला. अश्वमेधाने जागे झालेले राजाचे पौरुष, पूर्वकर्मे व यज्ञकर्म यांनी झालेली अंतर्बाह्य शुद्धी, विशाल ध्येय समोर ठेवून केलेला दृढ संकल्प, परम शक्तीवरची श्रद्धा, ऋषींचे आशीर्वाद, जनमानसाचे प्रेम आणि देवालोकाची योजना ..इतक्या सार्या गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याचे फळ मिळणार होतेच!
अयोध्येच्या राणीला मातृत्वाची चाहूल लागली. कौसल्या आनंदाने वेडावून गेली. गर्भ स्थापित झाल्याची लक्षणे राण्यांमध्ये दिसू लागताच सारी सृष्टी नवचैतन्याने भरून गेली! अयोध्येत अलौकिक आमोद व शांती जाणवू लागली. राण्यांचे मनोरथ आनंदाने पुरवले जाऊ लागले. दिवस, मास, ऋतू भराभर सरत होते. राण्यांना अनेक शुभ शकुन होत, शुभ स्वप्ने दिसत. कधी कमळांनी दाटलेली पुष्करिणी दिसे, कधी विष्णूच्या वामन अवतारातल्या बटूमूर्ती दिसत. कौसल्येला पडणारी स्वप्ने अधिकच अद्भुत होती. तिला कधी त्या यज्ञीय आकृतीसारखा सुवर्णपंखी गरुड तिला वाहून नेताना दिसे, कधी सात ऋषी तिची सेवा करताना दिसत. साक्षात विष्णुपत्नी लक्ष्मी तिचे कोड पुरवताना दिसली, तेव्हा कौसल्येचे मन भारावलेचः वारंवार शंख-चक्र-गदा-खड्गधारी चतुर्भुज मूर्ती दिसू लागली, तेव्हा दशरथाला अपार हर्ष झाला. राणी तर त्या रूपाच्या ध्यानातच इतकी मग्न झाली की अन्य कोणता विचार मनाला स्पर्शू शकेना!
वर्षाकाळ संपला, शीतकाळ येऊन गेला. कौसल्येला आता गर्भाचा भार आणि उत्सुकता याचा ताण सोसवेना. माघ सरत आला. निसर्गात वसंताची चाहूल लागली. शुष्क फांद्यांवर अंकुर डोकावू लागले. तर्हेतर्हेच्या वृक्षांच्या मोहोराचा मिश्र दरवळ, कोकिल पक्ष्याचे कूजन याने दिवस चैतन्यमय झाले. फाल्गुन अर्धा उलटला. आता दिवस-रात्रीचे सारे प्रहर अनुभवी धात्रीसोबत राहू लागली. आत्ममग्न कौसल्येच्या मुद्रेवरचे तेज दिवसागणिक वृद्धिंगत होत होते. दशरथाचे राजगृह सजग, सिद्ध झाले... आता केवळ प्रतीक्षा!
नऊ मास भरले. सुईणी, वृद्धा, ऋषिगण, वैद्य सारे निश्चिंत झाले. आता कधीही प्रसूती होवो, आता सारा काळ अनुकूलच! आता सारेच अधीर... दशरथ राजा पुत्रसुख अनुभवण्यास उत्सुक, प्रजा आणि देवलोकाची उत्कंठाही शिगेस पोहोचलेली.
चैत्र महिना... वाटिकांमधल्या वृक्षांनी पोपटी, ताम्र असे नवपल्लव धारण केले. वातावरण हळूहळू उष्ण होऊ लागले. चैत्राचा एक सप्ताह सरला. अष्टमीचा दिवस. कौसल्याराणीच्या मुखावरची आभा आणि तिची ती सुभग तंद्रा... अष्टमीच्या चंद्राशी स्पर्धा करणारे तिचे तेजाळ मुखबिंब पाहत चंद्रही त्या रात्री गवाक्षात जरा अधिक रेंगाळला... पहाटे वाहणारे वारे जपून वाहू लागले, मंद निःश्वास टाकल्यासारखे. सूर्य उगवायच्या आधीच फुलांना उमलण्याची घाई झाली. आपल्या पर्णांची सळसळ रोखून वृक्ष अगदी स्तब्ध उभे राहिले, कुठल्याही क्षणी मंगल ती वार्ता येईल...
नवमी तिथी उजाडली. सकाळपासून कौसल्येला प्रसववेदना जाणवू लागल्या. अंतःपुरात सुईणी सिद्ध झाल्या. कक्षाबाहेर अस्वस्थ राजा, सोबतीला अमात्य आणि स्वतः राजर्षी वसिष्ठ उपस्थित झाले. वैद्यराज राजज्योतिषासह आतल्या कक्षातच पडद्याच्या बाहेर थांबून होते. कौसल्या राणी मनोमन स्वप्नात दिसणार्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान करत होती. आता तिला ओढ लागली होती नवमास उदरात वाढलेला दिव्य शिशु प्रत्यक्ष पाहण्याची...
कौसल्येचा अस्फुट चित्कार ऐकून सुईणी धावल्या. कक्षातल्या दिव्यांच्या वाती सरसर मोठ्या केल्या गेल्या. उष्ण जल, सिद्ध औषधी, सूत्र-धागे, शस्त्रे, तलम वस्त्रे सारं सिद्ध होतंच आणि बरोबर सूर्य माथ्यावर असताना तो क्षण आला! आकाशाच्या निळ्या पटातून, प्रभातीच्या गुलाबी आभेतून, कोवळे तेजस्वी सूर्यबिंब प्रकट व्हावे, तितक्या सहजतेने कौसल्येच्या उदरातून रघुवंशाचा दीपक प्रकट झाला. त्या भाग्यनिधानाला आपल्या कुशल हातांनी झेलत धात्री उद्गारली, ङ्गपुत्र, पुत्र!फ वैद्यराजांनी आनंदाने हात जोडले आणि धात्रीला पुढील कर्मांचे स्मरण देण्याकरिता सूचना दिल्या. राजज्योतिषी भराभर कुंडली मांडू लागले. चैत्र शुद्ध नवमी, पुनर्वसू नक्षत्र, कर्क लग्न, माध्यान्ह काल... एकामागून एक ग्रहांची स्थिती ते पाहत होते. सूर्य, मंगळ, शनी, गुरु, शुक्र सारे आपापल्या उच्चस्थानी विराजमान होते... अपूर्व स्थिती, दैवयोग ही तर देव कुंडली!!! धावतच ते राजाकडे निघाले.
धात्रीच्या अवघ्या देहात सूक्ष्म कंप भरला होता. त्या सुकुमाराचे आधी अपमार्जन करावे की आधी त्याचे मुख कौसल्येला दाखवावे हे तिला सुचेना! कक्षातले दीप मंद झाले की, आपल्या हातातल्या या शिशुरत्नाच्या तेजानं आपले नेत्र दीपत आहेत हेही तिला उमगेना. स्वच्छता संस्कार करून, मऊ वस्त्रात गुंडाळून ती तो तेजपुतळा कौसल्येच्या कुशीत ठेवू गेली, तो राणी मंचावर उठून बसलेली. हात जोडलेले, डोळ्यातून अश्रूची माळ... तिला तिच्या समोर, एका दिव्य प्रकाशाच्या झोतात, प्रत्यक्ष श्री विष्णू आपल्या चतुर्भुज शस्त्रसज्ज रूपात उभे दिसत होते. पुन्हा पुन्हा ती विनवत होती... 'प्रभू,आपल्या या रूपाचे वर्णन तरी कसं करू, या भाग्याकरिता तुम्हाला अर्पण तरी काय करू... नवमास या उदरात राहिलात, माझी कूस धन्य झाली, जीवन सार्थ झाले. आता तरी बाल रूप धारण करा आणि मला स्तन्य अर्पण करण्याचे भाग्य द्या!'
त्या क्षणी दुंदुभीसारखा कणखर, पण अती मधुर रूदनाचा स्वर तिच्या कानावर पडला आणि ती भानावर आली. हळूच तिने डोळे उघडले आणि आवेगाने हात पुढे केले. आनंदाने विभोर झालेल्या धात्रीने अलगद ते पुत्रधन मातेच्या स्वाधीन केले आणि ती बाजूला गेली. कौसल्या साश्रू नयनांनी ते मोहक बालरूप निरखत होती. लालबुंद तेजस्वी कांति, पण सूर्याची दाहकता नाही, तर चंद्राची सौम्यता. पक्व झालेले दाडिम फुटून आतला रक्तिमा दिसावा तसे लालचुटुक ओठ, उमलू पाहणार्या कमळकलिकांसारखे अर्धोन्मीलित नेत्र... तिला पाहत राहवं वाटत होतं, पण आता तिला बाकी सगळ्याचा विसर पडला होता. तिच्या शरीराचा अणुरेणू त्याला छातीशी धरायला उत्सुक होता. अधीर झालेल्या दुग्धाला त्या श्रीमुखात जाण्याची घाई झाली होती. उत्कट आवेगाने तिने आपल्या नवजाताला कवटाळले आणि एका अपूर्व तंद्रीत ती हरवून गेली.
इकडे बाळाचा स्वर बाहेर पोहोचला. अधीर झालेला राजा कक्षात धाव घेणार, तोच ङ्गपुत्र.. पुत्र..फअशा आरोळ्या देत दासी बाहेर धावल्या. क्षणार्धात ही आनंदवार्ता राजभवनात आणि बाहेरही पोहोचली आणि सर्वत्र एकच आनंद कल्लोळ उसळला! स्वर्गलोकात या वार्तेची आतुरतेने वाट पाहणारे समस्त देवगण निर्धास्त झाले. त्यांनी आनंदाने वाद्यांचा इतका गजर केला की, त्याचे स्वर आणि त्यांनी आनंदाने उधळलेली पुष्पे, थेट पृथ्वीपर्यंत पोहोचली!
राणीला हलकेच हाक मारून तिच्या अनुज्ञेनंतर वैद्यराज कक्षात आले. रीतीप्रमाणे त्यांनी त्यांचे कर्तव्य करायला आरंभ केला. हलक्या हातांनी मऊ वस्त्राची गाठ सोडवली आणि शिशूला मोकळे केले. हातपाय नाचवत ते विश्वचैतन्य पूर्ण नेत्र उघडून त्यांच्याकडे पाहू लागले. वैद्यराजांचे हात सवयीची कामे करत होते, पण चित्त त्या दिव्य दर्शनाने उचंबळून आले होते. सर्व अवयव सुस्थित, प्रमाणबद्ध. तेजःपुंज श्यामलकांती, रेखीव चर्या, कमलनेत्र, आजानुबाहू! हात पायांच्या तळव्यावर शुभ चक्रे... दिव्य लक्षणांनी युक्त, सर्वलोकवंदित, साक्षात जगदीश्वर... धन्योऽहम...धन्योऽहम असं म्हणत त्या बालमूर्तीला पुन्हा पुन्हा वंदन करत ते बाहेर गेले.
कौसल्येने आता कुठे तिच्या आत्मजाला निरखून पाहिले. तिच्या नयनसंपुटात ते गोजिरवाणे रूप मावेना. आषाढातल्या कृष्णमेघासारखी सावळी कांती... उत्फुल्ल निळ्या कमळांसारखे डोळे, त्याला नाजूक आरक्त कडा... मुखमंडलाला शोभायमान करणारे दाट, कुरळे जावळः विशाल कपाळावरून उतरणारी रेखीव नासिका, रसरशीत लालबुंद कोमल जिवणी, निग्रह दर्शवणारी हनु... लांबसडक पुष्ट हात पाय, लालबुंद कमळाच्या पाकळीसारखे तळवे आणि सोनचाफ्याच्या कळीस रत्ने जडवावीत तशी लांबसडक बोटे. चंदन कस्तुरी पारिजातापेक्षा अधिक मोहवणारा दिव्य अंग गंध.. कौसल्येला आपली दृष्टी त्याच्यावरून काढावीशी वाटत नव्हती..
प्रसूतीचे श्रम, निद्रा, भूक काही जाणवत नव्हतं. महाराणी असूनही आतापर्यंत असं संपूर्ण, निखळ सुख तिच्या वाट्याला आलं नव्हतं. आयुष्यातल्या सार्या वंचना, अपूर्णता याचा परिहार करणार भाग्य तिच्या ओटीत आलं होतं. अखिल विश्वात एकमेव अशा भाग्याची ती धनी झाली होती. विश्वमाता, देवमाता झाली होती.
राजगृहाने ही आनंदवार्ता वाद्यांच्या गजरात जाहीर केली होती. तो कल्लोळ ऐकताच राजाच्या गोशाळेतील गोमातांना पान्हा फुटला. गोक्षीराच्या धारा भूमीवरून वाहू लागल्या. वृक्ष आनंदाने डोलू लागले, फुले अधिकच टवटवीत झाली आणि अधिकच उत्कटपणे रंग गंध उधळू लागली. राजगृहाबाहेर नागरिकांनी अलोट गर्दी केली. लोक आनंदाने विभोर होऊन राजपथावर येऊन वाद्यांच्या गजरात नृत्य करत होते, एकमेकांना आलिंगने देत होते, गात होते, स्वयंस्फूर्तीने वास्तू, पथ, नगर शृंगारत होते. आनंदाने उधळलेली फुले संपली म्हणून लोक आपल्या संग्रहातील मोत्ये, रत्ने, माणके, आभूषणे उधळू लागले. या आनंदापुढे त्यांना अन्य कशाकशाचे मोलच नव्हते, जणू हा आनंदाचा भार सहन न होऊन पृथ्वीही आंदोळू लागली.
राजवैद्य, राजज्योतिषी यांच्याकडून वृत्त ऐकून राजा दशरथ कौसल्येच्या कक्षात आला. रत्नमंचकावर तृप्तपणे विसावलेली महाराणी कौसल्या, तिच्या कुशीत निजलेले ते सुखनिधान... त्याला देवापित्याचे महाभाग्य देणारा तो देवांश... राजा आला, त्याने जगत्पालकाचे ते बालरूप आपल्या बळकट हातात घेतले आणि तो उद्गारला,
हे चिद्रत्ना, घनश्यामा, आनंदधामा, विश्वविश्रामा, प्रणाम, हे जगदीश्वर, हे पूर्णकाम!
हे तर माझे भाग्य, माझ्या प्राणांचा प्राण, माझा ध्यास, माझा श्वास..
हे समूर्त ब्रह्मज्ञान, सुनीळ दीप्तिमान, जीवाचे सुखनिधान!
हा नेत्रास आराम, हा रूपाने अभिराम, हा तर राम ! श्रीराम! राम, राम..राम !
(आधार-वाल्मिकी रामायण अयोध्या कांड, बाल कांड,तुलसी रामायण,रघुवंश.)
- विनीता तेलंग