राम मंदिर : हिंदू अस्मितेचे शक्तिपीठ

    21-Jan-2024
Total Views |

Mangalprabhat Lodha

शतकांच्या लढ्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाचा क्षण अनुभवण्याचे भाग्य मला लाभत आहे, यातच माझे जीवन धन्य झाले. हा सोहळा अनुभवणं हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असून, हे स्वप्न आता साकार होत आहे. यापुढील काळात दिवाळी, दसरा आणि सगळेच सण प्रभू श्रीरामांच्या आगमनासह भारतभूमीत सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी जल्लोषात साजरे केले जातील. ५०० वर्षांची प्रतीक्षा, अनेक रामभक्तांचे बलिदान, भारतद्वेष्ट्या शक्तींविरूद्ध संघर्ष आणि सत्यासाठीचा लढा हा कधीही विसरता येणार नाही!
 
प्रभू श्रीराम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे फक्त आदर्श राजा नाही, तर आदर्श व्यक्ती, आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत म्हणजे प्रभू श्रीराम! त्यामुळे साहजिकच सर्व हिंदू बांधव मंदिर निर्माणकार्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत होते. कोणी मंदिरासाठी विटा पाठवल्या, कोणी कारसेवक म्हणून गेले, कोणी मंदिर होईपर्यंत कित्येक वर्षं मौन बाळगले, तर कोणी आपल्या बुलंद आवाजातून समाजाला एकत्र केले. अशा श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला त्रिवार वंदन!
 
जे काही काम करायचे, ते संपूर्ण निष्ठेने आणि सर्वस्व त्यात झोकून द्यायचे, हीच माझी पद्धत. त्यामुळे माझ्या तरुणपणी व्यवसाय क्षेत्रात उतरल्यावर समाजकार्यापासून मी थोडा दुरावलो गेलो. त्यानंतर पुन्हा समाजकार्याशी संबंध आला तो रामजन्मभूमी आंदोलनामुळेच! शेषाद्री चारीजींनी मला रामजन्मभूमी आंदोलनाच्या समितीचा मलबार हिल भागाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यावेळी माझ्या वडिलांकडून राजस्थानमधून एक जुनी गाडी आणली आणि त्यावर माझ्या कार्यालयातच तयार केलेले राम मंदिराचे भव्य मॉडेल लावले. तेव्हा जोश, उत्साह, आनंद इतका होता की, अनेक महिने माझ्या कुटुंबासह मी माझी जुनी गाडी आणि त्यावर मंदिराचे मॉडेल घेऊन फिरत होतो. या आंदोलनादरम्यान शिलापूजनाचे मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केले. अनेक कार्यक्रमांदरम्यान मोठी आंदोलनेही झाली. या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कक्षात घुसून, त्यांच्या टेबलवर आम्ही शिलापूजन केले होते. ग्रँट रोड स्थानकात आम्ही रेल रोको केले होते. रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवांवेळी मी अयोध्येत गेलो होतो, दोन्ही वेळा मला अटकही झाली. पुढे जेव्हा ढाँचा पाडला गेला, तेव्हा रात्रीच आम्ही सर्वजण तिथून निघालो. मला अजूनही आठवतो तो दगड, जो मी या आंदोलनाची आठवण म्हणून रामजन्मभूमीतून उचलला होता.
 
माझ्यासारखे असे असंख्य लोक असतील, ज्यांनी आपल्या मुठीत त्या पावनभूमीची माती घट्ट धरून ठेवली. मनामध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर पुन्हा निर्माण व्हावे, ही इच्छा घट्ट धरून ठेवली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली करोडो हिंदूंचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्याकाळी रामजन्मभूमी आंदोलनातील एक सच्चा स्वयंसेवक पुढे भारताचा पंतप्रधान बनेल आणि भारतीयांचे हे अतिशय जिव्हाळ्याचे स्वप्न पूर्ण करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. ज्या रामजन्मभूमी आंदोलनातून नरेंद्र मोदी हे नाव सर्वत्र पुढे आलं, त्यांची मेहनत फक्त आपण सर्वांनीच नाही, तर खुद्द प्रभू श्रीरामांनीसुद्धा पाहिली आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा आशीर्वाद त्यांना दिला. सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करतील आणि सत्कर्म आणि फलश्रुतीचे वर्तुळ पूर्ण होईल.
 
राम मंदिराचे निर्माणकार्य हा हिंदू अस्मितेचा, भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रश्न होता आणि हे निर्माणकार्य होणे, ही आपल्या देशाच्या एकत्मतेसाठी गरज होती. कोणत्याही देशाला प्रगतीच्या वाटेवर नवी उंची गाठायची असल्यास, त्याला आपला वारसा जपावा लागतो. राष्ट्राच्या संस्कृतीची ज्योत निरंतर तेवत ठेवावी लागते. हाच वारसा, आपली संस्कृती आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवते, अविरत पुढे चालत राहण्याची प्रेरणा देते. याच विचारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सनातन धर्म आणि विकासाची सांगड घालत भारत विश्वगुरू होण्यास सज्ज आहे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम गेली अनेक वर्षं एका तंबूमध्ये वास्तव्यास होते.
 
आज पक्के घर फक्त प्रभू श्रीरामांना नाही, तर देशातील चार कोटी गरिबांनासुद्धा मिळाले आहे. आज अयोध्येत फक्त राम मंदिर नाही, तर त्यासह महर्षी वाल्मिकी आंतराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनसुद्धा बनवण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांचे मंदिर पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक अयोध्येच्या पावन भूमीत येतील. येणार्‍या लोकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन, येथे हजारो कोटी रुपयांची विकासकामे संपन्न होत आहेत. विकासकामांद्वारे अयोध्या एक ङ्गस्मार्ट सिटीफ म्हणून उदयास येईल आणि फक्त उत्तर प्रदेशचं नाही, तर देशाच्या विकासाला गती प्राप्त करून देईल. आज येथे नवीन रस्ते निर्माण, रस्त्यांचे रुंदीकरण, मूलभूत सुविधांचे उन्नतीकरण, पुलांचे बांधकाम, अयोध्या आणि सभोवतालच्या जिल्ह्यांना जोडण्यासाठी दळणवळणाच्या व्यवस्थेत सुधारणा युद्धपातळीवर सुरू आहे. अयोध्येचे पर्यटनाच्या दृष्टीने येत्या काळात महत्त्व वाढेल, हे व्यवसाय क्षेत्रानेसुद्धा ओळखले आहे. त्यामुळे नवे व्यवसाय, रोजगार निर्माण होतील, आर्थिक उलाढाल वाढेल आणि अर्थव्यवस्थेची चाकं पहिल्यापेक्षा कित्येकी पट वेगाने फिरतील.
 
प्रभू श्रीरामांचे मंदिर हे हिंदू अस्मितेचे आणि हिंदू धर्मासह राष्ट्राच्या प्रगतीला ताकद देणारे शक्तिपीठ आहे. प्रभू श्रीराम जेव्हा रावणाचा वध करून १४ वर्षांचा वनवास संपवून, पुन्हा अयोध्येस परतले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दीपावली साजरी केली गेली. आज सर्व देशवासीयांना मी आवाहन करतो की, प्रभू श्रीराम ५०० वर्षांनी पुन्हा एकदा अयोध्येत परत येत आहेत, हा उत्सव दिवाळी इतक्याच जल्लोषात साजरा करण्यासाठी एकत्र येऊया. घरोघरी दिव्यांची रोषणाई करून आपल्या राजाचे स्वागत करूया. आपल्या सभोवतालच्या मंदिरांची साफसफाई करूया, रामभक्तांच्या बलिदानाला आदरांजली अर्पण करूया. नव्या भारताची ही नवी अस्मिता आहे, तिला जपण्यासाठी हिंदू म्हणून एकजुटीने सदैव उभे राहूया! 
जय श्रीराम!
 
- मंगल प्रभात लोढा 
(लेखक महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री आहेत.)