महाभारतातील रामोपाख्यान!

    21-Jan-2024
Total Views |

Mahabharata


रामायणात महाभारताचा, महाभारतातील पात्रांचा किंवा महाभारतातील युद्धाचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही. पण, महाभारतात मात्र रामायणाचा, रामायणातील पात्रांचा, वाल्मिकींचा, रामायणातील संवादांचा, रामायणातील दाखल्यांचा वारंवार उल्लेख येतो. अरण्यक पर्वात भीम व हनुमानाच्या संवादात संक्षिप्त रामकथा आली आहे. द्रोणपर्वात अभिमन्यूच्या मृत्यूने शोकसंतप्त झालेल्या युधिष्ठिराला धीर देण्यासाठी रामाची कथा सांगितली आहे आणि वनपर्वात तर रामोपाख्यानमध्ये रामाची कथा विस्ताराने आले आहे. 
 
द्यूताच्या खेळात पराभूत झाल्यानंतर पांडवांनी १३ वर्षं वनवासात आणि एक वर्ष अज्ञातवासात राहण्याचे ठरले होते. तेव्हा पांडवांनी कुंतीला विदुराकडे राहायला पाठवले. सुभद्रेला लहानग्या अभिमन्यूसह तिच्या माहेरी द्वारकेला पाठवले. द्रौपदीच्या पाच पुत्रांना त्यांच्या आजोळी पाठवले आणि त्यानंतर पाच पांडव, द्रौपदी, त्यांचे पुरोहित धौम्य ऋषी, काही सेवक, थोडे सैन्य, रथ आदी लवाजमा घेऊन ते वनात राहायला गेले. मात्र, तिथेदेखील त्यांच्यावर अनेक संकटे ओढवली. एकदा जयद्रथाने द्रौपदीला पळवून न्यायचा प्रयत्न केला. तेव्हा भीम आणि अर्जुनाने जयद्रथाला हरवून द्रौपदीला सोडवले.
 
या प्रसंगानंतर युधिष्ठीर अतिशय उदास राहू लागला. त्यावर त्याने समय पाहून, मार्कंडेय ऋषींना विचारले, "माझ्यासारखा दुर्भाग्याशाली राजा तुम्ही पाहिला आहे काय? मी असा वनात फिरत आहे. माझ्याबरोबर माझ्या भावांना वनवास घडत आहे. राजवाड्यात राहिलेल्या, दिव्य जन्म पावलेल्या द्रौपदीलादेखील आमच्यासोबत वनात राहावे लागत आहे आणि तेही कमी म्हणून त्या दुष्ट जयद्रथाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला, अशी संकटे कोणत्याही राजावर कोसळली नसतील. आपण यापूर्वी कधी माझ्यासारखा भाग्यहीन मनुष्य पाहिला आहे काय?"
 
यावर मार्कंडेय ऋषी म्हणाले, "राजन्! ज्याच्यावर अनेक संकटांची मालिका कोसळली, असा एक राजा फार पूर्वी होऊन गेला. त्या श्रीरामचंद्रालासुद्धा वनवास आणि स्त्रीवियोगाचे दु:ख सहन करावे लागेल होते. त्या श्रीरामाचे चरित्र ऐक - पुलत्स्य कुळामध्ये रावणाचा जन्म झाला. त्याने आपल्या मोठ्या भावाकडून म्हणजे कुबेराकडून लंका जिंकून घेतली. त्यावर त्याने कुबेराला लंकेतून हकलून लावले. इकडे अयोध्येमध्ये इक्ष्वाकू वंशातील राजा दशरथाला तीन भार्या होत्या - कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा. त्याला त्या तिघींच्यापासून चार पुत्र झाले - राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामाचा विवाह जनकाच्या कन्येशी - सीतेशी झाला. काही काळ गेल्यावर राजाने आपल्या मोठ्या मुलाच्या, रामाच्या राज्याभिषेकाची तयारी चालू केली. त्यावेळी राणी कैकयीने पूर्वीच्या वरांनी स्वत:च्या मुलासाठी राज्य व रामाला वनवास मागितला.
 
रामाबरोबर लक्ष्मण आणि सीता पण वनात गेले. वनात असताना रावणाने मारीचच्या मदतीने कपटाने राम व लक्ष्मणाला दूर पाठवले आणि सीता एकटी असलेले पाहून त्या अबलेचे अपहरण केले. त्यावेळी जटायूने सीतेला वाचवायचा प्रयत्न केला. पण, तो रावणाशी युद्ध करताना धारातीर्थी पडला. रामाला जटायूकडून रावणाने सीतेला पळवून नेलेले कळले. राम - लक्ष्मण सीतेच्या शोधात दक्षिणेला गेले. रामाने त्याच्याप्रमाणेच वनवासात राहणार्‍या राजपुत्राशी-सुग्रीवाशी मैत्री केली. रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य आणि पत्नी परत मिळवून दिली.
 
पुढे रामाने हनुमानाकरवी सीतेचा शोध लावला. वानरसेनेसह राम लंकेकडे निघाला, तेव्हा सर्वजण समुद्रापाशी येऊन थांबले. तेव्हा नलाने वानरांच्या मदतीने समुद्रावर सेतू बांधला. राम सैन्यासह सेतू ओलांडून लंकेत पोहोचला. त्यानंतर वानरसेनेचे आणि राक्षसांशी तुंबळ युद्ध झाले. एक एक करत रावणाकडचे सेनापती पडू लागले. शेवटी राम आणि रावण समोरासमोर आले. दोघांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. रामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला.
 
रामाने सीतेची सुटका केली. परंतु, ती अनेक दिवस परपुरुषाकडे राहिल्याने ती त्याच्या स्पर्शाने अपवित्र झाली असावी, अशी शंका घेतली. तेव्हा सीतेने पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना प्रार्थना केली की, मी पापाचार केला असेन अथवा माझ्या मनात श्रीरामाशिवाय दुसर्‍या कुठल्या पुरुषाचा विचार आला असेल, तर माझ्या प्राणांचा वियोग होऊ दे. त्यावेळी वायू, अग्नी आदी देवांनी सीता निष्पाप असल्याची ग्वाही दिली. मग रामाने आनंदाने सीतेचा स्वीकार केला. त्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता पुष्पक विमानातून अयोध्येला परत आले. त्यानंतर श्रीरामाला राज्याभिषेक झाला. रामाने अनेक वर्षं राज्य केले, दहा अश्वमेध यज्ञ केले आणि मोठ्या प्रमाणावर अन्नदान आणि द्रव्यदान करून प्रजेला सुखी केले."
 
अशी ही रामकथा सांगून मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला म्हणाले, "राजन्! तू असा खचून जाऊ नकोस. इंद्राला हरवू शकतील, असे तुझे वीर बंधू तुझ्याबरोबर आहेत, तुला बलवान मित्र आहेत, तुझ्याकडे मोठे सैन्य आहे. रामाने तर केवळ वानर व अस्वलांच्या साहाय्याने रावणाचा अंत केला. युद्धाची वेळ आली की, तू निश्चित कौरवांना जिंकशील." रामाची कथा ऐकून युधिष्ठिराला धीर आला. उत्साह आला. पुढे त्याने युद्धात कौरवांना हरवले. द्रौपदीच्या अपमानाचा सूड घेतला आणि गेलेले राज्य परत मिळवले. रामायण ऐकण्याचे हे फळ युधिष्ठिराला मिळाले!
 
रामाची कथा अतिशय प्राचीन आहे. महाभारत काळातसुद्धा रामकथा प्राचीन होती. महाभारताच्या कितीतरी आधी घडली होती, याला पुष्टी देणार्‍या दोन गोष्टी आहेत - एक रामायणाचे प्राचीनत्व त्यामधील युद्धात दिसते. राम-रावण युद्धात लहान-मोठे दगड, काठ्या, फांद्या व झाडाचे बुंधे हे प्रामुख्याने शस्त्र म्हणून वापरले आहेत. परशु, शूल, धनुष्यबाण, गदा, तलवार आदी शस्त्रे केवळ महत्त्वांच्या वीरांनी वापरली आहेत. युद्धात वानरांनी व राक्षसांनी एकमेकांना नखांनी बोचकारल्याचे, दातांनी चावल्याचे, मुष्टीप्रहार व लत्ताप्रहार केल्याचे वर्णन आहे. महाभारत काळात युद्ध कौशल्य विकसित झालेले दिसते - महाभारतातील अनेक पात्र धनुर्विद्येत तरबेज आहेत. गदा, खड्ग आदी शस्त्र चालवण्यात वाकबगार आहेत. युद्धात रथ आणि हत्तींची रेलचेल आहे. तसेच सैन्याची क्लिष्ट व्यूहरचना केलेली दिसते. स्वयंवरांच्या पणातसुद्धा हेच दिसते. रामायणातील सीता स्वयंवराचा पण धनुष्यावर प्रत्यंचा चढवणे इतकाच आहे, तर महाभारतात द्रौपदी स्वयंवराचा पण - फिरत्या माशाच्या डोळ्याला बाण मारायचा, तेसुद्धा पाण्यात माशाचे प्रतिबिंब पाहून इतका अवघड आहे.
 
यामधून रामायणकालीन संस्कृतीपेक्षा महाभारतकालीन संस्कृती खूप विकसित झाली होती, हे लक्षात येते. मानवाचा इतका विकास होण्यासाठी रामायण व महाभारतामध्ये अनेक हजार वर्षांचा काळ लोटला असावा. रामायण आधी घडून गेले, या मताला पुष्टी देणारी दुसरी गोष्ट आहे. रामायणात मात्र महाभारताचा, महाभारतातील पात्रांचा किंवा महाभारतातील युद्धाचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही. पण, महाभारतात मात्र रामायणाचा, रामायणातील पात्रांचा, वाल्मिकींचा, रामायणातील संवादांचा, रामायणातील दाखल्यांचा वारंवार उल्लेख येतो. अरण्यक पर्वात भीम व हनुमानाच्या संवादात संक्षिप्त रामकथा आली आहे. द्रोणपर्वात अभिमन्यूच्या मृत्यूने शोकसंतप्त झालेल्या युधिष्ठिराला धीर देण्यासाठी रामाची कथा सांगितली आहे आणि वनपर्वात तर रामोपाख्यानमध्ये रामाची कथा विस्ताराने आले आहे. वाल्मिकी रामायणात आणि रामोपाख्यानातील राम - वीर आहे, खंबीर आहे, दिलेला शब्द पाळणारा राजा आहे. अचाट कर्तृत्व करणारा महामानव आहे.
 
युद्धात पराक्रम गाजवणारा धनुर्धारी आहे. नम्र आहे, प्रेमळ आहे, एकवचनी आहे, एकपत्नी आहे, मृदुभाषी आहे, कोमल आहे. वडिलांची आज्ञा पालन करणारा पुत्र आहे. भावंडांवर प्रेम करणारा, त्यांच्यासाठी त्याग करणारा वडील बंधू आहे. सीतेच्या विरहात शोक करणारा पती आहे. सीतेचा शोध लागत नाही, तेव्हा हताश होणारा पती आहे. लक्ष्मण युद्धात मुर्च्छित झाल्यावर हतबल होणारा भाऊ आहे. समुद्र ओलांडून जाण्यासाठी मार्ग मिळत नाही, तेव्हा निराशेने संतापणारा मानव आहे. सीता अग्निपरीक्षा देणार म्हटल्यावर अश्रू ढळणारा, लोकापवादाला भिणारा आणि तुमच्या आमच्यासारखा समाजातील नियमांनी बद्ध असलेला मानव आहे.
 
वाल्मिकी म्हणतात, "मी सांप्रत काळातील गुणवंत राजाची कथा लिहीत आहे,फफ तर व्यास लिखित महाभारतात मार्कंडेय म्हणतात, ङ्गङ्घमागे होऊन गेलेल्या राजा रामाची कथा मी सांगत आहे." कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होण्याच्या आधी, कपिध्वज असलेल्या चार श्वेत घोड्यांच्या रथात आरूढ असलेल्या अर्जुनाचा आणि त्याचा सारथी झालेल्या कृष्णाचा संवाद म्हणजे गीता. अर्जुनाला आपले कर्तव्य करण्यास उद्युक्त करायला भगवान श्रीकृष्णने गीता सांगितली. त्यामध्ये भगवंतानी रामाचे सर्वश्रेष्ठ धनुर्धर गुणगान करताना म्हटले आहे -
 
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जान्हवी॥१०.३१॥
 
पवित्र करणार्‍यांमध्ये मी वायू आहे, माशांमध्ये मी मगर आहे, सर्व नद्यांमध्ये मी गंगा नदी आहे आणि शस्त्रधारींमध्ये मी राम आहे. महाभारतकाळात श्रीराम सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि धर्माचे आचरण करणारा सर्वश्रेष्ठ राजा आहे. तीच भावना आजही आहे. आदिकवी वाल्मिकी, ऋषी मार्कंडेय, महर्षी व्यास, धर्मज्ञ युधिष्ठिर, धनुर्धारी अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांना ज्याच्या चरित्राने व सामर्थ्याने प्रेरित केले, यांना ज्याने धर्माचा मार्ग दाखवला, त्या रामाचे चरित्र आजही आपल्याला स्वाभिमानाने जगायला प्रेरणा देत आहे.
 
- दीपाली पाटवदकर