विजय पताका श्रीरामाची झळकते अंगणी...

    21-Jan-2024
Total Views |


Shri Ram


अयोध्येच्या परमपावन क्षेत्री श्रीराम जन्मभूमीवर नव्याने साकार झालेल्या भव्य, दिव्य अशा मंदिरामध्ये रामललाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होणार्‍या आजच्या सौभाग्य दिनी अयोध्येसह सार्‍या देशभर गुढीपाडवा व दिवाळीचा संयुक्त उत्सव साजरा होत आहे. नव्या अस्मितेच्या चैतन्य प्रकाशात सारा देश व देशवासीयांची तन-मने उजळून गेली आहेत. त्रेतायुगात रामायणकाळात प्रभुराम लंका दिग्विजय करून अयोध्येत परतले. तेव्हा, अयोध्यावासीयांनी अशीच सहा महिने दिवाळी साजरी केली होती. गुढ्या-तोरणे, पताका, ध्वजांनी सारी अयोध्या राममय-आनंदमय झालेली होती. त्या उत्सवाचे प्रेरणादायी शब्दस्मरण...
 
मंगलाचरण
आदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्।
वैदेही हरणं जटायू मरणं सुग्रीव संभाषणम्।
वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनम्।
पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं एतद् श्री रामायणम्॥
 
आद्यकवी वाल्मिकी ऋषी यांनी गायलेल्या 'अयोध्यापती', 'दशरथनंदन', 'मर्यादापुरुषोत्तम' श्रीरामाचे पुरुषार्थी जीवनचरित्र म्हणजे 'वाल्मिकी रामायण' महाकाव्य! या महाकाव्याला 'आदि महाकाव्य' म्हणून भारतीय अभिजात साहित्य विश्वामध्ये अढळस्थान व अग्रपूजेचा मान आहे. लेखारंभीचा श्लोक, हे वाल्मिकीच्या मूळ रामायणातील प्रमुख घटनांचे एका श्लोकात केलेले 'अल्पाक्षरब्रह्म' म्हणावे असे चपखल वर्णन आहे. या श्लोकाला 'एक श्लोकी रामायण' म्हणून रामभक्तांच्या उपासनेमध्ये, प्रातःस्मरणांमध्ये विशेष आस्थेचे स्थान आहे. अशा परममंगल श्लोकाने प्रस्तुत लेखाचा-रामसेवेचा श्रीगणेशा करण्यास मला आनंद होत आहे.
 
'हरि अनंत हरिकथा अनंत' असे म्हणतात, तसेच 'राम अनंत-रामकथा अनंत' आहे. रामाबद्दल प्रचंड लिहिले गेले व प्रचंड लेखन होत आहे. तरीही गेली पाच हजार वर्षे ही रामकथा नित्यनूतन, मनमोहक, चित्ताकर्षक वाटते. या दृष्टीने रामकथा सनातन आहे आणि नित्यनूतनही आहे. भगवान शिवानंतर देवर्षी नारद हे रामकथेचे आद्य उद्गाते आणि त्यानंतर वाल्मिकी ऋषींपासून सध्याच्या तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या कवी कुमार विश्वासपर्यंत रामकथाकारांची हजारो वर्षांची प्रदीर्घ, अक्षुण्ण अविरत परंपरा स्तिमित करणारी आहे. श्रीरामाचे चरित्र आदर्श आहेच, तसेच ते मधुर व अवीट आहे. सहस्त्रावधी वर्षे कवीमनाला व भाविकांना भुरळ घालणार्‍या कथेचा नायक श्रीराम जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय प्रजाप्रिय, मर्यादापुरुषोत्तम, वीरयोद्धा आहे.
 
रामाचा उदात्त बोध : मरणादपि नच वैराणी।
 
वाल्मिकी रामायणामध्ये विविध कांडांमध्ये रामाचे वेगवेगळे गुणदर्शन घडते. 'युद्धकांडा'मधील रामाचे वीरश्रीयुक्त रघुवीर दर्शन घडते, तसेच रामाचे ऋषीप्रेम, बंधुप्रेम, प्रजाप्रियता यांचेही मनोज्ञ दर्शन होते. राम-रावणाचा भीषण रणसंग्राम आणि श्रीरामदिग्विजयाचे वीररसयुक्त वर्णन हा वाल्मिकी रामायणातील 'युद्धकांडा'चा मुख्य विषय आहे. राम-रावणाचे युद्ध कसे झाले, तर या रणसंग्रामाला दुसरी उपमाच नाही म्हणून 'राम-रावण युद्ध', 'राम-रावणयुद्धासारखे झाले' असेच वर्णन करावे लागते, असे सकल संतांनी एकमुखाने म्हटले आहे आणि ते सार्थ व समर्पक आहे.
 
गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः।
रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव॥
 
गगनाला उपमा फक्त गगनाची, सागराला उपमा सागराचीच. त्यांना दुसरी उपमा नाही, तशी राम-रावण युद्धालाही दुसरी उपमा नाही, असे वर्णन स्वयं वाल्मिकी ऋषींनीच केलेले आहे.
 
या घनघोर युद्धापूर्वी श्रीराम युद्ध टाळण्याचा व असंख्य जीवांचा संहार वाचविण्यासाठी रावणाकडे शांतीदूत म्हणून अंगदाला पाठवतात. युद्धामध्ये साम, दाम, दंड, भेद या चार नीतिचा उपयोग केला जातो. त्यामध्ये 'साम' म्हणजे सामोपचाराने युद्ध टाळणे; हा प्रयत्न श्रीराम करून पाहता, पण उन्मत्त रावणाला युद्ध करायचेच होते, तो रामदूताचा, अंगदाचा प्रस्ताव फेटाळून लावतो. अखेर ८७ दिवस घनघोर युद्ध झाले. रावणासह त्याचे सारे भाऊ, नातेवाईक मारले गेले. रावणाचा अंत्यविधी करण्यासाठी कोणी उरले नाही. त्या प्रसंगात श्रीरामाने बिभिषणाला 'मरणादपि नच वैराणी' असा उदात्त बोध केला व रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास प्रवृत्त केले. हे श्रीरामाच्या नीतीमूल्याधिष्ठित माणुसकीच्या विचाराचे दर्शन, एका धीरोदात्त व्यक्तित्वाचे दिव्य दर्शन आहे. असेच उदात्त धीरोदात्त दर्शन १७व्या शतकात आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी म्लेंच्छ सरदार अफझलखानाच्या वधानंतर त्याचे थडगे बांधून केलेल्या कृतीतून घडते. हे रामाच्याच आदर्शांचे अनुकरण होते.
 
जन्मभूमी अयोध्येची ओढ
 
रावणवधानंतर स्वतः बिभिषण प्रभू श्रीरामास लंकेच्या राजगादीवर बसून आपणच राज्य करावे, अशी प्रार्थना करतो. पण, निष्काम कर्मयोगी, आत्मलोपी रामाला ना गादीचा, ना सत्तेचा मोह. ते लक्ष्मणाकडे पाहत बिभिषणास म्हणतात, "मला सुवर्ण लंकेच्या राज्याचा मोह नाही, मला माझी जननी व जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटते.फफ वाल्मिकी रामायणामधील श्रीरामाचे ही उक्ती पाहा-
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी॥
 
'जननी' आणि 'जन्मभूमी' प्रभू रामाद्वारा प्रतिपादित सर्वोच्च महत्त्व, सर्वांनी नीट लक्षात घेतले, तर त्यांना राम जन्मभूमी वरील राम मंदिराच्या सकल हिंदूंच्या आग्रहामागचे भावात्मक बंध लक्षात येतील. श्रीराम एवढे निर्मोही होते की, त्यांना वालीवधानंतर किष्किंधा राज्याचाही मोह वाटला नव्हता.
 
जननी, (कौशल्या, सुमित्रा, कैकयी), जन्मभूमी (अयोध्या) प्रमाणेच रामाला बंधू भरताला भेटण्याची ओढ होती. भरताची व्रतस्थ अवस्था राम जाणून होते. त्यामुळे बिभिषणाचा लक्ष्मणाच्या हस्ते राज्याभिषेक करून श्रीराम लंकेहून अयोध्येकडे प्रयाण करण्याची घाई करतात. बिभिषणाकडचे कुबेराचे पुष्पक विमान घेऊन राम सीता, लक्ष्मणासह हनुमान, सुग्रीव, अगंद आदींना घेऊन अयोध्येच्या दिशेने उड्डाण करतात. काही अभ्यासकांच्या मते, राम बिभिषणाचे विमान न घेता विश्वकर्माला घेऊन स्वतःच्या ङ्गकामगङ्घ विमानातून अयोध्येस जातात. बिभिषणाचे विमान न घेता राम आपल्या आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवतात.
 
विमानात रामाशेजारीच सीता बसलेली असते. तिला श्रीराम विमानातून दिसणार्‍या एकेक स्थानाची, तेथील प्रसंगाची माहिती सांगतात. लंकेबाहेरचे युद्ध क्षेत्र, लक्ष्मणाने इंद्रजीतचा पराभव केलेले स्थान दाखवतात. वाटेत अगस्ती ऋषींचा आश्रम असतो. राम सीतेसह अगस्तींच्या आश्रमाला भेट देतात. त्यांचे पूजन-वंदन करतात.
 
पुढील प्रवासात राम सीतेला विमानातून किष्किंधानगरी दाखवतात, वाली वधाची जागा दाखवून वालीवधाची कथा सांगतात. पंपा सरोवर, शबरीचा आश्रम आदी स्थाने दाखवत, रामाचे विमान चित्रकूट येथे उतरते. तेथे मंदाकिनी नदीचे दर्शन करून पितृकार्य आदी पूजाविधी करतात. पुढील प्रवासात राम सीतेला गंगा-यमुना नद्यांचे दर्शन घडवितात आणि भारद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ विमान उतरवून भारद्वाज ऋषींना वंदन करतात. श्रीराम हनुमंताला आपल्या आगमनाची पूर्वसूचना भरताला देण्यास नंदीग्रामला पुढे पाठवतात. भारद्वाज आश्रमाजवळ विमान उतरत असताना श्रीराम सीतेला दूर दिसणारी अयोध्यानगरी दाखवून प्रणाम, वंदन करण्यास सूचवतात. प्रभू रामांच्या मनातील जन्मभूमी प्रेम-आस्था पाहून सीता भावविभोर होऊन अयोध्यानगरीला प्रणाम करते. 'अवधपुरी सम प्रिय नही वैकुंठभूमी' ही श्रीरामाची भावना जन्मभूमी अयोध्येवर रामाचे किती प्रेम होते, तेच दर्शवते. भारद्वाज आश्रमातून श्रीराम सीता शृंगवेरपूरला गुह्यक राजाला भेटण्यास आवर्जून जातात. राम-सीतेला पाहून गुह्यकाला अत्यानंदाने भोवळ येते. राम परममित्र गुह्यकाला मिठी मारून भेटतात. गुह्यकाचे जीवन धन्य धन्य होते. वनवासाच्या आरंभीच्या दिवसात गुह्यकाने केलेल्या मदतीची आठवण ठेवून मोठ्या कृतज्ञतेने मित्रऋणाचे स्मरण करतात. हाच रामकथेचा खरा बोध आहे.
 
भरतभेटीचा अपूर्व सोहळा
 
श्रीरामाच्या पादुका ठेवून अयोध्येजवळील नंदीग्राम येथे भरतही रामाच्या प्रतीक्षेत वल्कले नेसून व्रताचरण करीत बसलेला असतो. गुह्यकाला भेटून रामाचे विमान नंदीग्रामला येते. तेथे बंधू भरतासमवेत कुलगुरु वसिष्ठही असतात. राम, सीता, लक्ष्मण प्रथम वसिष्ठ ऋषींना वंदन करतात आणि मग राम-भरत भेटीचा अपूर्व सोहळा होतो. आनंदाश्रुंचा पूर लोटतो. हनुमंताकडून राम, सीता, लक्ष्मण सुखरूप आगमनाची पूर्वसूचना मिळताच, भरत ती आनंदवार्ता अयोध्येस सर्वांना कळवतो आणि आनंदाप्रीत्यर्थ राज उत्सव साजरा करण्याच्या सूचना देतो. भरताकडून राम आगमनाची परमआनंद मंगल वार्ता मिळताच शत्रुघ्नाने अयोध्यानगरीला 'न भूतो न भविष्यती' अशी आरास, सजावट केली. एखाद्या नववधुसारखी अयोध्या शृंगाराने सजली, कार्तिक महिन्यात वसंत ऋतू बहरला.
 
भव्य दिव्य शोभायात्रा आणि दीपोत्सव
 
राम आगमनाच्या वार्तेने अयोध्यानगरीमध्ये नवचैतन्य संचारले. सारे अयोध्यावासी रामाच्या स्वागतासाठी आतुरतेने नटूनथटून नृत्य, गायन करू लागले. इकडे माता कौशल्या, सुमित्रांना वार्ता कळताच त्यांनी महालात न थांबता रामाच्या स्वागताला-भेटीसाठी, नंदीग्रामला भरताच्या कुटीकडे धाव घेतली. वासराच्या ओढीने धेनु धावाव्यात तशा माता धावल्या, असे सुंदर वर्णन वाल्मिकींनी केलेले आहे. अयोध्येचे सुमंत मंडळ, अयोध्येचे पौरजन आणि आपल्या मातांना पाहून श्रीराम-सीता-लक्ष्मण भावविभोर होतात. साश्रुनयनांनी माता-पुत्र हृद्यभेटीचा हा मौनसोहळा पाहून सारेच सद्गतीत होतात.
 
नंदीग्रामपासून अयोध्येपर्यंत राम, सीता, लक्ष्मण यांची भव्य शोभायात्रा काढली जाते. राम-सीतेबरोबर माता कौसल्या, सुमित्रा, कुलगुरू वसिष्ठ हेसुद्धा रथामध्ये विराजमान असतात. रस्त्याच्या दुतर्फा नगरजन-स्त्रिया उभे राहून रामावर पुष्पवृष्टी करतात. वाटेत ठिकठिकाणी सुवासिनी राम-सीतेला ओवाळतात. रामाच्या त्रिवार जयजयकाराने सारे आसमान दुमदुमून जाते. रथ, हत्ती, घोडे, नृत्य करणारी पथके, वाजंत्री, गायन करणारे सुरेल भाट, नटूनथटून आल्हादित असे अयोध्यावासीजन अशी ही भव्य, दिव्य शोभायात्रा अयोध्येच्या प्रमुख पथावरून राजमंदिराकडे जाताना गच्चीवरून पुष्पवृष्टी करीत लोक रामाचा जयजयकार करतात. रोषणाईने आणि दीपोत्सवाने सारी अयोध्यानगरी उजळून जाते. राम आगमनाच्या आनंदाने कार्तिक महिन्यात पुनःश्च दिवाळी साजरी केली जाते. राम वनवासाला गेल्याने निष्चैतन्य झालेल्या अयोध्येमध्ये नवचैतन्याला उधाण येते. उदास, निष्प्राण अयोध्येत 'राम' येतो. नवी चेतना येते. या उत्सवाचे गोस्वामी तुलसीदास वर्णन करताना म्हणतात - 'अवधपुरी प्रभु आवत जानी। भई सकल शोभा कै खानी॥'
 
शोभायात्रा राज प्रासादांच्या प्रांगणात येताच श्रीराम दरबारात न जाता प्रथम माता कैकयीच्या महालात जाऊन तिचे आशीर्वाद घेतात. ही रामचरित्राची थोरवी आहे. प्रभू रामांनी माता कैकयीला दोष न देता, आपल्या पूर्वकर्माच्या संचिताला कारण मानले.
'माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात। राज्यत्याग काननयात्रा सर्व कर्म जात॥' असे ग. दि. माडगूळकरांनी 'गीतरामायणा'त नेमके वर्णन केलेले आहे.
 
पितृवचन पालन करण्यासाठी वनवासात जाताना जो राम होता, तो रावणवधानंतर लंका दिग्विजयानंतर ङ्गश्रीरामङ्ग झालेला होता. वनवासातील १४ वर्षांच्या जीवनात रामाने ङ्गपरित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृताम्ङ्घ असे कार्य करून आपल्या अवतार उद्दिष्टाची सफल सुफल परिपूर्ती केलेली होती आणि असा राम 'श्रीराम' होऊन आज अयोध्यानगरीत पुनरागमन करीत होता. अयोध्यावासीयांच्या सुखाला पारावार राहिला नव्हता. रामायणकार कवी म्हणतात, अयोध्येत राम आगमनाचा आनंदोत्सव-दीपोत्सव सलग सहा महिने साजरा झाला. वसिष्ठ मुनींच्या आज्ञेने श्रीरामाचा अयोध्यापती राजा म्हणून राज्याभिषेक होऊन राजतिलक होतो आणि तेथून रामराज्याचा मंगल श्रीगणेशा होतो. वाल्मिकी रामायणातील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना यामागे उदात्त नीतिमूल्यांचा बोध आहे. रामकथा ही भारतीय सांस्कृतिक आदर्शांचा चिरंतन दीपस्तंभ आहे. प्रेमासाठी प्रेम, कर्तव्यासाठी कर्तव्य आणि चारित्र्यासाठी चारित्र्य हे रामराज्याचे, रामकथेचे मूळ व मुख्य सूत्र आहे, असे स्वामी गोविंदगिरी यांनी 'श्रीराम कथामृत' मध्ये म्हटले आहे, ते अत्यंत सार्थ व समर्पक आहे. प्रेम, कर्तव्य आणि चारित्र्य याची अभंग गाथा म्हणजे श्रीराम कथा!
 
- विद्याधर ताठे
(लेखक संत साहित्याचे उपासक, अभ्यासक आहेत.)