96 वर्षीय कारसेवक मामा चाफेकर यांनी जागवल्या आठवणी
19-Jan-2024
Total Views | 90
नाशिक (पवन बोरस्ते) : जन्म 1928चा. उर्दूत मॅट्रिक उत्तीर्ण. 1990च्या कारसेवेला जाताना अटकदेखील झाली. गडचिरोली येथील एटापल्लीत दहा वर्ष 20 ते 25 मुलांचे पालकत्वही स्वीकारले. रेशीमबाग येथील संघ कार्यालयात काही काळ व्यवस्थेतही काम केले. सध्याचे वय 96 असले तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवेल असाच आहे.
नाशिक येथे सध्या वास्तव्यास असलेले नागपूर येथील ज्येष्ठ कारसेवक दिगंबर यशवंत चाफेकर अर्थात मामा चाफेकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी कारसेवेच्या आठवणींना उजाळा देत राम मंदिराच्या निर्माणाने आयुष्याचे सार्थक झाल्याचे सांगत अयोध्येला जाऊन रामललाचे रूप डोळेभरून पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
विशेष म्हणजे, ‘96व्या वर्षीही, न चुकता मी दै. ‘मुंबई तरुण भारत’ वाचतो,’ असेही ते म्हणाले.नागपूरहून 1990साली आनंदराव मुळे आणि अन्य एका सहकार्यासह बॅगेत कपडे भरून मामा चाफेकर कारसेवेला निघाले. कारसेवेला निघाल्यानंतर अयोध्येपासून 60 किलोमीटर आधी बदायुमध्ये त्यांना अटक झाली. काही वेळानंतर त्यांना सोडूनही देण्यात आले. यानंतर अगदी जंगल, नद्या, काट्याकुट्याचा रस्ता पायी पार करत ते अयोध्येला पोहोचले. प्रवासात रामभक्तांनी ठिकठिकाणी केलेल्या अन्नदानामुळे त्यांना कधी उपवास घडला नाही. अयोध्येत मशिदीवर त्यांनी उर्दूत लिहिलेली पाटी वाचली, त्यावर लिहिले होते, “ये पुरुषोंकी उतरने की जगह है.“ बाबरीवर भगवा ध्वज फडकतानाचा क्षणदेखील त्यांनी आपल्या डोळ्यांत साठवला.
‘बाटा’ कंपनीत मॅनेजर असलेले मामा 1987 साली निवृत्त झाले. त्यानंतर संघ कार्यालयात 1987 ते 1993 व्यवस्थेत कामही केले. 1993 साली एटापल्ली येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या छात्रावासाला भेट दिली असताना त्यांनी लागलीच तिथेच राहण्याचा निश्चय करत तेथील 20 ते 25 मुलांचे पालकत्व स्वीकारले. याठिकाणी त्यांनी मुलांना इंग्रजीचे धडे दिले. 1993 ते 2003पर्यंत याठिकाणी त्यांनी मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यानंतर गावाने आणि मुलांनी मोठा आनंदसोहळा साजरा केला. यानंतर ते पुन्हा नागपूरला परतले. आजही तेथील अनेक विद्यार्थ्यांचे त्यांना फोन येत असतात. मुलं नाशिक, पुण्याला राहत असल्याने ते काही काळ पुण्यात आणि नाशिकमध्ये वास्तव्यास असतात. विजय, विनोद ही मुलं आणि विद्या आणि माधुरी या मुली यांसह पत्नी प्रभा यांचे त्यांना नेहमीच सहकार्य असल्याचे मामा सांगतात.
दरम्यान, मामा चाफेकर गडचिरोलीतील एटापल्लीत असताना त्यांची रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रांत प्रचारक होते. मोहनजी यांचे वडील मधुकरराव भागवत यांच्यासोबतही मामा चाफेकर यांचा परिचय होता. मामांच्या पत्नी प्रभा यांच्या एकसष्टी सोहळ्याला मधुकरराव सपत्निक आले होते....मामा 96व्या वर्षीही जातात प्रभात शाखेत
‘रा. स्व. संघाला 100 वर्ष पूर्ण व्हावी, अयोध्येतील भव्य मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसर्यांदा विक्रमी मताधिक्क्याने विजयी व्हावेत, या तीन इच्छा मी हयात असेपर्यंत पूर्ण व्हाव्यात,’ असे दिगंबर चाफेकर यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे, ‘या तीन इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी मरणार नाही,’ असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांना संतसाहित्य, कादंबर्या, शिवचरित्र, ज्ञानेश्वरी वाचनाची प्रचंड आवड असून या वयातदेखील ते दर गुरुवारी न चुकता पहाटे प्रभात शाखेत जातात.