श्रीरामलला विग्रहाची गर्भगृहात विधीपूर्वक स्थापना

प्राणपतिष्ठादिनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुटी

    18-Jan-2024
Total Views |
shriram idol

नवी दिल्ली: श्रीरामलला प्राणपतिष्ठेपूर्वी श्रीरामलला विग्रहास गुरूवारी विधीपूर्वक गर्भगृहात स्थापित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारी कार्यालयांना प्राणप्रतिष्ठादिनी अर्ध्या दिवसाची सुटी घोषित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
 
अयोध्येत १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीचा गुरूवारी तिसरा दिवस होता. या दिवशी सुमारे चार तासांच्या विधींनंतर श्रीरामलला विग्रहाची गर्भगृहातील आसनावर स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी रात्री श्रीरामलला विग्रहाचे अयोध्येत आगमन झाले होते. त्यानंतर विधीनुसार श्रीरामललाच्या चांदीच्या स्वरूपास मंदिर परिसरामध्ये नगरभ्रमण करविण्यात आले होते.
 
त्यानंतर आता आज शुक्रवारी सकाळी ९ वाजता अरणिमन्थनद्वारे अग्नी प्रज्वलित होईल. त्यापूर्वी गणपतीसारख्या प्रस्थापित देवतांची पूजा, द्वारपालांकडून सर्व शाखांचे वेदपठण, देव प्रबोधन, औषधी, केशराधिवास, केसराधिवास, घृताधिवास, कुण्डपूजन, पञ्चभूसंस्कार होईल. त्यानंतर ग्रहस्थापन, असंख्यात रुद्रपीठस्थापन, प्रधानदेवतास्थापन, राजाराम - भद्र - श्रीरामयन्त्र - बीठदेवता - अङ्गदेवता - आवरणदेवता-महापूजा, वारुणमण्डल, योगिनीमण्डलस्थापन, क्षेत्रपालमण्डलस्थापन, ग्रहहोम, स्थाप्यदेवहोम, प्रासाद वास्तुशान्ति, धान्याधिवास सायंकालिक पूजन आणि आरती होईल
 

shriram idol
 
दरम्यान, अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांनी वेग धारण केला आहे. यावेळी मंदिरावर तात्पुरते कापडाचे शिखर उभारण्यात आले आहे. अयोध्या शहरातील रामपथ आणि धर्मपथ हे दोन मुख्य रस्ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. रामपथ हा फैजाबाद शहरातील सहादतगंज ते अयोध्या शहरातील नया घाट चौकापर्यंत १३ किलोमीटरचा मार्ग आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी ते सजवले आहेत. लता मंगेशकर चौकास भव्य बॅनर आणि डिजिटल डिस्प्लेने सुसज्ज असून त्यावर ज्यावर 'प्राण-प्रतिष्ठा' सोहळ्याशी संबंधित माहिती आणि चित्रे लावण्यात आली आहेत.
 
केंद्र सरकारी कर्मचारी प्राणप्रतिष्ठचे साक्षीदार होणार
 
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता पाहून या खास दिवसासाठी केंद्र सरकारने सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष घोषणा केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये दुपारी 2.30 वाजेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या आदेशात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या प्रचंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. प्रत्येकाला प्राण प्रतिष्ठाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.