मुंबई : अयोध्येत श्री राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिष्ठापना होत असतानाच मध्यभारतातील देवस्थान श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी मंदिरात ६००० किलोचा रामहलवा तयार करून आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
कोराडी मंदिरात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, भारतवासीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्राची अयोध्येतील भव्य मंदिरात मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरातील सर्व मंदिरात धार्मिक कार्ये होतील. कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात पुरातन राम मंदिर व नव्याने उभारण्यात आलेले रामायण सांस्कृतिक केंद्र असल्याने येथेही धार्मिक आयोजनासह ६००० किलोचा रामहलवा तयार करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या राम हलव्याची रेसिपी तयार केली असून सकाळी ६.३० वाजतापासून सकाळी ११.३० हा हलवा शिजविला जाणार आहे. त्यानंतर १२.०० वाजतापासून वितरित करण्यात येणार आहे.
६०० किलो रवा, ६०० किलो तूप, ८०० किलो साखर, २०० किलो सुखा मेवा व ५० किलो मसाला व पाण्याचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी १५ फुट लाबी- रुंदीची व ६ फुट उंच कढई तयार करण्यात येत असल्याची माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.राम हलवा तयार करून श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर नवा विक्रम स्थापित करणार आहे.