मुंबई : 'मुंबईचा राजा' अशी सर्वत्र ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वांत जुने व मानाचे पहिले गणेशोत्सव मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९२८ साली झाली असून, यावर्षी मंडळाचे ९६वे वर्ष आहे.
१९७७ साली मंडळाला ५० वर्षं पूर्ण झाल्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले होते. तेव्हा मंडळाने भारतातील पहिली २२ फूट गणरायाची उत्सवमूर्ती स्थापन केली होती. तसेच, सजावटीसाठी दक्षिण भारतातील मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारली.
यावर्षानंतर मंडळाने दरवर्षी काहीतरी नवीन देखावा बनवून भाविकांना आकर्षित केले आहे. यामध्ये राजस्थानचा हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, सुवर्णलंका, हिमालय-केदारनाथ मंदिर आणि म्हैसुरचे चामुंडेश्वरी मंदिर हे देखावे महत्त्वपूर्ण होते.
१९७७ पासून मुंबईच्या राजाची मूर्ती २२ फूट इतकी असून संपूर्णतः हाती बनवलेली असते.
यावर्षीची गणेशमूर्ती सतीश वळीवडेकर यांच्या हातून आकार घेणार आहे. अवघ्या काहीच दिवसांवर गणेशोत्सव आला असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. रविवार, दि. १७ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता मुंबईच्या राजाचे प्रथम दर्शन होणार आहे.
नवीन कलाकृती म्हणून 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगडची प्रतिकृती मंडळ साकारत आहे.
शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेल्या मातीतून स्वराज्य उभे राहिले. त्यामुळे या स्पर्शाच्या जाणिवेतून रायगडाच्या प्रतिकृतीला जीवंतपणा येण्यासाठी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष रायगडाला भेट देत तेथील माती गणेशगल्लीत आणली.
या मातीचे पूजन करून दि. 6 ऑगस्टपासून मुंबईच्या राजाच्या सजावटीस सुरुवात करण्यात आली. या सजावटीचे काम प्रसिद्ध नेपथ्यकार अमन विधाते करीत आहेत.
जगदीश्वरचे मंदिर, राज्याभिषेक सोहळा, हिरकणी बुरूज अशी रायगडावरील वेगवेगळी ठिकाणे देखाव्यातून दाखवण्यात येणार आहेत.