मदनदासजी : समर्पित व्यक्तिमत्त्व

    07-Aug-2023
Total Views | 180
Article On Madandasji Devi Written By Minister Chandrakantada Patil

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्वर्यू, पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री तथा रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांनी दि. २४ जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. मदनदासजींचे जाणे, हे संघ परिवारातील विशेष करून विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी मनाला अतिशय वेदना देणारे आहे. कारण असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनाचे शिल्पकार, प्रेरणास्थान, समर्पित प्रचारक असे त्यांचे संपूर्ण जीवन होते. राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यासारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या मदनदासजींचे शालेय शिक्षण गावीच झाले. त्यांनी उच्च शिक्षण पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयातून घेतले. ’एमकॉम’नंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह ’एलएलबी’ची परीक्षा उत्तीर्ण करून राष्ट्रीय स्तरावर ‘रँक’ मिळवत त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली. याच काळात त्यांचे वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने त्यांनी रा. स्व. संघाच्या कामास सुरुवात केली. खरंतर संघाचे काम सुरु करण्यापूर्वीपासूनच मदनदासजींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेण्याचा निश्चय केला होता. संघाच्या संपर्कात आल्यापासून त्यांच्या जीवनाला एक मोठी दिशा मिळाली. आपल्या जीवनातील जवळपास ७० वर्षे त्यांनी संघ कार्यासाठी समर्पित केली. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून ते रा. स्व संघाच्या सह सरकार्यवाह पदापर्यंतचा त्यांचा प्रवास, हा सर्वच कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायीच राहिला आहे.

मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मदनदासजींचा सहवास लाभला, हे मी माझे परम भाग्याच मानतो. मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून ’बीकॉम’चे शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तत्त्वचिंतक स्वर्गीय यशवंतराव केळकर आणि बाळासाहेब आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले. त्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या विविध जबाबदार्‍या सांभाळताना, विविध बैठका आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वत्र प्रवास होत होता. त्यावेळी १९७७ साली एका अभ्यासवर्गामध्ये सर्वप्रथम माझा मदनदासजींशी परिचय झाला. हा परिचय केवळ क्षणिक किंवा तात्त्विक नव्हता, तर वैचारिक आणि प्रदीर्घ होता. त्यांच्याशी संवाद साधताना नेहमीच आत्मीयता आणि आपलेपणा वाटत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रचारक म्हणजे ‘विकासित व्हावे, अर्पित होऊनी जावे!’ हा मंत्र आपल्या जीवनात सदैव जगत असतो अन् जीवनाची हीच शिदोरी मला मदनदासजींकडून मिळाली.

आपले ज्येष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेतून १९६९ मध्ये मदनदासजींनी रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर संघकार्यात ते अक्षरशः एकरूप होऊन गेले. १९६६ मध्ये संघाच्या सूचनेनुसारच त्यांनी विद्यार्थी परिषदेची जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांनी अभाविपमध्ये विभाग, प्रदेश, क्षेत्रीय या जबाबदारीनंतर अखिल भारतीय संघटनमंत्री अशा विविध जबाबदार्‍या अतिशय समर्थपणे सांभाळल्या. त्या सांभाळत असताना पूर्ण देशभरात तालुका-महाविद्यालय-शहरस्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील; यासाठी विशेष लक्ष देऊन ‘नींव के पत्थर’ प्रमाणे कार्य करीत अभाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली. मला आठवतं की, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना ईशान्य भारताची ओळख व्हावी, यासाठी मदनदासजींच्या प्रेरणेतून एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमामुळे ईशान्य भारतातील नागरिकांच्या जीवनमानाची ओळख विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय जवळून झाली. त्यातून ईशान्य भारताची आणि विद्यार्थी परिषदेची नाळ जोडली गेली.

मदनदासजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंबद्दल सांगायचे, तर तर्कशुद्ध मांडणी, विचारात सुस्पष्टता, तत्त्वज्ञान जगणारे, अनुशासन आणि शिस्तप्रिय अशा गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मदनदासजी! मानवी जीवनात येणार्‍या प्रत्येकाला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्येकडे पाहण्याची मदनदासजींची एक वेगळीच दृष्टी होती. ते त्या समस्येकडे केवळ अडचण म्हणून पाहात नव्हते; तर त्या समस्येकडेही एक संधी म्हणून पाहात होते अन् या संधीचं सोनं कसं करायचं? याची शिकवण मदनदासजींकडून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मिळाले. ‘व्यक्तिनिर्माण ते राष्ट्रनिर्माण’ हा त्यांचा संकल्प होता. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडीअडचणीकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे.

एखादा व्यक्ती संघाप्रती किती समर्पित असू शकतो, हे सांगायचं झालं, तर मदनदासजींची एक आठवण मला इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. पुण्यामध्ये त्यांच्या वडिलांनी मदनदासजींच्या भविष्याचा विचार करुन उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने एक प्लॉट खरेदी केला होता. पण, संघाच्या कामात मदनदासजींनी आपल्याला इतकं समर्पित करुन घेतले होते की, त्यांना याची आठवणदेखील नव्हती. कालांतराने जिल्हाधिकार्‍यांकडून मदनदासजींना एक नोटीस आली. या नोटिसीनंतर मदनदासजींच्या हा विषय लक्षात आला. आपलं संपूर्ण जीवन संघकार्यासाठी समर्पित केल्यामुळे त्यांनी हा प्लॉट विकून मिळणारी रक्कम संघकार्यात वापरण्याचा निश्चय केला आणि तो निश्चय त्यांनी सत्यातदेखील उतरवला.

मला आणखीन एक घटना आठवते. एका कार्यकर्त्याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, त्या कार्यकर्त्यासमोर लग्न खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून प्रवासात असल्याने, मी हा विषय स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या कानावर घातला. त्यावेळी मदनदासजी आणि स्वर्गीय बाळासाहेब एकत्रच असल्याने, मदनदासजींनाही त्या कार्यकर्त्याची अडचण समजली. त्यावर मदनदासजी स्वर्गीय बाळासाहेबांना म्हणाले की, “बाळासाहेब, तुम्ही त्या कार्यकर्त्याला जी काही मदत कराल, त्यात माझेही काही गृहित धरा!“ असे म्हणून त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या बहिणीच्या लग्नात सर्वात मोठी मदत केली.

मदनदासजींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, विचारांप्रती त्यांच्या मनात प्रचंड स्पष्टता होती. त्याचबरोबर विषयाच्या मांडणीत सोपेपणा असायचा. त्यामुळे समोरच्या कार्यकर्त्याला आपण सांगत असलेला विषय नीट समजला आहे की नाही, हे ते अधूनमधून विचारून जाणून घेत होते. यातून त्यांनी संघाचा संस्कार प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये ठळकपणे रुजवला. त्यांना जेव्हा विद्यार्थी परिषदेनंतर पुन्हा संघाचे काम करण्याची सूचना देण्यात आली; त्या काळातही विविध जबाबदार्‍या सांभाळताना त्यांनी समर्पित संघ कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. त्यांच्यातील संघटन कौशल्यांमुळे रा. स्व. संघाच्या सह सरकार्यवाहपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. विशेष म्हणजे, याच काळात केंद्रात अटलजींचे सरकार सत्तेत होतं. त्या काळात संघ आणि केंद्र यांच्यामध्ये योग्य समन्वय राखून संघाची ध्येयधोरणे प्रत्यक्षात आणण्यात मदनदासजींनी मोलाची भूमिका बजावली.

रा. स्व. संघाची सह सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळतानाही त्यांनी विद्यार्थी परिषदेकडे सातत्याने लक्ष ठेवले. ‘घार फिरे आकाशी, तिचे चित्त पिलापाशी’ या पंक्तीप्रमाणेच त्यांचे संपूर्ण लक्ष्य विद्यार्थी परिषदेतील असंख्य कार्यकर्त्यांकडे सातत्याने असायचे. त्यासाठी ते देशभरातील कार्यकर्त्यांना स्वतःहून फोन करून विचारपूस करायचे. १९९३ मध्ये विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम थांबवून माझे मूळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी तालुक्यातील खानापूर गावात स्थायिक झालो. त्यानंतरही मदनदासजी आणि माझा नित्याचा संपर्क असायचा. या काळात मदनदासजींच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्रात संघाचे काम चार वर्षे केले. यामध्ये विविध जबाबदार्‍या सांभाळताना मदनदासजींचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
 
संघाप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे कामही पश्चिम महाराष्ट्रात वाढावे. यासाठी स्वर्गीय प्रमोदजी, गोपीनाथजी आणि नितीनजी यांनी राजकीय जीवनात सक्रिय होण्याचा आग्रह धरला. त्यावेळीही मदनदासजींशी चर्चा करून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. या संपूर्ण काळात मदनदासजींसोबतच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा झाला. एखादा कार्यकर्ता अडचणीत आहे, असे जेव्हा मदनदासजींना समजायचे, तेव्हा ते लगेच फोन करून त्याला मदत केली पाहिजे, अशी सूचना करायचे. त्यांची सूचना म्हणजे, आम्हा कार्यकर्त्यांसाठी एकप्रकारे आज्ञाच असायची. त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कामाला लागायचो.

२०१९ मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली, तेव्हा मदनदासजींनी अभिनंदन करण्यासाठी फोन केला. खरंतर मदनदासजी हे आम्हा कार्यकर्त्यांसाठी गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे आपण अभिनंदन नव्हे, तर आशीर्वाद द्यावेत, असा हट्ट केला. त्यावेळी त्यांनी जे मार्गदर्शन केले, ते माझ्या आजही स्मरणात आहे. ते म्हणाले होते की, “चंद्रकांत, आता तू प्रदेशाध्यक्ष झाला आहेस. म्हणजे एका कुटुंबाचा प्रमुख झाला आहेस. ज्याप्रमाणे घरातील कर्तापुरूष किंवा व्यक्ती घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतो; त्याप्रमाणे पक्षात किंवा सार्वजनिक जीवनातील कार्यकर्त्याची काळजी घे! कारण, राजकारणात काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्ता नेहमीच तणावात असतो. त्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे,” असा त्यांचा आग्रह होता. त्यांचे हेच विचार माझ्यासाठी नेहमी जीवनमूल्य आहेत.
 
खरंतर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना घडविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यात तीन नावे महत्त्वाची आहेत. ती म्हणजे स्व. यशवंतरावजी केळकर, स्व. बाळासाहेबजी आपटे आणि स्व. मदनदासजी. यशवंतराव आणि बाळासाहेब यांच्या जाण्यानंतर मदनदासजी एक हा आमच्यासाठी एक मोठा आधारवड होता. पण, आता एखादी अडचण समोर आली, तर त्यावर कोणाचे मार्गदर्शन घेणार, हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्नच आहे. काही दिवसांपूर्वी मदनदासजी अत्यवस्थ होते, तेव्हा बंगळुरूमध्ये मी आणि माझ्या पत्नीने त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यावेळी मदनदासजींना लवकर आराम मिळावा, हीच आम्ही अंबाबाई चरणी प्रार्थना करत होतो. आज मदनदासजींच्या जाण्याने मार्गदर्शक हरपल्याचे शल्य कायमच मनात राहील. त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली...

चंद्रकांतदादा पाटील
(लेखक महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री आहेत.)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121