काही दिवसांपूर्वीच मदनदास देवीजी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, भारत देशाने मदनदास देवीजी यांच्यासारखे एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने माझ्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाखो स्वयंसेवकांना जे दु:ख झाले, ते या ठिकाणी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. खरं तर माझा आणि त्यांचा परिचय तसा खूप जुना. परंतु, भेटी मात्र काही प्रसंगीच होत असतं. परंतु, त्यांच्याशी एक नाते घट्ट बांधले गेले होते. हेच राष्ट्रीय विचारांचे नाते, आज मदनदासजी आपल्यात नाहीत, हे मनाला पटवून देण्यात अडथळा निर्माण करत आहे.
स्व. मदनदासजींच्या वास्तव्याचे केंद्र मुंबई असताना, मला काही काळ त्यांचे सान्निध्यही लाभले. या काळातच त्यांचे विचार ऐकण्याची आणि आत्मसात करण्याची संधी मिळाली. ते आजारी असताना, काही काळ भिवंडी येथील लोढा धाम येथे वास्तव्यास होते. मुंबईतील वास्तव्याच्या या काळात त्यांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळत गेले. एखादा कार्यकर्ता घडतो, तो विचारांमुळे! परंतु, युवा कार्यकर्त्यांना घडवणारी स्व. मदनदासजी यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे या भारतभूमीवर आहेत. त्यामुळे खरं तर कार्यकर्ता निर्माण करणारा विचार निर्माण होतो आणि युवा कार्यकर्त्यांना भारतमातेच्या सेवेसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे स्व. मदनदास देवीजी यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे विचार आणि त्यांनी आखून दिलेली मूल्ये आपल्याला तसेच आपल्या भावी युवा पिढीला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील, याबाबत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खात्री आहे.
मदनदासजी यांच्या जाण्याने संघ परिवारातील प्रत्येक स्वयंसेवकाने आपला जवळचा ज्येष्ठ सहकारी गमावला आहे. कारण, स्व. मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी संघाच्या माध्यमातून दिले गेलेले पहिले प्रचारक होते. त्यांनी अनेक वर्षं अभाविपचे संघटनमंत्री या नात्याने युवा पिढीला राष्ट्रीय कार्याशी जोडण्याचे काम केले. यशवंतराव केळकर यांच्या सान्निध्यात त्यांनी अभाविपसाठी पूर्णवेळ काम केले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर स्वतंत्र भारताच्या विद्यार्थी आणि युवक चळवळींच्या इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व आज खरं तर संपुष्टात आले आहे.
राष्ट्रनिर्माणाचे शिवधनुष्य पेलत असताना, देशातील युवा पिढीला सामाजिक समरसतेची आणि सामाजिक न्यायाची जाणीव करून देणे, तसेच त्यांच्यामध्ये स्त्री-पुरुष समतेची जाण विकसित करणे आणि तो युवक एक चांगला आणि प्रगल्भ नागरिक देशाच्या गंभीर प्रश्नांकडे बघू शकेल, यासाठी सर्व काही रचना करणे, हे आव्हानात्मक कार्य अभाविपच्या तत्कालीन वरिष्ठ मार्गदर्शकांनी लीलया पेलले होते. यामध्ये स्व. मदनदास देवीजी यांचादेखील सिंहाचा वाटा होता.
माझ्या मते, स्व. मदनदासजी हे खरं तरं राष्ट्रसेवेच्या मार्गावरील एक कर्तव्यदक्ष पुजारी होते. राष्ट्रीय कर्तव्य जाणणारी कर्तव्यदक्ष पिढी निर्माण करण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षं पार पाडले. त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यांची शब्दांच्या पलीकडे जाण्याची तसेच त्या शब्दांमागील भावना जाणून घेण्याची अगाध क्षमता होय. याबाबत अनेकांना सांगतादेखील येईल. अनेकांना याबाबत अनुभव आलेले असावेत.
मदनदासजी अतिशय नम्रपणे बोलणारे आणि नेहमीच हसतमुख राहणारे व्यक्तिमत्त्व होते. अनेक तासांच्या प्रदीर्घ चर्चांचे सार केवळ काही वाक्यांत मांडण्याची कला त्यांना अवगत होती. हेच भाषेचे अगाध ज्ञान, त्यांनी युवा पिढीला दिले आणि युवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळत गेली. स्वतःला मागे ठेवून, सामान्य कार्यकर्त्यांशी आपली नाळ जोडून किती मोठे यश मिळवता येते, हे मदनदासजींचा जीवनप्रवास दर्शवतो.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात मदनदासजी यांच्यासारखा सच्चा ज्येष्ठ कार्यकर्ता आज भारतमातेने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचे अपरिमित नुकसान तर झाले आहेच; परंतु देशातील युवा पिढीच्या विचारांना बळ देणारा एक मार्गदर्शक आपण सर्वांनी गमावला आहे. स्व. मदनदासजी यांचे विचार आणि मार्गदर्शन पुढील पिढीला देण्याचा प्रयत्न करण्याचा विचार यानिमित्ताने मांडतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती!
मंगलप्रभात लोढा
स्वयंसेवक, रा. स्व. संघ
कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य