राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. माझ्या विद्यार्थीदशेत मदनदासजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटनमंत्री होते. त्यामुळे तेव्हापासून अलीकडच्या काळापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाचे भाग्य मला लाभले. अभाविपची पाळेमुळे घट्ट करणे आणि त्या संघटनेचा विकास यात मदनदासजींचा सिंहाचा वाटा आहे. ते चार्टर्ड अकाऊंटन्सीमध्ये सुवर्ण पदक विजेते होते. अत्यंत कुशाग्र बुद्धीचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
मनात आणले असते, तर चार्टर्ड अकाऊंन्टन्सीसारख्या क्षेत्रात त्यांना फार मोठे होता आले असते. पण, देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःचे जीवन अर्पण करण्याचे ठरविले होते. सहा दशकांहून अधिक काळ संघटनात्मक व रचनात्मक कार्यांतून देशसेवा करताना त्यांनी एकेक क्षण भारतमातेच्या कल्याणासाठी वेचला. प्रखर बुद्धिमत्तेचे वरदान असलेले मदनदासजी कठोर शिस्त आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जात. त्यांच्या शिस्तीत आणि संस्कारात असंख्य कार्यकर्ते घडले, संस्कारित झाले. आज ती सगळी मंडळी विविध क्षेत्रांत उत्तम काम करीत आहेत.
मदनदासजी हे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर त्यांची अतूट श्रद्धा आणि निष्ठा होती. स्वयंसेवक आणि कार्यकर्त्याचा ते माणूस म्हणून विचार करायचे. मला आठवते, मागास समाजातून आलेले गुरुदेव सोरदे नावाचे आमचे एक नागपुरातील पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. त्यांनी काम थांबवावे आणि शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करावा, असे ठरले. त्यांची पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा होती. मी स्वतः मदनदासजींकडे गेलो. “ते पूर्ण वेळ काम करायला तयार आहेत. मग तुम्ही असा निर्णय का घेत आहात,” असे मी त्यांना विचारले.
त्या प्रश्नावरचे त्यांचे उत्तर आजही मला स्मरते. मदनदासजी मला म्हणाले की, “तू आता लॉ झाला आहेस. पुढे राजकारणात जाशील. मोठा होशील. तुझे लग्न होईल. तो जेमतेम दहावी शिकला आहे. आता आपण प्रचारक म्हणून काम करायचे नाही, असे उद्या एखाद्या टप्प्यावर त्याच्या मनात आले त्याचे कसे होईल, याचा विचार कर. त्याचे आयुष्य खराब होईल. त्यामुळे त्याने योग्य वेळी आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी किंवा व्यवसाय केला पाहिजे. त्यानंतर त्याला काम करता येईल. कार्यकर्ता काम करतो. म्हणून त्याला वापरत राहावे, ही आपली संस्कृती नाही. आपण आपल्या कार्यकर्त्याचा माणूस म्हणून विचार केला पाहिजे.”
मला मदनदासजींकडून अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषतः परिश्रम आणि समर्पण या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेहमी प्रतिबिंबित होत. मी भाजपचा अध्यक्ष झालो, तेव्हा त्या पदासाठी चार नावे आली होती. अडवाणीजी वगैरे ज्येष्ठ मंडळींनी त्यातून माझे नाव निवडले होते. मला संघ कार्यालयात बोलावले गेले. त्याप्रसंगी मा. सर्वश्री मोहनजी, भैय्याजी, सुरेशजी, मदनदासजी यांच्यासह अनेक प्रमुख लोक उपस्थित होते. ‘भाजपचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा,’ असे मला सांगितले गेले. त्यावर मी म्हणालो की, “मला दिल्ली माहिती नाही. माझा अनुभव नाही. मला जनरल सेक्रेटरी म्हणून पाठवा. अनुभव घेऊ द्या, मग ही जबाबदारी द्या.” त्यावेळी ज्येष्ठ मंडळींकडून मला असे सांगितले गेले की, ‘’तू स्वयंसेवक आहेस. संघ सांगेल ते काम करीन, असे तू म्हणतोस.
आता सांगितले ते काम कर. बाकी चर्चा करू नकोस.” त्यातही मदनदासजींनी मला विशेष आग्रह केला. त्यांचा तेवढा नैतिक अधिकार होता. दीनदयाळ शोध संस्थान, अभाविप, भाजप यांसह सर्व संघटनांमधील कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा, कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करणे, हा त्यांचा स्वभाव होता. संघटनेच्या भविष्याचा विचार करून दिशादर्शन करणे, ही त्यांची खासियत होती. जीवनाच्या अखेरपर्यंत समाज आणि देश यांच्यासाठी त्यांनी समर्पित भावनेतून काम केले. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाकडून मला मार्गदर्शन मिळाले व खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांचे ते मार्गदर्शन ही माझ्यासाठी आयुष्यभर पुरून उरेल एवढी मोठी पुंजी आहे. मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो.
नितीन गडकरी,
(लेखक भाजपचे ज्येष्ठ नेते असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री आहेत.)