समाजशिल्पी मदनदासजी!

    07-Aug-2023
Total Views | 80
Article On Madandas Devi Written By Union Minister Amit Shah

मदनदास देवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अर्ध्वयू आणि समाजजीवनावर आपली अमीट छाप उमटवणारे समाजशिल्पी. समाजशिल्पी एवढ्यासाठी की, त्यांनी हजारो कार्यकर्त्यांमधील सामाजिक चेतना जागृत केली. केवळ जागृत केली नाही, तर प्रवाही केली. त्या प्रवाहाने हा देश नव्याने घडला.

मदनदासजी देवी निवर्तले. सामान्य माणसासाठी हे नाव म्हणजे केवळ एका संघटनेचे माजी पदाधिकारी असे असू शकते. पण, असंख्य कार्यकर्ते, त्यांच्या घरातील सर्व सदस्य, त्या सदस्यांच्या भावविश्वात मदनदासजी देवी यांचे स्थान गहिरे आहे. हे गहिरेपण माणूस गेल्यावर अजून गडद होते. त्यांच्या नसण्याची छाया उदासवाणी आहे. मदनदास देवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अर्ध्वयू आणि समाजजीवनावर आपली अमीट छाप उमटवणारे समाजशिल्पी. समाजशिल्पी एवढ्यासाठी की, त्यांनी हजारो कार्यकर्त्यांमधील सामाजिक चेतना जागृत केली. केवळ जागृत केली नाही, तर प्रवाही केली. त्या प्रवाहाने हा देश नव्याने घडला. ‘अभाविप’ हे त्याचे संक्षिप्त रूप. सामान्य माणसातील असामान्य कार्यकर्तेपण आणि सामान्य कार्यकर्त्यातील असामान्य माणूसपण ओळखण्याची विलक्षण हातोटी मदनदासजी देवी यांची होती.

मदनदास देवी शिक्षणाने वकील होते. ६०-७०च्या दशकात ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाले. सामान्य कुटुंबातील कुशाग्र बुद्धिमत्तेचे मदनदासजी देवी यांनी ठरवले असते, तर खोर्‍याने पैसा कमावला असता. तशी सामाजिक परिस्थिती होती म्हणा. पण, व्यक्ती नव्हे, तर देश श्रेष्ठ. हे बीज त्यांच्यात रूजलेले होते. या देशासाठी सर्वस्वार्पण करण्याची चेतना जागृत झाली, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यावर. संघ विचाराचा, संघ परिवाराचा विस्तार होत असताना तरूणांचे विशेषतः महाविद्यालयीन तरूणांचे भावस्पंदन टिपून त्यांना देशहितासाठी सक्रिय करत असलेल्या अभाविपमध्ये मदनदासजी यांचा संचार सुरू झाला. अशांत जम्मू-काश्मीर, धुमसणारा पंजाब, परकीय शक्तींच्या हस्तक्षेपामुळे अस्वस्थ असलेला ईशान्य भारत, एकीकडे चीन, तर दुसरीकडे पाकिस्तान-दुहेरी सीमावादात पोखरलेला देश, या आव्हानात्मक वातावरणात सामाजिक संघटनेचे सतीचे वाण त्यांनी हाती घेतले.
तरूणांचे भावविश्व वेगळे असते. प्रलोभनं खुणावत असतात. सामाजिक आशय-विषय मुक्तपणे समजून घेण्याचा दिलदारपणा त्यांच्यात असतो. बाह्य जगाविषयी कुतूहल असते. देश-स्थळ-काळाचे चिंतन असते. भुलवणार्‍या वाटाही असतात. अशा तरुणांमध्ये मदनदास देवी यांनी संघटना उभारली.

बाह्यजगातील ज्ञान, उत्तमोत्तम माणसे, देश-संघटना हितासाठी त्यांनी परिवारातील संघटनेत आणली. वरवर सामान्य भासणारी ही माणसे आज सार्वजनिक जीवनात मोठ्या पदावर आहेत. ज्यांना त्यांनी घडवले त्यांनी उभारलेल्या संस्था, संघटना नि काम पाहिल्यावर याची साक्ष पटेल. हे सारे लोक समकालीन परिस्थितीवर प्रभाव टाकत आहेत. यापैकी कुणाच्याही घरी दिवाणखाण्यात मदनदास देवी यांचे छायाचित्र नसेल. पण, प्रत्येकाच्या मनात त्यांनी रूजवलेली देश व संघटननिष्ठा अबाधित आहे.
लौकिक आयुष्याचा त्याग करून अत्यंत खडतर असे पूर्णवेळ कार्यकर्त्याचे (प्रचारक) जीवन मदनदासजी देवी यांनी स्वीकारले. मी असंख्य वेळा त्यांचे भाषण ऐकले आहेत. त्यांचे विचारविश्व विस्तृत होते. पण, लौकिक शिक्षण त्यांनी कधीही मिरवले नाही. ‘मी वकिलीचे शिक्षण घेत असताना ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर’ वगैरे वाक्ये त्यांनी कधीही वापरली नाहीत. सामान्यांच्या भाषेत ते संवाद साधत. संघटनेत मोठ्या पदावर असतानादेखील त्यांनी कार्यकर्त्यांसाठी त्यांची असलेली श्रवणभक्ती कधीही थांबवली नाही. पूर्ण लक्ष देऊन कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत. शांतपणे उत्तरे देत. शंकासमाधान करत. काय विलक्षण योगायोग आहे. अभाविपची पंचाहत्तरी आणि मदनदासजी देवी ८० वर्षांचे होण्याचा योग मागेपुढे यावा! दोघेही अद्वैत होते.

आधुनिक अभाविपची पायाभरणी करणार्‍या यशवंतराव केळकरांच्या व्यक्तिमत्त्वातील सारे स्थायी गुण मदनदासजींच्या ठायी होते. कार्यकर्त्यांमधील अस्थायी दोष दूर करून, त्याच्यात हे स्थायी गुण उतरवण्याचे संघटनकौशल्य मदनदासजी देवी यांच्यात होते. एकेक कार्यकर्ता घडवला. संघटना, कार्यकर्त्याच्या जीवनात येणार्‍या अटीतटीच्या प्रसंगात मदनदासजी देवी यांचा मार्गदर्शनपर सक्रिय सहभाग नेहमी असे. जेवढी डोकी असतात तेवढी मतं. जेवढी मतं तेवढे मतभेद. पण, मतभेद असले, तरी मनभेद होऊ न देण्याचा ज्येष्ठत्त्वाचा सुजाणपणा मदनदास देवी यांच्यात होता. संघटना म्हटली की गटतट, दोन व्यक्तींमधील मतभिन्नता आलीच. संघटनेच्या हितासाठी स्वमताचा संकोच करणार्‍यांच्या मनी कधीही मदनदासजी देवी यांनी कटूता येऊ दिली नाही. अशांना जपले. कार्यकर्त्यांमधील शक्तिस्थळे शोधताना चुकांकडे दुर्लक्ष केले नाही. अत्यंत सौम्य शब्दात चूक लक्षात आणून द्यायचे. त्याची पुन्हा वाच्यता करायची नाही.

ज्या काळात मदनदासजी देवी सक्रिय होते, तो काळ वैचारिकदृष्ट्या खडतर होता. नवी आव्हाने होती. कुटुंब केंद्रित काँग्रेसी, डाव्या विचारधारांनी आव्हान उभे केले. असा महत्त्वाचा कालखंड त्यांनी सांभाळला. नव्यांना संधी दिली. नवे प्रवाह संघटनेत आणले. संघटनेतील कालबाह्य प्रवाह बदलले. सामान्य माणसांसाठी मदनदासजी देवी कोण होते, या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. त्यांच्या निधनानंतर लिहिले- बोलले जाते आहे. थोरामोठ्यांचे भावनिक बोल ऐकू येत आहेत, अशा व्यक्तीच्या नावे एकही संस्था नाही. बँक खाते नाही. सोशल मीडियावर भरभरून वाहणारी छायाचित्रेही नाहीत. मग मदनदासजी देवी कोण होते? असंख्य क्षमतावान माणसे उभी करणारी चालती बोलती संस्था होते, मदनदासजी देवी! सार्वजनिक जीवनात ५० वर्षं सक्रिय असूनही संघटनांतर्गत व बाहेरही मदनदासजी देवींविषयी विवाद कधीही झाला नाही. याचे सारे श्रेय त्यांची वैचारिक बांधिलकी व ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ या मूल्यांचे आहे. दोन भिन्न प्रवृत्तीच्या क्षमतावान कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून प्रत्येकाच्या स्वभावाचे कंगोरे घासताना त्यांनी कधीही कुणालाही दुखावले नाही.

सार्वजनिक जीवनात कुणाचे निधन झाले की, त्याच्याशी संबंधित व्यक्ती व्यथित होता. निधन झालेल्या व्यक्तीच्या प्रभावक्षेत्रावर दुःख उमटते. मदनदासजी देवी यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य दुःखी आहेत. आपल्या घरातील कुणी ज्येष्ठ गेल्याचा भावनावियोग आहे. वयोपरत्वे हिंडण्या-फिंडण्यावर येणार्‍या मर्यांदावर मात करून मदनदास देवी यांनी कौटुंबिक स्नेह टिकवला, नव्हे तर वाढवला. अलीकडच्या काळात त्यांची भेट केवळ व्हिल चेअरवरच होत असे. पायाला भिंगरी लावून आयुष्यभर फिरलेला हा माणूस व्हिल चेअरवरून तेच तर काम करत होता, राष्ट्रनिर्माणाचे! अनेक कुटुंबांमध्ये त्यांचे स्थान प्रमुखाचेच होते.

पोलादासारखे करारी मदनदासजी देवी कार्यकर्त्यांसाठी नम्र ध्येयव्रती होते. काया-वाचा-मने मदनदासजी देवी आपल्या जीवन ध्येयाशी एकरूप झाले होते. आपली मातृभू बलशाली व्हावी म्हणून सर्वस्वार्पण करणारे मदनदासजी देवी मोठ्या हिमगिरीसारखे होते. हिमगिरी वितळतानादेखील मातीत ओल ठेवून जातो. तो गेल्यानंतरही असंख्य बीजे त्यातून अंकुरतात. मदनदासजी देवी यांची प्रेरणा चिरस्थायी आहे. अखेरच्या दिवसांमध्ये व्याधीग्रस्त शरीर असतानादेखील ते श्रांत, विकल, अस्वस्थ दिसले नाहीत. सतत कार्यकर्त्यांशी संपर्क हेच जणू त्यांचे औषध होते.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह, अभाविपचे सर्वोच्च प्रमुख, अशी बाह्य जगासाठी मानाची नसलेली; पण परिवारात अत्यंत आदराची पदे भूषवताना कमालीचा साधेपणा त्यांच्या ठायी होता. आणीबाणी, रामजन्मभूमी आंदोलन, देशात काही काळ निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, अशा कालखंडात मदनदासजी देवी यांचे करारीपण विलोभनीय होते. विचारधारेची अनुकूलता व प्रतिकूलता अशा दोन्ही वेळी आपल्या ध्येयापासून जराही विचलित न होता, काम करत राहण्याचा आदर्श त्यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवला. हा निर्लेपपणा कायम ठेवणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. हा निर्लेपपणा एका नितांत सुंदर गीतात आहे-

शत्रु को भी जीतता था आपका चारित्र्य उज्वल
निन्दकोंपर मात करता आपका व्यवहार निर्मल
मातृभू की वेदना जो आपके मन में बसी थी
पा सके अल्पांश भी तो पूर्ण होगी साधना॥
आपले गुण, बुद्धिमत्ता, लौकिक शिक्षण देशासाठी झिजवून आत्मीय प्रेरणा मागे ठेवून केवळ नरदेह सोबत घेऊन जाणार्‍यांसारखे खरंच कुणी असतील का!

अमित शाह
(लेखक भाजपचे ज्येष्ठ नेते असून केंद्रीय गृहमंत्री आहेत.)



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121