कधीकाळी छात्रशक्तीची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन भारतभर फिरणारा हा पैलवान शरीराने थकत चालला. पुढे व्हीलचेअर सोबतीला आली तरीही संघटनेच्या, कार्यकर्त्यांच्या, परिवाराच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची, अपेक्षित त्या बैठकीला जाण्याची एक अनामिक ओढ, तरल इच्छा कळकळ शेवटपर्यंत कायम राहिली आणि त्यामुळे थकलेल्या शरीरानेही मदनजी अनेकांना भेटत राहिले. अनेकांना त्याही स्थितीमध्ये प्रेरणा देत राहिले.
विदर्भ एक्सप्रेसमधून सकाळी मदनजी दादर स्टेशनला उतरले. सरावाप्रमाणे मी त्यांना रेल्वे स्थानकावर आणण्यासाठी गेलो होतो. परंतु, या वेळेला मिशन कार्यालयाच्याऐवजी सरळ विमानतळावर जायचे होते. तिथून पुढे मदनजींना लडाखमध्ये सिंधू दर्शनाच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित राहायचे होते. हाती असलेल्या विमानाच्या तिकिटाची परिस्थिती निश्चित- अनिश्चितेच्या दरवाजावर लोंबकळत होती. ज्या नेहमीच्या रचनेतून तिकीट काढले गेले होते, त्याचा दूरध्वनी बंद येत होता. संघ कार्यालयातही निश्चित अशी माहिती मिळत नव्हती. मदनजींना या सर्व परिस्थितीची कल्पना होतीच. माझ्यासोबत मुंबई संघटन मंत्र्यांचा गरुडा फोन ‘डायल किया हुवा नंबर स्विच ऑफ हैं। कोई जवाब नही दे रहा हैं।’ असे वारंवार कोकलून बंद व्हायचा.
मदनजींनी अनुभवाच्या आधारे मला सांगितले की, “आपले तिकीट ‘कन्फर्म’ झालेले नाही. म्हणून तिकीट काढणारा आता फोन उचलणार नाही. पण, तू आहेस ना मग मी नक्की दिल्लीला जाईन.” मला समजेना की, मी काय नक्की करणार? कारण, विमानाचे तिकीट ‘कन्फर्म’ होत नाही, ही बाब माझ्यासाठी अगदी नव्या कोर्याकरकरीत नोटेप्रमाणे होती. माझ्या गोंधळलेल्या व कार्यालयाच्या दिशेने युटर्न घेण्याच्या चेहर्याकडे पाहून ते म्हणाले, “तुझ्यावर माझा विश्वास आहे, तू मला नक्की पाठवशील!” तिथपर्यंत किंवा त्यापर्यंत विमानात कधी प्रवास केलाच नव्हता. (२०१५ मध्ये प्रथम प्रवास करण्याचा योग आला) प्रवेशद्वाराच्या आतील व विमानातील दृश्य केवळ चित्रपटातच बघितलेली होती. प्रत्यक्ष विमान व्यवस्थेचा जो काही अनुभव होता, तो मात्र अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना कार्यालयातून घेऊन एअरपोर्टच्या दारापर्यंत सोडणे आणि बर्याच वेळेला एअरपोर्टच्या दारावरून त्यांना ‘रिसिव्ह’ करून पुन्हा कार्यालयात आणणे.
गाठीशी अनुभव म्हणावा, तर तो रेल्वेची ‘कन्फर्म’ नसलेली तिकिटे मी आणि श्रीरंगने अनेक वेळेला जुगाड करून ‘कन्फर्म’ केलेली होती. परंतु, विमानाच्या बाबतीमध्ये कशाशी काय खातात, हे काहीच माहिती नव्हतं. परंतु, मदनजींनी विश्वास दर्शवलेला आहे, त्यामुळे प्रयत्न करू, असं म्हणून एअरपोर्टला आम्ही पोहोचलो. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मप्रमाणे मदनजींनी विमानतळावरील माझे तिकीट काढले. एअरपोर्टच्या सर्व सिस्टीम मदनजींनी समजावून सांगितल्या. आशंका सत्यात बदलली. जेट विमानाच्या सुंदरीने तिकीट ‘कन्फर्म’ नसल्याचे अंतिम संकेत दिले. मदनजींना सामानासह एका जागी बसवले. तिथून ‘परिषद स्किल’ सुरू झाले. ‘काय करता येईल’ या माझ्या मराठीमिश्रित हिंदीला तिने ओठांचे धनुष्य फार न ताणता सफाईदार इंग्लिशमध्ये उत्तर दिले, “काहीही होणार नाही. होण्याची शक्यता झिरो टक्के.” लक्षात आलं की, हिच्याशी संवाद करून वेळ फुकट जाईल तिला तिच्या वरिष्ठांबद्दल विचारले. तिने दिलेल्या आढेवेढे घेत मिळालेल्या ‘क्लु’तून तीन-चार फेरीत शेवटी जेटच्या इन्चार्जची गाठ पडली.
अर्धे हिंदी, अर्धे इंग्रजीमध्ये त्याला मदनजी कोण आहेत? नेमके काय काम करतात? संघ, त्याचे सहकार्यवाह म्हणजे काय हे सगळे सांगितले. एक बरे होते की, सोबत असलेल्या निमंत्रण पत्रिकेत मदनजींसोबत दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचेही नाव झळकत होते. दिल्लीतून पुढे ते एकत्रित जाणार होते. होय-नाही, होय-नाही करत अखेर त्यांनी मला मदनजी कॉकपिट सदृश्य कोणत्या तरी जागेतून प्रवास करतील का म्हणून विचारले? त्याला मी लगेच हमी भरली. कारण, एसटीचा फुटबोर्ड, भरलेली वडाप, अनारक्षित रेल्वेचा डबा, गेला बाजार कार्यालयातील विशिष्ट पूर्ण स्कूटर आणि ग्रामीण रस्त्यावरील सायकली, या प्रवासाने समृद्ध झालेले मदनजी दीड-दोन तासांच्या या दिव्य प्रवासाला नक्की तयार होतील, याची मला खात्री होती. तरी त्याने मला मदनजींचा होकार घेऊन यायला सांगितलाच!
मदनजीही लगेच तयार झाले. पुन्हा एकदा बोलण्याच्या फेरी सुरू झाल्या कॉकपिट व एकूण विमानातील त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, म्हणून विचारलेल्या प्रश्नांनी माझे विमान प्रवासाबाबतचे अज्ञान तिथे प्रकट झाले असावे. कारण, त्यांनी मला शेवटी विचारलेच, “तू कधी विमानातून प्रवास केला नाहीस का?” विमानात काय तो ज्या जागी होता तिथंपर्यंत ही मी पहिल्यांदाच पोहोचलो होतो. त्या सर्व संवादातून त्याने ‘एक्झिक्युटिव्ह’मधील एक जागा देण्याचे मान्य केले. झाले तिकीट ‘कन्फर्म’ नसलेल्या आणि ‘झिरो’ आशेचे दरवाजे सताड उघडले गेले. त्यातून मदनजी एक्झिक्युटिव्ह खुर्चीवर बसून दिल्लीला जाण्यासाठी सज्ज झाले.
जिथून विमानात ‘एन्ट्री’ होते, तिथपर्यंत मी जायला लागल्यानंतर मदनजींनी मला हाक मारली आणि सांगितले, “त्या पुढे आता मीच जाऊ शकतो.” माझ्या पाठीवर त्यांची कुस्तीगिरीची (मदनजी शरीराने प्रशिक्षित कुस्तीगीर होते आणि बुद्धीने वकील, सीए होते) थाप मारून ओरडले, “बले बहाद्दर.” १९९७ अथवा १९९८ मध्ये मारलेली ती थाप आजही कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये लढण्याची, प्रयत्न करून पाहण्याची, निराशा झटकून हात-पाय हलविण्याची मला प्रेरणा देते.
त्या दिवशी ही खूणगाठ नक्की बांधली गेली. अंधारलेल्या बोगद्यापलीकडे प्रकाशाची किरणे वाट पाहत आहेत. ‘आत्मविश्वासाने एकटा असला तरी अंधार चिरत जा, विजय नक्की मिळेल’ आणि आजही हा आशावाद टिकवून ठेवण्यास ती थाप कारणीभूत ठरलेली आहे. तसं पाहिलं तर मदनजींना मी भेटलो १९९१ मध्ये. माझा जन्म १९७०चा, तर मदनजी १९७० मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री झाले होते. आम्ही प्रथम भेटलो ते विद्यार्थी परिषदेच्या विदेशातील जी मुले भारतात शिकतात त्या (world organisation student and youth) आयामाच्या मुंबई येथील एका कार्यक्रमात. त्यावेळेला मी २१ वर्षांचा आणि मदनजी ५० वर्षांचे होते.
विदेशी मुलांच्या एकत्रीकरणामध्ये झालेली पहिली भेट अकृत्रिम अशा सहवासात बदलली. तो सहवास अगदी काल परवापर्यंत सजीव आणि कर्तव्यपथ समृद्ध करणारा झाला.गेल्या काही वर्षांत नेहमीच्या संवादाच्या टप्प्यात नसलो तरी त्यांच्या तल्लख स्मृतीत, अपार अशा करुणामय नजरेत आणि काही काळ घट्ट पकडून ठेवलेल्या हाताच्या स्पर्शात कायमचा सामावलेला आहे. केंद्रीय टीमची ऑगस्टमधील बैठक अनेक वर्षे मुंबईत व्हायची. त्यानिमित्ताने सर्व केंद्रीय स्तरावरचे पदाधिकारी चार-पाच दिवसांसाठी मुंबईत असायचे. त्यांच्या यातायात व्यवस्थेमध्ये मी परिषद संपर्काच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच होतो. त्यात मदनजींना अनेक वेळेला विविध स्थानी, त्यातही बाळासाहेब आपटे यांच्याकडे आणणे-सोडणे याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर अनेक वर्षे होती. त्यानिमित्ताने घडलेला सहवास, झालेला संवाद, छोट्या छोट्या उदाहरणांमधून प्रकटत गेलेले संघटनेचे तत्त्वज्ञान आजही अनेक प्रसंगी साथसोबत करतात.
एक प्रमुख कार्यकर्ता सहवासातून कसा निर्माण होत जातो किंवा निर्माण केला जातो, याचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे मदनजी होते. संघाबद्दलच्या अनेक धारणा या मदनजींसोबत बोलून अनेक वेळा स्पष्ट झाल्या. मी १९९३ पासूनच कार्यालयात राहिला आलो. परंतु, पूर्णवेळ कार्यकर्ता नसल्याने पूर्णवेळ बैठकीत किंवा वर्गात अपेक्षित नसायचो. त्यामुळे या बैठकीबद्दल, या जीवनाबद्दल, या अनुभवाबद्दल एक उत्सुकता होती. या बैठकीत होणारी बौद्धिके, विचारसत्रे त्यात ही मदनजी, सदाशिवराव यांची बौद्धिके म्हणजे पर्वणीच! जेव्हा १९९८ मध्ये विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी बाहेर पडलो, त्या वेळेला लोणावळा येथे झालेल्या वर्गातील ‘पूर्णवेळांची भूमिका’ या सत्रामध्ये मदनजींनी विषय मांडताच नावीन्यपूर्ण एक प्रश्न विचारला. अनेक मोहाच्या गोष्टी, अनेक मजेशीर, सांसारिक गोष्टी करण्याचे हे वय आहे. अनेक जण करतात, केलेही पाहिजे. पण, तुम्ही विचार करून बघा की, हे सारे या जन्मात नाही केले आणि या जन्मात संघटनेच्या माध्यमातून केवळ आपला वेळ, आपले कौशल्य आपण भारतमातेसाठीच देऊ शकलो, तर त्याच्यासारखा अमृतानंद कुठेच सापडू शकत नाही.
त्याच वर्गात किंवा अन्य कधीतरी त्यांनी “पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी केवळ एक वर्ष प्रामाणिकपणे काम करावे. ज्या दिवशी वर्ग असेल, त्यावेळेला आपल्या जबाबदारीचा कोट हा उतरवून ठेवावा आणि पुन्हा एकदा जी जबाबदारी मिळेल, ती अंगावर चढवून मार्गक्रमण करत जायचं, याच्यावर आपण निर्धाराने पण आनंदीत चालू शकतो का?” असे विचार मांडले.मागे वळून विचार करताना लक्षात येते की, गेली २५ वर्षे आपण पूर्णवेळ म्हणून काम करू शकलो. त्यात अशाच बौद्धिकांचा आणि वेळोवेळी केलेली विचारपूस निश्चितपणे मोलाची आहे. मदनजींच्या व्यवस्थेमध्येही एक-दोन दिवस राहण्याचा योग आला. त्यामध्ये टापटीपपणा, स्वच्छता, शक्यतो स्वतःची कामं स्वतः करण्याचा आग्रह, बारीक-बारीक गोष्टींत तत्परता, सहकारी ते नवख्या कार्यकर्त्याचीही काळजी, असे अनेक गुण जे संघटनेच्या दृष्टीने प्रमुख कार्यकर्ता बनण्यासाठी आवश्यक असतात, ते कळत नकळत शिकत गेलो आणि त्या वयात ग्रहणही होत गेलं. तो सहवास, अकृत्रिम स्नेह, ते अनुभवी शब्द, ती उदाहरणं आजही जीवनाच्या अनेक कठीण प्रसंगी, मोहाच्या, निराशेच्या क्षणी परत उठण्यास कारणीभूत होतात.
मदनजी २००८ नंतर पक्षाघाताच्या आजाराने हळूहळू विकलांग होत गेले. कधीकाळी छात्रशक्तीची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन भारतभर फिरणारा हा पैलवान शरीराने थकत चालला. पुढे व्हीलचेअर सोबतीला आली तरीही संघटनेच्या, कार्यकर्त्यांच्या, परिवाराच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची, अपेक्षित त्या बैठकीला जाण्याची एक अनामिक ओढ, तरल इच्छा कळकळ शेवटपर्यंत कायम राहिली आणि त्यामुळे थकलेल्या शरीरानेही मदनजी अनेकांना भेटत राहिले. अनेकांना त्याही स्थितीमध्ये प्रेरणा देत राहिले.
एकदा मी आणि ते मुंबईच्या भवन्स कॉलेज जवळ काही कामासाठी गेलो होतो. नकळत एक मोठा अपराध माझ्या हातून घडला. मदनजींच्या हाताला धरून बरोबरीने चालता चालता एक क्षण मी गाफील राहिलो आणि मदनजींचा पाय अडकून मदनजी खाली पडले. सुदैवाने काही लागलं नाही. परंतु, तो एक क्षण आजही बोचत राहातो की, आपण कर्तव्याला चुकलो आणि आपल्यामुळे एका वरिष्ठ कार्यकर्त्याला जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं. परंतु, त्याही परिस्थितीमध्ये मदनजी सावरले. माझ्याबाबत शब्दाने अथवा नजरेने कोणतीही नाराजी अथवा चिडचिड व्यक्त न करता काहीच झाले नाही, असे दर्शवित चाललेला विषय पुढे नेला. बहुतेक विषय हिंदुत्व, संघ, जातीयवाद, मनुस्मृती असा होता. मी विचारत होतो आणि त्याची माझ्या दृष्टीने काय काय उत्तरे आहेत हे ते जाणून घेत होते. शेवटी त्यांनी मला भवन्सच्या पुस्तकालयात नेले आणि ‘मनुस्मृती’ हा ग्रंथ विकत घेऊन दिला. ते मला म्हणाले की, “तू वाचनामध्ये, तर्क करण्यामध्ये हुशार दिसतोस. त्यामुळे हे तू नक्की वाचून काढ.” कार्यकर्त्याची केवळ भावनिकच नाही, तर वैचारिक गरजही पूर्ण करणारे मदनजी हे एक वेगळं रसायन होते.
एखाद्याला आपण जेव्हा ‘आत्मिय कार्यकर्ता’ असे संबोधतो, तेव्हा तो केवळ शाब्दिक दाखविण्यापुरता असतो की व्यवहारातही कसा उतरवलिा जातो, हे मदनजींच्या स्वउदाहरणाने एकाअकल्पित प्रसंगी मला अनुभवता आले. मुंबईच्या यशवंत भवन येथील संघ कार्यालयाच्या सहाव्या मजल्यावर मदनजी अनेक वर्षे राहिले. जे शरीराने थकलेले आहेत, ज्यांना प्रत्येक क्षणी कोणाच्या ना कोणाच्या मदतीची गरज आहे, अशा वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या सेवेमध्ये नक्की केलेला एखादा कार्यकर्ता असतोच. परंतु, काही कार्यकर्त्यांची तास अथवा दिवसावारी योजना केलेली असते. मी ही १९९२-९३ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या तासातासाने बदलणार्या व्यवस्थेत होतो. संघ विचारधारेतील ही सर्वांत खतरनाक जमात आहे. एकदा का तो कर्तव्य म्हणून तात्पुरता का होईना, अंगरक्षक झाला की सुरक्षारक्षकाचे आपल्या दृष्टीने वाटणारे सारे अवगुण त्यात प्रकट होतात. तो अथवा ती कमांडो बनतात, त्या नियमांना बगल देऊन त्या चौकटीतून सहजासहजी कोणी प्रवेश करू शकत नाही.
कामानिमित्त यशवंत भवनला गेलो होतो. मदनजी आहेत म्हटल्यानंतर बाहेरच्या व्यवस्थेतल्या कार्यकर्त्याला सहजतेने म्हटलं, “अरे मला दोन मिनिटे मदनजींना फक्त पाहायचं आहे.” स्वयंसेवकांनी आपल्या काटेकोर नियमाअंतर्गत ‘आता भेटण्याची वेळ नाही. भेटू शकत नाही’ हा नियम क्रमांक दोन माझ्यावर फेकला.होय-नाहीचे संभाषण सुरू असतानाच मदनजी आतून बाहेर आले. त्याला म्हणाले, “अरे हा जो आहे ना, येऊ दे त्याला आतमध्ये.” त्याला समजावत म्हणाले, “जसा तू दोन तासांसाठी माझ्या व्यवस्थेमध्ये आहेस ना, तसा हा गेली अनेक वर्षे माझ्या व्यवस्थेमध्ये राहिलेला आहे. आमचे आत्मिय संबंध तुला नाही समजायचे.”
परिषदेमधील आत्मिय संबंध हे समजणे तसे अवघडच. कारण, ना त्याला वयाची सीमा, ना एकत्रित काम करण्याचा कालखंड, कोणत्या स्तरावर किती वर्षे काम केले, हे ही महत्त्वाचे नाही. बरं आता काम करो अथवा न करोत, वर्तमान वेगवेगळ्या जबाबदारीत अन्य कोणत्याही स्थानी असो. परंतु, केवळ विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे, हा दुवा महत्त्वाचा ठरतो. त्वरित आत्मियतेचा सुगंध परिसरात दरवळला जातो आणि नजरेसह व्यवहारात प्रकट होतो.
तेथे ही तेच झाले आणि मदनजींनी यशवंतराव, बाळासाहेब आपटे, गीताताई, आपटे वहिनी, सदाशिवराव, सुरेशराव, दत्ताजी, राजजी, सुनीलजींपासून ते माझ्यासकट अगदी कालपरवापर्यंत आलेल्या कार्यकर्त्याला आत्मियतेने जवळ केले होते. आपण एका टीमचे सदस्य आहोत, हा विश्वास निर्माण केला होता. आणि मग त्याच सहजतेने कशासाठी आलो होतो, याची चौकशी केली. कधीकाळी अनेक विषयांत केलेल्या चर्चा आता घडणे शक्य नव्हते. परंतु, मौन संवादातही अफाट शक्ती असते. त्यांना केवळ बघायचं होतं. एकमेकांना पाहत असतानाही अनेक संवाद घडून गेले. यावरुन ‘आत्मिय कार्यकर्ता’ म्हणजे काय, हे लक्षात यावं. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या डब्यातील गोळ्या बिस्कीट काढून दिली. पाच मिनिटे मदनजींबरोबर मूकसंवाद झाला आणि एक नवीन प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा मी बाहेर पडलो.
कार्यकर्त्याला ‘एस्टॅब्लिश’ करणं हा गुण मी मदनजींकडून अनुभवला जेव्हा २०१२ ते २०१५ मी गुजरातमध्ये संघटनमंत्री होतो. तेव्हा एका प्रवासामध्ये मदनजी प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी आलेले होते. सहजतेने मदनजींबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांचे छोटेखानी एकत्रीकरण सुरू होते. मदनजींनी त्यांना विचारले की, “अरे महाराष्ट्रातून शरद इथे आलेला आहे ना, तुम्हाला माहिती असेलच.” ते म्हणाले, “हो पण, मग त्यालाही बोलवून घे इकडे” आणि मग मदनजींच्या आग्रहाखातर मी त्या एकत्रीकरणाला सहज गेलो आणि लक्षात आलं की, आपल्याला गुजरातमध्ये येऊनही जुने कार्यकर्ते फार ओळखत नव्हते किंवा जेवढा एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आदर असायला हवा होता, तितकाच होता. परंतु, मदनजींनी ज्या पद्धतीने माझी ओळख करून दिली, ज्या पद्धतीने मदनजींनी त्या एक-दोन तासांत माझ्याशी व्यवहार केला, त्यातून समस्त कार्यकर्त्यांना हे लक्षात आले की, आलेला प्रदेश संघटनमंत्री कोणत्या उंचीचा आहे.
तसे पाहिले तर मदनजींची माझी भेट व प्रत्यक्ष संबंध हा त्यांच्या उतारवयात व संघ अधिकारी म्हणून आला. पण, मी व्यवस्थेचा प्रमुख व केंद्रीय कार्यालयमंत्री व मदनजी अध्यक्ष व बाळासाहेब, गीताताई ज्या ट्रस्टचे संचालक होते. त्या ‘विद्यार्थी निधी ट्रस्ट’चे ही काम केले असल्याने संघटनात्मक रचनेसोबतच व्यवस्था करणारा कार्यकर्ता ही संघटनेत योग्य पद्धतीने स्थपित झाला पाहिजे आणि यांना महत्त्व दिल्याशिवाय टीम पूर्ण होऊ शकत नाही, हे त्यांनी अनेकांच्या बाबतीत केले. आपल्या व्यवहारातून सामान्य कार्यकर्त्यालाही मोठे करणे, हे तत्व मदनजींकडून मी त्यावेळी शिकलो.परवाच आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये माझ्या रागाबद्दल चर्चा चाललेली होती. प्रमुख कार्यकर्ते सहज म्हणाले, “तू मदनजींबरोबर पण भांडण-वादविवाद केला असशील.”विचार करता लक्षात आले की, जेव्हा मी मदनजींना भेटत होतो, तेव्हा, मी अनेक अवगुणांची आवरणे घेऊन वावरत होतो. ज्या ज्या काळामध्ये मदनजींचा सहवास घडला, त्यात स्वाभाविकपणे तरुणपणाच्या सुलभतेने मोठ्या आवाजात मदनजींबरोबर बोलणं, आपला मुद्दा मांडणे किंवा प्रसंगी वाद घालणं स्वाभाविक होते.
कारण, आमच्या दृष्टीने आम्ही कोणी अधिकार्यासोबत बोलत नसून, घरातील कर्ता, पण प्रेमळ अशा वडीलधारी व्यक्तित्वाशी हितगुज करतो आहे, असे जाणवायचे. दुसरे म्हणजे, ते इतके मोठे आहेत हे माहितीही नव्हते आणि समजतही नव्हते. खरंतर त्यांचे पूर्ण नाव मदनदास देवी. परंतु, आमच्यासाठी ते कायम ‘मदनजी’ झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर सहज बोलू शकत होतो, राहू शकत होतो. हे त्यांचे मोठेपण की, त्यांनी आपले मोठेपण आम्हावर कधी लादले नाही. माझी त्यांची शेवटची भेट मागील वर्षी अभाविपच्या ‘मातोश्री’ कार्यालयात अचानक झाली. मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. दहाएक मिनिटे झाली तरी नेहमीसारखा प्रतिसाद न मिळाल्याने सरतेशेवटी माझा विसर पडला असावा, असे गृहीत धरून त्यांना म्हणालो, “मदनजी मी...” त्यावेळी त्यांनी अडखळत, माझे शब्द तोडत ‘शरद’ म्हणून हात घट्ट पकडला. तोच अंतरीचा ओलावा, स्नेह शब्दांवीनाचा अवीट सहवास जो झिरपला, तो या कर्मपथावरील सर्वांत मोठी निरंतर ठेव आहे आणि तो याच जन्मीचा नसून, जन्मोजन्मीचा आहे.
दि. ९ जुलै, १९४२ ते दि. २४ जुलै... खरं तर ही सारी शब्द सुमने ९ जुलैला त्यांच्या ८१व्या जन्मदिनी बरसायची ठरवली होती. पण, ती आज श्रद्धांजली रुपात वाहत आहे.
शरद चव्हाण