मदनदास देवीजी : एक समर्पित वटवृक्ष

    07-Aug-2023
Total Views | 434
Article On Madandas Devi Written By Deputy CM Devendra Fadnavis

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री आदरणीय मदनदासजी देवी यांचे आपल्यातून अचानक निघून जाणे मनाला वेदना देणारे आहे. मदनदास देवीजी यांनी रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून स्वतःला राष्ट्र आणि समाजासाठी समर्पित केले होते. बालपणापासूनच त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपलं आयुष्य व्यतीत केले. मदनदासजी हे माझ्यासारख्या विविध क्षेत्रांतील अनेक कार्यकर्त्यांचे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व. माणूस आणि कार्यकर्ता घडवणारे ते एक विश्वविद्यालय होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने प्रत्येक जण हळहळला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तर पालकत्वच गमावले आहे. संघटन म्हणजे काय? हे समजावून सांगणार्‍या एका थोराला ही पिढी मुकली आहे.

अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री या नात्याने १९७० ते १९९२ अशी सलग २२ वर्षे त्यांनी देशभरात तालुका-शहर-कॉलेज स्तरावर सुसंस्कृत अशा कार्यकर्त्यांचा गट निर्माण करण्याकडे विशेष लक्ष दिले. विद्यार्थी परिषदेचा पाया मजबूत करण्याबरोबरच अभाविपला अगदी नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेण्याचे कार्य त्यांनी केले. देशासाठी समर्पित अशा अनेक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांची फळी घडवण्यात मदनदासजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशभरातील प्रत्येक स्तरावर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मातृप्रेमाबरोबरच पितासमान असलेली एक आदरयुक्त भीतीही होती.

विद्यार्थी परिषदेला अखिल भारतीय स्तरावर घेऊन जाण्याचे संपूर्ण श्रेय हे मदनदासजी यांनाच जाते. विद्यार्थी परिषदेत असताना अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करायचा योग आला. माझ्यासाठी ते माझे मार्गदर्शक होते. ‘बी. कॉम’, ‘एलएलबी’मध्ये ते गोल्ड मेडलिस्ट तर होतेच; पण चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरं तयार असायची. विविध विषयांवरचे त्यांचे ज्ञान वाखाणण्याजोगे होते. कार्यकर्त्याला निराशेतून बाहेर कसे काढायचे, यात त्यांची हातोटी होती. कुठल्याही अडचणीच्या प्रसंगाला आनंदीपणे सामोरे कसे जायचे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. एखाद्या विषयाच्या खोलवर जाऊन प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं, हे मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्याकडून बर्‍याच गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या कुशल संघटन कौशल्याने मी नेहमीच प्रेरित व्हायचो. त्यांच्या स्वभावातील हा गुण माझ्या जीवनात मला खूप उपयोगी ठरला.

विद्यार्थी परिषदेतून मला राजकारणात काम करण्यास सांगण्यात आले. मदनदासजींनी नेहमीच आम्हाला माणसं जोडायला शिकवली. विचारधारा कोणतीही असो, परस्परांमध्ये मैत्रीचा धागा हा कायम ठेवायचा असतो; हे त्यांच्याकडून मला खूप कमी वयात शिकायला मिळाले. राजकारण असो किंवा व्यक्तिगत आयुष्य ‘प्रत्येकाला मित्र समजावे’ हे त्यांनी आम्हाला शिकवले. त्यामुळे मीही राजकारणात कोणालाच माझा शत्रू समजत नाही. राष्ट्रसेवेशिवाय कोणतेच ध्येय त्यांच्यासमोर नव्हते. याच राष्ट्रसेवेचे बीज त्यांनी आमच्या मनात तरुणपणातच रोवले. एखाद्या व्यक्तीची किंवा त्यांच्या पक्षाची विचारधारा ही आपल्या पक्षापेक्षा वेगळी असली तरी, त्या व्यक्तीने राष्ट्रसेवेचे व्रत घेतले असेल, तर तो आपला शत्रू नाही; हे अधोरेखित करणारे मदनदासजी होते.

मदनदासजी हे जेव्हा रा. स्व. संघाचे प्रचारक झाले तेव्हा सर्व कार्यकर्ते त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलत. याला कारण म्हणजे त्यांनी निर्माण केलेला ‘कौटुंबिक जिव्हाळा.’ देशाच्या कानाकोपर्‍यातील पदाधिकार्‍यांपासून ते तरुण कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. प्रत्येकाच्या कुटुंबाबद्दल ते आवर्जून विचारपूस करत. कार्यकर्त्यांबरोबरच त्यांच्या परिवाराशी संपर्क असणे, कार्यकर्त्यांबद्दल आत्मियता असणे हे त्यांच्यातील गुण प्रेरित करणारे आहेत. असे हे राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात अग्रेसर असणारे मदनदासजी अनंतात विलीन झाले. आदरणीय मदनदासजींनी आपल्या जीवनातील जवळजवळ ७० वर्षे ही संघाच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यतीत केली. ज्यामध्ये त्यांनी शेकडो कार्यकर्ते घडवले, विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय विस्तार व पाया मजबूत केला. ग्रामीण भागातील सेवाकार्यात मार्गदर्शन केले. आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी ते खरे संघटनकर्ते होते. त्यांच्या निधनाने समाजाची आणि राष्ट्राची तसेच व्यक्तिगत स्तरावर माझ्याही आयुष्यात कधीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संघातील इतिहासाचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे राष्ट्रसेवेचे व्रत पुढे नेणे, हीच मदनदासजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

देवेंद्र फडणवीस
(लेखक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.)
 
अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121