मदनदासजी: एक मार्गदर्शक व्यक्तित्त्व

    07-Aug-2023
Total Views | 72
Article On Madandas Devi Written By Bhaiyyaji Joshi

गेले काही वर्षं आजाराशी संघर्ष करणारे पुरुषार्थी व्यक्तिमत्त्व शेवटी आपली जीवनयात्रा पूर्ण करून स्वर्गागमन करते झाले. देवी कुल परंपरेने, प्राप्त संस्काराने युक्त, संघ संस्काराने अधिक विकसित झालेले व अभाविपच्या कार्यानुभवातून बहुमुखी घडलेले व्यक्तित्त्व म्हणजे तुमचे-आमचे सर्वांचे सुपरिचित मदनदासजी... जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा शेवटचा दिवस निश्चित असतो. त्यामुळे मृत्यू ही एक स्वाभाविक, नैसर्गिक प्रक्रिया असली तरी वेळ आणि अज्ञात अस्वस्थेमुळे जेव्हा ती घडते, त्यावेळी आसपासचे स्नेही, परिचित मंडळींना दु:खाला सामोरे जावेच लागते. पार्थिव शरीर रुपाने सहजपणे भेटणारे, संवाद साधणारे जाणीवपूर्वक काही गोष्टींचे विस्मरण होऊ नये, म्हणून स्मरण करुन देणारे मदनजी पुन्हा भेटणार नाहीत, याची खंत सतत राहील.
 
एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे आकलन विविध दृष्टिकोनांतून केले जाते. यशापयश, कर्तृत्व, नेतृत्व व कार्यात त्या व्यक्तीचे योगदान, या मुद्द्यावर व्यक्तित्त्वाचे आकलन होत असते. वरील गोष्टी परिश्रमाने, अध्ययनाने, कौशल्य संपादन करून विकसित होत असतात. परंतु, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीबद्दल विचार करताना त्यांचे जीवन कसे अर्थपूर्ण होते, त्यांनी स्वीकारलेल्या मार्गावर वाटचाल करीत असताना कार्यास दृढता प्राप्त व्हावी, योग्य दिशेने कार्य विकसित व्हावे, यादृष्टीने केलेले प्रयत्न ही त्या व्यक्तीची ओळख बनत जाते. स्व. मदनजी यांच्या जीवनाकडे बघत असताना, अभाविपच्या कार्याला दिशा व कार्यकर्त्यांची जडणघडण यात स्व. मदनजींचे योगदान अधोरेखित करणे गरजेचे आहे. सुमारे ३० वर्षे अभाविपच्या संघटनात नसतानासुद्धा देशभरातील असंख्य कार्यकर्त्यांशी त्यांचा सहज संवाद होत असे. त्यामुळेच आज अनेकांना त्यांच्या नसण्याने रिक्तता जाणवत असेल व ती रिक्तता भरून काढणे शक्यही नाही. परंतु, त्यांचे अविस्मरणीय व्यक्तित्त्व निश्चितपणे अनेकांच्या अंत:करणात स्मृतिरुपाने कायम असणार आहे.

अशी व्यक्तिमत्त्वे केवळ सफल नाही, केवळ अर्थपूर्ण नाही, तर त्यांचे जीवन सार्थक सिद्ध होत असते. अशाप्रकारचे सार्थक जीवन जगलेले मदनजी कायम स्मरणात राहतील. संघजीवनात कार्यपद्धतीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा प्रक्रियेतून घडलेले मदनजींचे व्यक्तित्त्व तुम्ही-आम्ही जवळून बघितले आहे. एखादे सामाजिक कार्य व विशेषतः रा. स्व. संघासारखे कार्य हे केवळ विचारचिंतन यावर विशालरुप धारण करत नाही, तर चिंतनाबरोबरच कार्यशैली, व्यक्तीचे आचरण, ‘मी’ कडून ‘आम्ही’कडे होणारी वाटचाल, सर्वसमावेशकता, अनुशासनाच्या चौकटीचे भान कायम ठेवून स्वतंत्रपणे विचार करणारी कल्याणकारी, सर्वांना पूर्णपणे ज्ञात असलेली कार्यपद्धती ही कार्याला आकार देत असते व निश्चित ध्येयाने क्रमाने वाटचालही करत असते. याच कारणामुळे संघाचे कार्य आजच्या स्थितीत पोहोचले आहे. त्याचे मूळ ‘कार्यकर्ता’ नावाच्या मोठ्या शक्तीत आहे.

‘कार्यकर्ता’ कल्पनेचे वर्णन केल्यानुसार आपण जेव्हा स्व. मदनजींचे जीवन बघतो, तेव्हा कितीतरी कसोट्यांवर सिद्ध झालेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या रुपाने पाहायला मिळते. कार्यकर्त्याचे आचरण शुद्ध असायला हवे. ‘पूज्य माँ की अर्चना का, एक छोटा उपकरण हूँ’ हा भावच व्यक्तीचे जीवन शुद्ध ठेवण्याचे कार्य करीत असतो. जागृत राहून ही शुद्धता त्यांनी जोपासली होती. त्यांच्या कामात वैचारिक स्पष्टता होती. त्यांनी स्वतः संभ्रम ठेवला नाही व सहकारी मंडळींतसुद्धा वैचारिक संभ्रम राहू नये, यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. अशा व्यक्ती केवळ वैचारिकदृष्ट्या ध्येयसमर्पित असत नाही, तर ते संघटनेसाठी, स्विकृत कार्यासाठी समर्पित असतात. संघटनेसाठी समर्पित होणे म्हणजे ‘स्व’चे विस्मरण ही प्राथमिक अट आहे. आपण बघतो की, स्व. मदनजींच्या जीवनात या प्रकारच्या समर्पण भावाचे दर्शन घडते.

कार्याच्या विकासात संघटन कौशल्यास महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय ‘कार्यकर्ता’ या संकल्पनेला पूर्णत्व प्राप्त होत नाही. संघटन कौशल्य हे कृत्रिम असले, तर फार काळ टिकत नाही, असे कौशल्य केवळ बाह्यरुपाने नव्हे, तर आतून विकसित व्हावे लागते. पारदर्शी व्यवहार आवश्यक, परंतु कार्यासाठी जेथे जेवढे आवश्यक व अत्यंत स्पष्टपणे, परंतु योग्य पद्धतीने हाताळणी कार्यासाठी हितावह असते. अनावश्यक औपचारिकता न ठेवता, परंतु स्पष्टपणे समज देणे आवश्यक असते. हे करताना व्यक्ती दुखावणार नाही, हे ही सांभाळावे लागते. असे कौशल्य स्व. मदनजींनी संपादित केले होते. हृदयात निर्मल भाव असल्याशिवाय हे शक्य नसते.

संपर्कात आलेल्या व्यक्तीला ओळखणे व कार्यास जोडणे, याचे अद्भुत सामर्थ्य मदनजींकडे होते व असाच स्वभाव, दृष्टी, क्षमता असलेले कार्यकर्ते त्यांनी घडवले आहेत. याच्या मुळाशी कोणतीही व्यक्ती पूर्ण नसते, हे मान्य करीत असताना समूह पूर्ण झाला पाहिजे, हाच भाव स्थायी स्वरूपात ठेवावा लागतो, हेच वास्तव आहे. यासाठी ‘व्यक्ती’ हे साधन महत्त्वपूर्ण आहे. हीच दृष्टी त्यांनी अनेकांत संक्रमित केली. अशा व्यक्तीचे व्यवहार कधी कठोर वाटतातसुद्धा, परंतु व्यक्ती जेव्हा ध्येयसमर्पित असते, कार्यास प्राधान्य देणारी असते, तेव्हा अशा व्यक्तीचा कठोर व्यवहार हा प्रेरक, मार्गदर्शक सिद्ध होतो. त्याला व्यक्तिद्वेषाची किनार नसते, हे लक्षात घ्यावे लागते. अनेकांनी स्व. मदनजींच्या या कठोरतेचा अनुभवही घेतला असेलच. परंतु, व्यक्ती दुरावणार नाही, हेही ते बघत असत. अशी व्यक्तिमत्त्वे ‘आपला’ नाही, तर कार्याचा वर्तुळ विस्तारत असतात.

कठोरता कधी त्रासदायक असते. परंतु, प्रखरता, कर्मठता संपर्कात आलेल्या व्यक्तीला प्रभावित करीत असते. सार्वजनिक संघटनात प्रखरतेला स्थान आहे, महत्त्व आहे. मनाची विशालता, उदारता हे संघटकाचे आवश्यक पैलू आहेत. परंतु, वेळप्रसंगी समजूत काढण्यासाठी उदारतेशी तडजोड करण्याची सिद्धता आवश्यक असते, पतन क्षरण होण्याची शक्यता असते. तशी वेळ येऊ नये म्हणून सहकारी मंडळींकडे पालकत्वाने लक्ष ठेवावे लागते. मलमपट्टी करणार्‍यांची कमतरता नसते. मात्र, दुर्घटना घडणार नाही, अशी काळजी घेणारे जास्त आवश्यक असतात. स्व. मदनजींनी ही पालकत्वाची भूमिका निश्चितपणे वेळोवेळी बजावली असणारच, याची खात्री आहे.

अशा व्यक्तित्त्वाचे धनी मदनजी आज आपल्यात नाही. त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन....

भैय्याजी जोशी
अ. भा. कार्यकारिणी सदस्य, रा. स्व. संघ




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121