“आम्ही सर्व घडविणारे कार्यकर्ते आहोत. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ यासाठी ‘आधी ये हृदयी....’ आवश्यक असते. यासाठी माझ्यात काय पाहिजे? काय आहे? काय नाही? याचा शोध आपण सतत घेतला पाहिजे,” असे उद्बोधक विचार मदनदासजींनी दि. २६ जुलै, २००८ रोजी रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रांतिक बैठकीवेळी बौद्धिक वर्गात मांडले होते. सदरील बौद्धिक वर्गातील संदर्भ हे २००८ मधील असून त्याचे टिपण देत आहोत.
स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी असे म्हटले की, “आपण भाग्यवान आहोत. कारण, ईश्वराने या कामासाठी आपली निवड केलेली आहे. संघकार्य हे ईश्वरीय कार्य आहे. आपण नाममात्र आहोत. मातृभूमीला विश्वगुरूपदी सिंहासनी बसवणे हे आपले ध्येय आहे,” असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते आणि तेच आमचे ध्येय आहे.
नागपूरच्या विजयादशमीच्या उत्सवात अमेरिकन व जपानी दूतावासाचे प्रमुख उपस्थित होते. अमेरिकेच्या दूतावासाकडून धन्यवादाचे पत्र आले. जपानी दूतावास प्रमुख हे दोन दिवस नागपूरला राहिले. त्यांनी सर्व चित्रीकरण केले. त्यानंतर ते तत्कालीन सरकार्यवाह शेषाद्रीजींना भेटले आणि त्यांनी ‘खरा भारत मला भेटला,’ असे सांगितले. त्यांनी शेषाद्रीजींना दंडवत घालून नमस्कार केला. जपान हे तुलनेने प्रगत राष्ट्र आहे. परंतु, शेषाद्रीजी हे भारतमातेचे प्रतीक आहेत, या भावनेने त्यांनी दंडवत घालून नमस्कार केला.
समाजाचा संघावरील विश्वास
२००५ मध्ये श्रीगुरूजी जन्मशताब्दीमध्ये दाऊदयाल महाराज हे वनवासी समाजातील महाराज कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, “मी अडाणी फकीर! जंगलातील गोष्ट आहे. झाडावर कबूतर जोडी असेल, तर खाली शिकारी असतो. कबूतर वर उडू लागले, तर वर घार असते. हिंदू समाजाची अवस्था कबुतरासारखी आहे. साप येतो, शिकार्याला डंख मारतो, गोळी घारीला लागते. कबूतराचे प्राण वाचतात. हिंदू समाजावर असेच घारी व शिकारी लचके तोडण्यासाठी टपून बसलेले असतात. पण, हिंदू समाज वाचतो. कारण, संघ हा त्याप्रमाणे हिंदू समाजाला वाचवीत असतो.”संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये एक गृहस्थ भेटीस आले. त्यांनी सांगितले, “मी कम्युनिस्ट कार्ड होल्डर आहे. परंतु, मला या विषयात काही करायचे आहे. आपण मार्गदर्शन करा. आपण त्यांना तुम्हाला योग्य वाटेल ते करावे,” असे सूचविले. त्यांनी चेकबुक काढले. रु. सहा लक्षचा चेक डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला दिला. ते म्हणाले, “देशाचे भवितव्य संघाच्या हाती सुरक्षित आहे. या रुग्णालयाला डॉ. हेडगेवार यांचे नाव आहे आणि त्यामुळेच मला हा विश्वास वाटतो. ही रक्कम तशी तुलनेने या कामासाठी खूप लहान आहे, हे मला कळते.
पुणे येथील संघशिक्षा वर्गाच्या प्रथम वर्षाच्या वर्गात रोज एका मान्यवर व्यक्तीस भेटीस बोलावले होते. त्यात २२ व्यक्ती आल्या होत्या. अत्यंत चांगले अभिप्राय त्यांनी दिलेले आहेत. बोलके अभिप्राय आहेत. ‘झी टीव्ही’ यांनी सर्वेक्षण केले होते. त्यात ३० हजार लोक निवडले. पैकी सात हजार स्वयंसेवक, सात हजार संघ विरोधक आणि १६ हजार तटस्थ निवडले होते. त्यांनी एक प्रश्नावली तयार केलेली होती. या सर्वेक्षणातून लक्षात आले की, ७८ टक्के लोक म्हणतात, संघ चांगला आहे. देशभक्तांचे संघटन आहे. शिस्तप्रिय आहे. सेवाकार्य करतो. हिंदू समाजाचे रक्षक आहेत. एक प्रश्न विचारला होता की, संघ मुसलमानविरोधी आहे का? ९४ टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. ‘बीबीसी’च्या ‘क्वीज कंटेस्ट’मध्ये विचारले होते की, सर्वांत मोठे स्वयंसेवी संघटन कोणते? त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे उत्तर आले. हे लोकांचे मत आहे. परंतु, आपली काय अवस्था आहे? संघटन म्हणून आपण या कसोटीला उतरले पाहिजे. आपल्या शाखेची संख्या व व्यवस्था समाजाच्या अपेक्षेनुसार असावी. रंगाहरीजींनी एकदा संचलनाचे वर्णन केले. घोषनिनाद रांगोळ्या, तोरणे, रांगेत काळ्या टोप्या बघून एखादी नदी वाहते त्याप्रमाणे हा प्रवाह वाटतो. फुले उधळली जातात. पण, संघ अधिकारी काय बघतो? तर पाय चुकतात का? गणवेश नीट आहे की नाही? कारण, आपल्याला अनुशासन, व्यवस्थितपणा हा समाजात उतरवायचा आहे आणि त्यासाठी संघात स्वयंसेवकांना हा आपल्याला टोकाचा आग्रह करावा लागतो.
संघाचा पोत कायम
जुन्या स्वयंसेवकांना कधीकधी असे वाटते की, डॉक्टर हेडगेवारांच्या संघात जो पोत होता, तो पोत आता राहिलेला नाही. पण, हा पोत आजही तसाच आहे. ग्रामीण भागातील एका मंडल स्थानाचे गाव. तेथील एक संघ कार्यकर्ता. तीन- साडेतीन हजार रुपये गुरुदक्षिणा जमली. ही रक्कम लगेचच तालुका स्थानी देण्यासाठी घरातील अडचणींमुळे याला द्यायला जमले नाही. घरीच राहिली. एक दिवस शेतात काम करत होता. जिल्हा प्रचारक प्रवासात आले. घरी गेले. घरी खाटेवर कार्यकर्त्यांची पत्नी झोपलेली होती. ती आजारी होती. शहरात नेणे आवश्यक होते. प्रचारकांनी विचारले, “उपचारासाठी का बरं नेले नाही?” त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. जिल्हा प्रचारकाच्या लक्षात आले की, पैशाअभावी याने उपचारासाठी नेले नाही. जिल्हा प्रचारकांनी विचारले की, “गुरुदक्षिणेचे हे पैसे होते, ते तात्पुरते वापरायचे.” त्यावर त्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे कान पकडले आणि तो म्हणाला, “ही गुरूदक्षिणा आहे. स्वयंसेवकांनी पवित्र भावनेने दिलेले आहेत. त्याला मी शिवणार नाही.” पुढे उपचार लांबल्याने त्याची पत्नी मरण पावली. याचा अर्थ डॉक्टरांच्या काळातील पोत आहे तसाच आहे.
वाशिम येथे अकरावीत शिकणारा एक विद्यार्थी विस्तारक एका गावी सात दिवस गेला. तो सात दिवसानंतर घरी जाण्यास निघाला, तेव्हा सर्व गाव त्याला स्टॅण्डवर पोहोचवायला आले. सात दिवसांत असे काय झाले? तो ज्या घरी मुक्कामी उतरलेला होता, तिथे स्नानगृहात अंघोळ करताना त्याला साबणात सोन्याचे नाणे मिळाले. साबण कंपनीच्या एका योजनेनुसार ते एक गिफ्ट होते. ते सोन्याचे नाणे त्याने घरातील गृहिणीला दिले. याला खरे तर सोन्याची किंमत कळत होती. तरी त्याने ते परत केले आणि याचे त्या घरातही आश्चर्य वाटले आणि गावभर या विषयाची चर्चा झाली. असा प्रामाणिकपणा लोकांमध्ये यावा, अशा अर्थाने शाखेत संस्कार केले जातात, हे लोकांना लक्षात आले. त्यामुळे गावातल्या लोकांना न सांगताच ते आपली मुले शाखेवर पाठवू लागले. ज्या शाखेवर पाच-दहा मुले येण्याची पंचाईत होती, तिथे ५०-६० मुले शाखेवर येऊ लागली. म्हणूनच सगळ्या गावाला असे वाटले की, आपण अशा कार्यकर्त्याला सोडण्यासाठी स्टॅण्डवर निरोप देण्यासाठी गेले पाहिजे.
केरळमधील कन्नूर येथे संघविरोधी शक्तींनी संघ कार्यकर्त्यांवर अमानुष हल्ले केले. संघर्षातील संघ कार्यकर्त्यांच्या हत्याकांडानंतर ३९ शाखा वाढल्या. तेथे १५० शाखा झाल्या. या संघर्षात विरोध केल्याने तेथील ५७ स्वयंसेवक कारागृहात आहेत. तेदेखील जन्मठेप भोगत आहेत. सरसंघचालक सुदर्शनजी केरळच्या प्रवासात या स्वयंसेवकांना कारागृहात भेटण्यास गेले. तेथे चक्क बैठकदेखील झाली. ५७ जणांच्या पैकी ५६ जण तेथे होते. एकजण कुठे आहे? असे विचारल्यावर तो फाशीच्या कक्षात आहे असे कळले. सुदर्शनजी त्याला भेटायला गेले. तो २८ वर्षांचा तरुण होता. शाखेवर हल्ला करणार्या दोन जणांना त्याने संघर्षामध्ये यमसदनास पाठवले होते. २८ वर्षांच्या तरुणाची काय मनस्थिती असेल? पत्नी, मुले अशी याची त्याला चिंता असणार. परंतु, सरसंघचालक भेटल्यानंतर गजाआड उभ्या असलेल्या त्याच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागल्या. आज प्रत्यक्ष सरसंघचालकांनी माझ्या मस्तकावरून हात फिरवला. आज मी धन्य झालो. या प्रसंगातून दिसते की, पाचव्या पिढीतील संघाचा पोत तोच कायम आहे. पुढे तो स्वयंसेवक अपीलात गेला. फाशी रद्द झाली. केरळ प्रांताचे कार्यवाह म्हणूनच म्हणतात की, कन्नूर ही सिंहाची गुहा आहे. परंतु, संघ कार्यकर्ते आत जाऊन जबडा फाडण्या इतक्या तयारीचे आहेत. कारण, तेथे संघविरोधक असलेल्या डाव्या शक्तींशी थेट दोन हात करावे लागतात.
संघाचा घटक बनणे
या परिस्थितीत आमची संघटन अवस्था कशी असली पाहिजे? ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर म्हणायचे की, “घरातल्या अनेक वस्तू शोभेच्या असतात. संघात असे नाही. कार्यकर्ता हा शोभेची वस्तू नाही. तो कामाचा माणूस आहे. प्रतिज्ञित स्वयंसेवक आपण म्हणतो. प्रतिज्ञा म्हणजे स्वयंसेवकाच्या कार्यकर्तृत्वाचा सारांश. मी संघाचा घटक आहे. स्वयंसेवक नाही. स्वयंसेवक बनण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. घटक याचा दुसरा अर्थ ‘घडविणारा’ आहे. आम्ही सर्व घडविणारे कार्यकर्ते आहोत. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ यासाठी ‘आधी ये हृदयी....’ आवश्यक असते. यासाठी माझ्यात काय पाहिजे? काय आहे? काय नाही? याचा शोध आपण सतत घेतला पाहिजे.
ज्येष्ठ प्रचारक तात्या सोहनी हे बैठक घ्यायचे. कार्यवाह-मुख्य शिक्षक शाखेबद्दल सांगताना संख्या सांगतो. तरुण, बाल, शिशु इत्यादी तात्या त्यांना विचारायचे. ही संख्या सांगतो आपण बरोबर आहे. हे वृत्त झालं. पण आपल्यासाठी संघ घडतो आहे ना? संघ घडतो आहे ना, याची जाणीव कार्यकर्त्यांना सतत करून दिली पाहिजे. प्रतिज्ञा करतो ती प्रामाणिकपणे करतो. हे व्रत आजन्म पाळेल असे म्हणतो. व्रत ही पवित्र भावना आहे. संघकार्याकडे व्रत म्हणून आपण पाहतो का? आजन्म हे व्रत पाळण्याचे आपण म्हटलेले आहे. शेषाद्रीजी म्हणत प्रतिज्ञा एकदाच घेतली जाते. परंतु, त्याचे स्मरण नित्य करावे लागते, असे संघकार्याचे नित्य स्मरण आवश्यक असते.
संकलन व शब्दांकन :
दिलीप क्षीरसागर (नाशिक), पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख
रा. स्व. संघ
९४२२२४५५८२