‘युनेस्को’ने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट’मध्ये शाळांमधून मोबाईल हद्दपार करा, अशी सूचना केली आहे. शिक्षणाची गुणवत्ता उंचवायची असेल, तर अहवालातील सूचना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. चीनमध्येही आता त्यादृष्टीने नवीन नियम लागू होणार आहेत. तेव्हा ‘युनेस्को’च्या इशार्याचा गर्भितार्थ समजून घ्यायला हवा.
लोकसंख्या वाढते आहे. त्यासोबत शाळा, महाविद्यालयांची संख्याही वाढते आहे. माहिती- तंत्रज्ञानाची क्रांती होत आहे. कधीकाळी महाकाय असलेल्या संगणकाचे काम आता मोबाईलसारख्या हातात सहजतेने बसू शकणारे यंत्र करताना दिसते. ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ अशी जाहिरात मोबाईलची करण्यात आली होती. कारण, एका छोट्याशा यंत्रात सर्व जगाचे दर्शन घडते. आंतरजालामुळे जगाने प्रचंड वेग धारण केला. जगाच्या पाठीवर अत्यंत क्रांतिकारी तंत्रज्ञान उदयाला आले. आपण अंदाज करू शकणार नाही, त्यापेक्षा अधिक वेगाने माहिती-तंत्रज्ञानात क्रांती घडते आहे. जगाच्या पाठीवर कोठेही घटना घडली, तर क्षणात आपल्या हाती असलेल्या मोबाईलवर ते पाहता, ऐकता येते. कोणताही विषय आंतरजालाच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला, तर लाखो पानांचा मजकूर हाती येत आहे.
एका अर्थाने अवघे जग आपल्या हाती असलेल्या एका छोट्याशा यंत्रात बंधिस्त झालेले अनुभवास येते. आपण हव्या त्या विषयावरील माहिती, ध्वनी, ध्वनीचित्रफिती पाहू शकतो. त्यामुळे शिकणे अधिक सुलभ होणार, असे मानले जात होते. जगातील सर्व ज्ञान आपल्या हातातील छोट्याशा यंत्रात सामावले असल्याने शिक्षणात त्याची गरज अधोरेखित होऊ लागली होती. डिजिटल क्रांती वेगाने होत असल्याने शिक्षण अधिक आनंददायी होईल. त्याचा परिणाम साधला गेल्याने शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल. विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीत अधिक गतिमान होतील. शिक्षकांच्या अध्ययन, अध्यापन कौशल्यात वृद्धी होईल. सृजनशीलता वाढेल, अशी अपेक्षा केली जात होती. ही अपेक्षा काही चुकीची नव्हती; पण आज काही काळानंतर आपण मागे वळून पाहिले, तर तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम शिक्षणात होताना दिसू लागला आहे. शिक्षणाची गुणवत्ता दिवसेंदिवस हरवत चालली आहे. तंत्रज्ञानामुळे माणसांचे जीवन यंत्रवत झाले. शिक्षणातून संवेदना असलेला माणूस घडवायचा असतो; यंत्र नाही. हे लक्षात घेऊन शिक्षणाचा प्रवास घडणे अपेक्षित आहे.
वर्तमानात नव्या तंत्रज्ञानाने माणसाला गुलाम केले आहे, हेही खरे आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग केला जाऊ लागला असला, तरी शिक्षण प्रक्रियेला अधिक लाभ होण्याऐवजी त्याचा तोटा अधिक होत असल्याचे विविध संशोधन आणि सर्वेक्षणात समोर आले आहे. डिजिटल क्रांतीचा जयघोष केला जात असताना ‘युनेस्को’ने नुकत्यात जाहीर केलेल्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट’मध्ये शाळांमधून मोबाईल हद्दपार करा, अशी सूचना केली आहे. शिक्षणाची गुणवत्ता उंचवायची असेल, तर अहवालातील सूचना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ही सूचना म्हणजे उद्यासाठी धोक्याचा इशारा आहे.
कोरोनाच्या काळात शिक्षणातील प्रत्यक्ष आंतरक्रिया बंद असल्याने पर्याय म्हणून शिक्षण ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला होता. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून मोबाईलचा उपयोग करणे अपरिहार्य होते. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल दिला. शिक्षण घरात बसून सुरू झाले.ऑनलाईन शिक्षणात शिक्षण म्हणून असलेल्या प्रक्रियेचा समावेश नव्हता. केवळ श्रवण कौशल्याच्या जोरावर शिक्षण घडत होते. पण, केवळ त्या एका कौशल्यावर शिक्षण घडण्याची शक्यता नाही. आपण जेव्हा पंचज्ञान इंद्रियाच्याद्वारे शिक्षण घेतो, तेव्हा ते खरे शिक्षण असते. जीवनाला सामर्थ्य प्रदान करणारे शिक्षण त्यातून घडत असते. आज खर्या शिक्षणाचा मार्ग चालण्यापेक्षा ‘डिजिटल’ शिक्षणाच्या नावाखाली सुरू असणारा प्रवास अधिक धोकादायक बनत आहे. मोबाईलमुळे शिक्षणात अडथळे येऊ लागले आहे. शिक्षणासाठी हवी असलेली एकाग्रता मोबाईलमुळे कमी होत चालली आहे. ज्या वयात अभ्यास, वाचन, कृती, प्रात्यक्षिक, संवाद, निरीक्षण, मैदानी खेळांसाठी वेळ द्यायला हवा, त्याकाळात विद्यार्थी उशिरापर्यंत मोबाईलवर विविध समाजमाध्यमे हाताळत आहेत. त्यातून मुलांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासावर विपरित परिणाम होत आहे. जेव्हा विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती उत्तम नाही, शिकण्यासाठी मानसिक तयारी नाही, अशावेळी विद्यार्थी शिकण्यात गुंतून पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याचे प्रमाणात वाढ होत असल्याचे संशोधन सांगता आहेत.
विद्यार्थ्यांच्या हाती आलेल्या मोबाईलमुळे विद्यार्थी सहजतेने विविध समाजमाध्यमांचा उपयोग करतात. आजची पिढी अधिक गतिमान आणि बुद्धिमान आहे, असे अभिमानाने सांगितले जाते. नव्या तंत्रज्ञानाशी ते अधिक लवकर जुळवून घेत आहेत. त्या अभिमानात विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया घडते आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. त्याउलट विद्यार्थी सहजतेने व्हॉट्सअप, टेलिग्राम, युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक सारखी अनेक समाजमाध्यमांवर विद्यार्थी सहजतेने प्रवेश करतात आणि स्वतःला त्यात गुंतून घेता आहेत. यात किती आणि कसा वेळ जातो आहे, हे लक्षात येत नाही. तासन्तास विद्यार्थी मोबाईलवर विविध खेळ खेळत आहेत. दिवसातील अधिक वेळ खर्च होतो आहे. इतका वेळ ‘स्क्रीन टाईम’ला दिला जात असेल, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम घडणे आलेच. अधिककाळ विद्यार्थी जेव्हा मोबाईलवर गुंतून पडलेले असतात, तेव्हा त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर होतो. त्यातून आकलनावर विपरित परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी हा धोक्याचा इशारा आहे.
पालक म्हणून विद्यार्थ्यांच्या हाती कितीवेळ मोबाईल देण्याची गरज आहे, हे लक्षात घेणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. मोबाईलचा अधिक वापर शिक्षणासाठी होतो आहे की, केवळ मनोरंजन करण्यासाठी होतो आहे, याचा विचार करायला हवा. ‘स्क्रीन टाईम’ उंचावल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांत आल्यावर वर्गातील शिक्षणाकडे लक्ष लागण्याची शक्यता नाही. विद्यार्थ्यांसाठी मोबाईल अडथळा आहे, त्याप्रमाणे शिक्षकांसाठीदेखील मोबाईल शिक्षणात अडथळा ठरत आहे. शिक्षकाची एकाग्रता नसेल, तर वर्गातील अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होण्याची शक्यता नाही. सातत्याने मोबाईलवर असल्याने शिक्षक आनंदी असण्याची शक्यता कमी होते. जेथे स्वतःच आनंदी नाही, म्हटल्यावर अध्यापनात आनंद कसा निर्माण करणार, हा खरा प्रश्न आहे.
मोबाईलमुळे शिक्षणाला मदत ठरणारी पूरक व्यवस्था हरवत चालली आहे. ग्रंथालय व्यवहार आटत चालला आहे. महाविद्यालयात पुस्तक हाती घेणारे विद्यार्थी शोधावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुस्तके कशाला वाचायला हवीत? त्याउलट, मोबाईलमध्ये लाखो पुस्तके उपलब्ध आहेत, असे म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थी पुस्तके हाती घेऊन वाचत नाहीत. मोबाईलचा सदुपयोग म्हणून विद्यार्थी मोबाईलवर वाचन करता आहेत, असे सांगितले जाते. पण, त्या वाचनाचा खरंच परिणाम साधला जातो का? याचे उत्तर नाही, असेच येते. शास्त्रीय संशोधनातूनही आलेले निष्कर्ष अधिक धक्कादायक आहे. ‘हायपरलिंक’ केलेला कोणताही मजकूर वाचला जातो, तेव्हा वाचनाचा वेग कमी होत असते. जो मजकूर वाचला आहे, त्याचे आकलन होण्यास अडचणी निर्माण होतात. वाचलेले मजकुराचे आकलन नाही, त्याची उकल होत नाही. मग अशा वाचनाला कोणताही अर्थ उरत नाही. वाचनाचा अर्थ असतो, आपण जो मजकूर वाचला आहे, त्या मजकुराचे योग्य अर्थासह आकलन होणे. ऑनलाईन वाचन केल्यावर ती प्रक्रिया घडत नाही. त्यामुळे त्याला वाचन तरी कसे म्हणावे? या स्वरुपातील वाचन केवळ कामचलाऊ स्वरूपाचे ठरते.
आपण जेव्हा आंतरजालाच्या मदतीने वाचन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे विचलन घडून येते आणि मेंदूवर त्याचा विपरित परिणाम होतो. आपण जेव्हा ‘वेब पेज’वरील मजकूर वाचत असतो, तेव्हा त्या पानावरील सरासरी केवळ १८ टक्के मजकूर वाचला जातो. एखादे ‘वेब पेज’ सरासरी केवळ दहा सेकंद पाहिले जाते, असे विविध सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘निकोलस’ सारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या स्तंभलेखकाचे मते, ‘आपण जेव्हा ऑनलाईन मजकूर वाचत असतो, तेव्हा एकाग्रता भंग पावते. आपण जितका वेळ अधिक देऊ तितक्या मोठ्या प्रमाणावर एकाग्रता कमी होत जाते.एकाग्रता कमी झाली की, शिक्षणासाठीचा असलेला मजकूर जाणून घेण्यात निश्चित अडचणी येतात.
'एका वर्तमानपत्र वाचन सर्वेक्षणात ऑनलाईन वर्तमानपत्र वाचनाचे दरमहा प्रमाण सरासरी ४५ मिनिटे आहे.प्रत्यक्ष वर्तमानपत्र वाचनार्या वाचकांचा वाचनासाठी सुमारे ८०० तास खर्च होतात. ऑनलाईन स्वरुपात केल्या जाणार्या वाचनात गंभीर स्वरुपाचे वाचनाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ऑनलाईनमध्ये फारसे सखोल वाचनाचे प्रयत्न होत नाही. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास केला जाण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी त्याचा फार लाभ होत नाही. वेळ दिला तरी एकाग्रतेने ते घडत नाही. जिथे एकाग्रता नाही, तेथे शिक्षण कसे घडणार? आज शिक्षणात मोबाईलमुळे अडथळे निर्माण होता आहेत. विद्यार्थी सतत आभासी स्वरुपात जीवन जगण्याकडे आकर्षित होत आहेत. मानसिक स्थैर्य प्राप्त नाही, असे असेल तर शिक्षणासाठी मानसिक स्थिती साधली जात नाही. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो.
आभासी विश्वात रममाण होणारी अनेक मुले प्रत्यक्ष जीवनात थोडेसेही अपयश आले की, पराभूत मानसिकतेत जातात. मोबाईलमध्ये अधिक वेळ घालविल्याने, त्यांना आभासी विश्व खरे वाटू लागते. आपला भोवताल जाणून घेण्यात अपयशी ठरत असल्याने मानसिकदृष्ट्या खचणे घडते. थोड्याशा अपयशाने ते घराच्या बाहेर पडत नाही. भावनिक समायोजन शक्ती हरवून बसतात. संताप उंचावत जातो. रागावरील नियंत्रण गमावण्याचा धोका अधिक असतो. कामातील उत्साह कमी होतो. निराशा अधिक लवकर घेरण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे मनात भीती घर करते. त्यातून विद्यार्थी कधीकधी स्वतःला संपविणे पसंत करतात. जीवन म्हणजे यश अपयशाचे मिश्रण असते. मात्र, त्याबद्दल विचार केला जात नाही.वास्तवापासून दूर गेल्याने जीवन समजावून घेण्यात विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे मोबाईलमुळे शिक्षणात अडथळा निर्माण होत असल्याचा अहवालात नमूद केलेले असले, तरी जीवनाच्या पाऊलवाटेतही त्याचे मोठे अडथळे निर्माण होता आहेत, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.
मुळात शिक्षणात ते पूरक साधन आहे.त्याचा तितकाच उपयोग केला जाईल, याची काळजी घ्यायला हवी. जेवणात लोणचे, पापडाचे जितके महत्त्व आहे, तितकेत शिक्षणात मोबईलचे महत्त्व असायला हवे. शिक्षणात मोबाईल समग्र शिक्षणाचे साधन ठरू शकत नाही. आज अहवालातील सूचनांचा गंभीर विचार केला नाही, तर उद्याची पिढी रोगट आणि सृजनाचा अभाव असलेली अनुभवास येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्यासाठी मोबाईलपासून दूर घेऊन जाण्यासाठी घरातील प्रत्यक्ष संवाद उंचावणे आणि शाळेत पुस्तकांशी मैत्री होईल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तीच वाट बुद्धी विकासाची आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवण्याची आहे, अन्यथा मिनमिन त्या मोबाईलच्या प्रकाशात जीवनाची प्रकाशमय वाट शोधण्याच्या प्रयत्नात अंधाराच्याच वाटा चालाव्या लागण्याचा धोका अधिक आहे.
संदीप वाकचौरे
sandeepwakchaure२००७@rediffmail.com