मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांनी वयाच्या ८१व्या वर्षी गुरुवार, दि. २४ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनय कौशल्याची अमीट छाप उमटविणार्या सीमा देव यांना विनम्र श्रद्धांजली...
या सुखांनो या! आनंद लहरी येती नि जाती जोडून देती नाती नि गोती मृगजळ परी चंदेरी हे- प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली...
’जे मिळणं अशक्य आहे, त्याचा कधी हट्ट धरू नये. ते मिळत तर नाहीच; पण फार मोठी निराशा पदरी पडते. मनस्वी दुःख होतं. फार वर पाहू नकोस, पायाला ठेच लागेल. पडशीलही कदाचित! पुढे जायची ताकद उरणार नाही; पण फार खालीही पाहू नकोस, ठेच लागणार नाही, पडणारही नाहीस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे पसरलेलं भव्य, अथांग जग दिसणार नाही. नेमकं कुठं जायचं, ते कळणार नाही. तेव्हा समांतर पाहा. कधी वर पाहा, कधी खाली पाहा; पण जास्त वेळ समांतर पाहा.’ असं रमेश देवांनी त्यांच्या ’या सुखांनो या’ या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलं आहे. आपली पत्नी सीमा देव यांचे ते सर्वार्थाने ‘आयडॉल’ होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांना साथ दिली, काळजी घेतली. त्यांच्या आईची शिकवण म्हणून ही प्रस्तावना त्यांनी जरी लिहिली असली, तरी त्यातून काळजी आणि मार्गदर्शन जणू पत्नी सीमा देव यांनाच करीत असल्याचे भाव दिसून येतात.
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या दुःखद निधनाची बातमी गुरुवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी धडकली आणि मन फार उदास झाले. गेली चार-पाच वर्षे त्या ‘डिमेन्शिया अल्झायमर’ या विचित्र आजाराने ग्रस्त होत्या. कितीही वय झाले, तरी आपलं माणूस आपल्या सोबत असल्याने कुटुंबाला मिळणारा आधार विशेष सुखसमाधान देणारा असतो. असं भरभरून सुख वाट्याला येण्यासाठी फार मोठं पुण्यकर्म पदरात असावं लागतं आणि ते पुण्यकर्म अजिंक्य आणि अभिनय देव यांच्या वाट्याला मनसोक्त आलं, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सीमाताईंच्या शेवटच्या काळातील त्यांचा प्रवास वेदनामय ठरला, याचं दुःख देव कुटुंबीयांसह त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्या आपल्यासारख्या सर्वांनाच चटका लावणारं आहे.
दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांच्या ’आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटासाठी सीमा देव दि. १६ फेब्रुवारी १९५७ साली प्रथम कॅमेर्यासमोर आल्या. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणार्या सीमाताईंच्या कारकिर्दीला ५३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सोहळ्याच्या प्रसिद्धीचे काम करण्याची संधी मला जितेंद्र कुलकर्णी यांच्यामुळे मिळाली. अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी अभिनय करणार्या सीमा देव यांच्या सुवर्ण कारकिर्दीला सलाम करण्याच्या उद्देशाने ’जेता’ या चित्रपटाच्या सेटवर एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रमेश देव प्रॉडक्शन’अंतर्गत निर्माण झालेल्या या चित्रपटाच्या सेटवर सीमा देव यांनी केक कापून हा दिवस साजरा केला. यावेळी अभिनेते व त्यांचे पती रमेश देव, ’जेता’चे दिग्दर्शक अजिंक्य देव, अमोल शेटगे, आरती देव, स्मिता अभिनय देव, या देव परिवारासह कॅमेरामन धनंजय कुलकर्णी, कला दिग्दर्शक सुनील निगवेकर, कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी, नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे इत्यादी कलावंत तंत्रज्ञांसह ठरावीक पत्रकार उपस्थित होते. १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांनी या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले होते.
प्रदीर्घ काळ मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारुन आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणार्या अभिनेत्री सीमा देव यांनाही एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. एका चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला एका प्रथितयश दिग्दर्शकाने कोणा एका कलाकाराच्या सांगण्यावरून कात्री लावली आणि हीच गोष्ट सीमाताईंच्या जिव्हारी लागली. आपण जीव तोडून केलेल्या कामाला दुसर्या एखाद्या कलाकाराच्या सांगण्यावरून माझ्या सीन्सला कात्री लावून फक्त तीन सीन्समध्ये भूमिका गुंडाळली जात असेल, तर हीच ती वेळ थांबण्याची असं ठरवून त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी १४ वर्षांत कोणत्याही, चित्रपटात, मालिकेत कोणतीही भूमिका केली नव्हती.
१४ वर्षांनंतर त्यांनी ‘जेता’ या चित्रपटात भूमिका करण्याबाबत विशेष कारण होते. ते म्हणजे त्यांनी करिअरमध्ये ‘मोलकरीण’ आणि ‘अपराध’ हे दोन चित्रपट सोडले, तर प्रेक्षकांना कायमच रडवलंय. खरंतर त्यांना तमाशाप्रधान चित्रपटात काम करायला खूप आवडत होतं. त्या मूळच्या नृत्यांगना. पण, त्यांना तशा भूमिका मिळाल्याचं नाहीत. ‘तुझा चेहरा सोज्ज्वळ आहे’ असेच त्यांना सगळे सांगायचे. ‘जेता’ चित्रपटातील त्यांची भूमिका सोशिक स्त्रीची किंवा रडूबाई पद्धतीची नव्हती. एका करारी स्त्रीची व्यक्तिरेखा म्हणजे त्या प्रत्यक्षात जशा होत्या तशीच भूमिका अजिंक्य आणि अमोल शेटगे यांनी त्यांना दिली होती. पूर्वानुभवावरून त्यांनी एका विशेष अटीवर हा चित्रपट केला होता आणि ती अट म्हणजे, त्यांच्या दोन मुलांपैकी कोणाही एकाने या चित्रपटाचा दिग्दर्शक व्हावे. अभिनय तेव्हा हिंदीत फार व्यस्त असल्याने आणि अजिंक्य सर्वाथाने अभिनयासोबत दिग्दर्शन करण्यास सक्षम असल्याने, अभिनय देव यांनी अजिंक्य यांच्यावरच अमोल सोबत दिग्दर्शन करण्याची जबाबदारी सोपविली.
सीमाताई या अप्रतिम अभिनेत्री तर होत्याच; पण त्या सर्वाथाने सक्षम आणि कुटुंबवत्सल पत्नी, आई, आजी अशा भूमिका प्रत्यक्षात जीवनात निभावत होत्या. आपल्या सुना-मुलांसोबत, नातवंडांचे लाड कौतुक करण्यात त्या रमल्या होत्या. आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये, म्हणून विशेष काळजी घेत होत्या. मुलगा अजिंक्य जेव्हा अभिनय क्षेत्रात आला तेव्हा, त्यांना भीती वाटली होती. हे क्षेत्र बेभरवशाचे असल्याने त्याचा इथे निभाव कसा लागेल? पण, त्याचे यश पाहून तीही चिंता मिटली. आज रमेश आणि सीमा देव यांच्या दोन्ही मुलांनी मनोरंजन क्षेत्रात आपलं साम्राज्य उभं केलं आहे. इतर मराठी कलावंतही आज त्यांच्याकडून आदर्श घेत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. आईवडिलांनी कष्टाने कमावलेलं नाव त्यांच्या मुलांनी, नातवंडांनी पुढे टिकवून ठेवावं, वाढवावं, असं प्रत्येक पिढीला वाटतं असतं. ही इच्छा अजिंक्य देव यांचा सुपुत्र आर्य याने बहुदा मनावर घेतली आहे. त्याने ’आरडीपी’मध्ये पाऊल टाकून देवांची तिसरी पिढीही या व्यवसायात सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहेत. आजीआजोबांनी दिलेल्या संस्कारांचा वारसा जपण्यासाठी आर्य सोबत अभिनय देवांचा ’युग’ही सामील होऊन ‘आरडीपी’ नावाचं हे ‘एम्पायर’ अधिक डौलदार करण्यासाठी कष्ट करतील, यात शंकाच नाही.
सीमा देव आणि रमेश देव यांचे शेवटपर्यंत एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी हे बोलून दाखविले आहे. त्यांच्या मुलांनी २०१३ मध्ये त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीत साजरा केला होता. त्यांचे पुन्हा लग्न लावताना आंतरपाट दोन्ही मुलांनी धरत त्यांना सात फेरेही घेण्यास भाग पाडले होते. खर्या अर्थाने मुले, सुना नातवंडांच्या साथीने या देखण्या रुबाबदार दाम्पत्याने त्यांचे आयुष्य भरभरून आनंदात साजरे केले आहे. सीमाताई पतीदेवांची मोलाची साथ लाभल्यामुळेच मी इथवर पोहोचू शकले. असं कायम सांगायच्या. रमेश देवांमध्ये प्रचंड ऊर्जा होती आणि शेवटपर्यंत त्यांना सीमाताईंसोबतच जगायचे होते, त्यांची ही इच्छाही देवाने पूर्ण केली. चित्रपटसृष्टीतील हे दाम्पत्य शतकानुशतके आदर्श म्हणून ओळखले जातील, यात तिळमात्र शंका नाही. हीच सीमा आणि रमेश देव यांना खरी श्रद्धांजली असेल!
राम कोंडीलकर