मुंबई : भारतात सर्व धर्म पंथाचे लोक राहतात, या सर्वाना एकत्र बांधून ठेवण्यासाठी आपण साजरा करत असलेला सण म्हणजे स्वातंत्र्यदिन. या दिवशी पहाटेस तिरंग्याला वंदन करण्यासाठी आपण ध्वजारोहण करतो. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून सांगलीत एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी एक इच्छा व्यक्त केली. भारत हे हिंदुराष्ट्र असल्याने यापुढे आपला ध्वज भगवा करावा अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यदिनी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरूवात झाली. या पदयात्रेत संभाजी भिडे यांच्यासह हजारो धारकरी सहभागी झाले होते. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी संभाजी भिडे यांच्या भोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
भारत हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे भारताचा राष्ट्रध्वज भगवा करावा, या प्रमुख मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली. भगवा न राष्ट्रध्वज हे उरी शल्य दु:ख, करणार राष्ट्रध्वज ही शिव आनभाक, दिल्लीवरी फडकवू भगव्या ध्वजाला, ओलांडू म्लेंच्छ वधन्या आम्ही अटकेला... अशा गर्जना यावेळी जमल्या.