नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या ९ वर्षात आपल्या सरकारने केलेली विकासकामे आणि सरकारी योजनांची माहिती जनतेला दिली. जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये देशाचा समावेश करण्याचे आश्वासन देताना ते म्हणाले की, २०४७ साली जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्ष साजरी करेल तेव्हा जगासमोर विकसित भारताचा तिरंगा ध्वज फडकत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "२०१४ साली जनतेने सरकारला स्पष्ट बहुमत दिले. त्यानंतर २०१९ मध्येही तुम्ही सरकारवर विश्वास ठेवला. त्यामुळे आम्हाला सुधारणा करण्याची हिंमत आली. सरकारने सुधारणा केल्या तेव्हा परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी नोकरशाहीने पार पाडली. यातूनही परिवर्तन दिसून येते. देशातील प्रत्येक घटकासाठी काम केले जात आहे. पुढच्या वेळी १५ ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाची कामगिरी याहून अधिक आत्मविश्वासाने तुमच्यासमोर मांडेन, तुमची ताकद, जिद्द आणि यशाचा गौरव करेन."
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "शेतकरी बांधवांना स्वस्त दरात युरिया मिळावा यासाठी केंद्र सरकार युरियावर १० लाख कोटी रुपयांची अनुदान देत आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात २.५ लाख कोटी रुपये जमा केले. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही जल जीवन मिशनवर २ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी २० लाख कोटी रुपये दिले आहेत, त्यामुळे हा बदल दिसून येत आहे."
देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जेव्हा आम्ही २०२४ मध्ये सत्तेत आलो तेव्हा जागतिक आर्थिक व्यवस्थेत देश १० व्या स्थानावर होता. आज १४० कोटी भारतीयांच्या प्रयत्नाने आपण जागतिक आर्थिक व्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येता ५ वर्षात भारत जगातील ३ प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. आज देशातील प्रत्येक वर्गासाठी काम केले जात आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, "देशभरात उघडलेल्या जनऔषधी केंद्रांमधून लोकांना अत्यंत स्वस्त दरात औषधे मिळत आहेत. या जनऔषधी केंद्रांची संख्या १० हजारांवरून २५ हजारांवर नेण्यात येणार आहे. आम्ही आयुष्मान भारत योजनेंतर्गत ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, जेणेकरून गरिबांना औषधे मिळतील. त्यासोबतच पशुधन वाचवण्यासाठी आम्ही लसीकरणावर सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. २०४७ साली जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल तेव्हा विकसित भारताचा तिरंगा ध्वज फडकत असेल."
देशातील वेगाने होत असलेल्या विकासाबाबत पंतप्रधान म्हणाले की, "आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ७५ हजार अमृत सरोवर बांधण्याचा संकल्प केला आहे. हे स्वतःच एक मोठे कार्य आहे. १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याची सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण झाली आहेत. भारत ५जी रोलआउटमध्ये आघाडीवर आहे. आता ६जी साठीही तयारी सुरू आहे. देशात नवीन संसद स्थापन व्हावी, अशी २५ वर्षांपासून चर्चा सुरू होती. आम्ही काळाच्या अगोदर नवी संसद बनवली. हा नवा भारत आहे. भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. हा भारत थांबत नाही, हा भारत खचत नाही, दमत नाही आणि हा भारत हारही मानत नाही."