नाशिकचा कायापालट करणारे विकास प्रकल्प

    14-Aug-2023
Total Views | 111
Development Project in Nashik


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या देशातील १०० शहरांमध्ये २०१६ मध्ये नाशिकचाही समावेश झाला. त्याअंतर्गत पूर्ण झालेली आणि पूर्णत्वाकडे वाटचाल करणार्‍या विकास प्रकल्पांवर तसेच नियोजित ‘नमामी गोदा’ प्रकल्पावर प्रकाश टाकणारा हा लेख...

तप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ मध्ये केंद्रात स्थापन होताच, देशातील १०० शहरांना ’स्मार्ट सिटी’अंतर्गत कायापालट करण्याची योजना आखली गेली. २०१६ मध्ये नाशिकचाही समावेश ’स्मार्ट सिटी’ मध्ये समावेश झाला. त्यानंतर शहरात विकासकामे सुरू झाली. त्यामध्ये अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका चौक हा ‘स्मार्ट सिटी’ रोड पूर्णत्वास आला. शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख असलेले महाकवी कालिदास कला मंदिराचे नूतनीकरण, महात्मा फुले कला दालन, शालिमार जवळील नेहरू उद्यान पूर्णत्वास आले असून गावठाण प्रकल्प, होळकर पुलाखाली ‘मॅकेनिकल’ स्वयंचलित गेट, दोन विद्युतदाहिनी ही कामे पूर्ण झाली आहेत. ‘प्रोजेक्ट गोदा’ (गोदावरी सौंदर्यीकरण)ची कामेही ८० टक्के पूर्ण झाली आहेत.


‘प्रोजेक्ट गोदा’

’स्मार्ट सिटी’च्या गोदा सौंदर्यीकरण (प्रोजेक्ट गोदा) प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, दि. ३० जून २०२४ पर्यंत विकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान कंपनीला पेलावे लागणार आहे.‘प्रोजेक्ट गोदा’ प्रकल्पातून गोदावरीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या गोदावरी उद्यान, बेसाल्ट(अग्नीजन्य पाषाणाताील)दीपस्तंभ, फरशा, हायमास्ट बसवणे, या कामाबरोबरच होळकर पूल ते गाडगे महाराज पुलापर्यंतचे काँक्रिटीकरण काढणे, ही कामे जवळपास पूर्ण झाली आहे.गोदा सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी ७३.७२ कोटी रुपये निधी ‘स्मार्ट सिटी कंपनी’कडून मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पात होळकर पूल ते गाडगे महाराज पुलादरम्यान नदीपात्रातील काँक्रिट काढणे, होळकर पूल ते गाडगे महाराज पुलापर्यंत नदीच्या दोन्ही तिरावर बेसाल्ट, दिपस्तंभ, बोलार्ड, हायमास्ट, बसवणे; रामवाडी पूल ते होळकर पुलापर्यंत दरम्यान गोदावरी नदीच्या डाव्या तिरावर संरक्षक भिंत बांधणे, ओपन एअर रेस्टॉरंट व मीस्ट उभारणे, बोर्डेक्स मिरर, अ‍ॅम्फिथिएटर व लेजर शो, हेरिटेज वॉल, फ्लोटिंग जेट्टी व गोदापार्कचे सुशोभीकरण, संभाजी उद्यानाचे सौंदर्यीकरण, लेंडी नाला ते होळकर पुलापर्यंत डाव्या तिरावर गोदा वॉक वे, सुंदर नारायण मंदिर लगत पायर्‍या बसवणे आदी कामे करण्यात येत आहेत.

गोदा पार्क पूर्णत्वास

गोदा सौंदर्यीकरण कामामध्ये रामवाडी पुलाजवळ नाशिककरांचे आकर्षण ठरणारे गोदा गार्डन पूर्णत्वास आले असून, लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. गोदा पार्कच्या फाटकावर पाच दगडी पीलर, अ‍ॅम्फिथिएटर, वॉक वे, अ‍ॅक्युप्रेशर पाथवे, सायकल मार्ग, बोटिंगसाठी जेटी स्थानक, बबल जेट फाऊंटनमुळे पायर्‍यांवरून घळघळणारे पाणी, ओपन एअर रेस्टॉरंट व त्यापुढे दिवसा धुक्यासारख्या इफेक्ट येण्यासाठी उथळ तळे व याच तळयात बोर्डेक्स मिरर इफेक्टद्वारे ‘ओपन एअर रेस्टॉरंट’ची प्रतिकृती पर्यटकांचे केंद्र ठरणार आहे. पुराणातील विविध प्रसंग म्यूरल, शिल्पाद्वारे साकरले गेले आहेत. उद्यानातील रंगीत संगीत कारंजे आणि गुलाबांचे सुरेख ताटवे लक्षवेधी ठरणार आहेत. होळकर पुलाजवळील संभाजी गार्डनचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. अशा प्रकारे हरित, स्वच्छ, आध्यात्मिक क्षेत्र व नदी किनार्‍यांमुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरणार असून, गोदावरी नदीचे माहात्म्य व महत्त्व वाढून पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

रामकुंड ही तर नाशिकची ओळख. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्यादृष्टीने त्याला एक वेगळे महत्त्व आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने गोदावरी काठ व घाटांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. यामध्ये दगडी घाट, बोलार्ड बसवणे, बेसाल्ट पाषाण माध्यमातील दीपस्तंभ बसवणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. इतर काही कामे लवकरच पूर्णत्वाला येतील. काही कुंडातील काँक्रिटीकरण काढण्यात आले असून, इतर विकासकामेही सुरू आहेत. प्रकल्पामुळे गोदावरीचे सौंदर्य उजळून निघणार असून, पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

पंचवटी, बारा बंगला जलशुद्धीकरण

‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. एप्रिल २०२२ मध्ये पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणासाठी ‘स्मार्ट सिटी’ कंपनीने ‘विश्वराज एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड’या कंपनीला काम दिले. जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांची हे काम असून, कार्यारंभ आदेश दिल्यापासून ३० महिन्यांत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

गावठाण विकास योजना

शहरातील गावठाण विकासातून जुन्या नगरीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गावठाण भागात सिमेंट रस्त्यांची जवळपास ६५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. आता ’स्काडा मीटर योजना’, गावठाणात २४ तास पाणी, पं. पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण आणि ’गोदा प्रोजेक्ट’चे अंतिम काही टप्पे करणे बाकी आहेत.यासह ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत ’स्मार्ट स्कूल’चीही कामे अत्यंत वेगाने सुरू असून, केंद्र सरकारच्या ‘इकोनॉमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेक’ने ’स्मार्ट स्कूल’ स्पर्धेतील सर्वेक्षणात नाशिकमधील काठे गल्ली शाळा क्रमांक ४३ चा डिजिटल या कॅटेगरीत देशभरात दुसरा क्रमांक मिळाला आहे. या शाळेत आठ स्मार्ट पायलट क्लासरूम सुरू करण्यात आले. एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून शाळेला डिजिटल करून रूप पालटवण्यात आले. याची दखल केंद्र सरकारने घेऊन शाळेचा सन्मान केला आहे.

‘नमामी गोदा’

गोदावरी आणि उपनद्यांच्या प्रदूषण मुक्तीसह आगामी ३० वर्षांच्या ५० लाख लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील मलवाहिकांचे विस्तारीकरण, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण व क्षमतावाढ यांसारख्या विकासकामांच्या तब्बल दोन हजार कोटींच्या ‘नमामी गोदा’ प्रकल्प नाशिक महापालिकेतर्फे राबवला जात आहे.उत्तर भारतातील गंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी केंद्र शासनातर्फे ’नमामी गंगा’ प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्या धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ’नमामी गोदा’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रकल्पाकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू होती.


गोदावरी व उपनद्यांच्या काठावरील मलवाहिकांची क्षमतावाढ व सुधारणा करणे, नदीमध्ये मिसळणारे मलजल अडवून मलनिस्सारण केंद्रांकडे वळविणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे, नव्याने विकसित होत असलेल्या रहिवासी भागात मलवाहिकांचे जाळे निर्माण करणे, नदीघाटाचे सुशोभीकरण व संवर्धन, नूतनीकरण करणे, मलजल प्रक्रिया केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करणे आदी महत्त्वाच्या कामांचा ’नमामी गोदा’ प्रकल्पात समावेश आहे. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत या प्रकल्पाचा ’डिपीआर’ तयार होऊन तो शासनाकडे मंजुरीसाठी दिला जाणार आहे. आगामी कुंभमेळापूर्वी म्हणजे २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे.



प्रस्तावित ‘मेट्रो निओ प्रकल्प’

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करताना देशातील पहिली ’एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओ’ची घोषणा केली. २०२० मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी निधीची तरतूदही केली.मेट्रो निओ’साठी पहिल्या प्रस्तावानुसार सुरुवातीला दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार होते. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर दहा किमी लांबीचा होता, त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके प्रस्तावित होती. दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड असा २२ किमी लांबीचा असून, त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड अशी स्थानके होती. सीबीएस कॉमन स्थानक असून, या टायरबेस मेट्रोसाठी एकूण २९ स्थानके प्रस्तावित होते. याशिवाय, दोन फिडर कॉरिडोर आखण्यात आल्या. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे पॉईंट, मुंबई नाका दरम्यान चालेल, तर दुसरा नाशिक रोड, नांदूरनाका, शिवाजीनगर दरम्यान चालेल, असे नियोजन होते.


Development Project in Nashik


प्रायोगिक तत्त्वावरचा प्रस्ताव

सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड या १०.४४ किलोमीटर अंतरावर प्रायोगिक तत्त्वावर टायरबेस मेट्रो चालविली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासन १ हजार, १०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.दरम्यान, मेट्रो निओची फाईल केंद्रीय मंत्रिमंडळाकडे प्रलंबित असताना, राज्य शासनाने नाशिक रोड ते सीबीएस असा प्रायोगिक तत्त्वावर १०.४४ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याच्या परवानगीचा नवीन प्रस्ताव सादर केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार तरुण कुमार, तसेच केंद्रीय नगरविकासमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्याकडे नवीन प्रस्ताव सादर केला होता. त्यात राज्य शासनाकडून नाशिक रोड ते सीबीएस दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर टायरबेस मेट्रो प्रकल्प सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी राज्य शासनाने जवळपास १ हजार, १०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली.

’महामेट्रो’च्या आराखड्यानुसार, नाशिकच्या ‘मेट्रो निओ’साठी ३१ किलोमीटर लांबीचे दोन एलिव्हेडेट मार्ग तयार केले जाणार आहेत. या मार्गावर २५ मीटर लांबीची २५० प्रवासी क्षमता असलेली जोडबस धावणार आहे. प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार असून, महाराष्ट्र सरकार, सिडको आणि महापालिकेचा २५५ कोटींचा वाटा असे नियोजन होते. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, तर १ हजार, १६१ कोटींचे कर्ज यासाठी उभारले जाणार आहे. महापालिकेकडून निधीची तरतूद करण्याऐवजी मोफत जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे नियोजन जुन्या प्रस्तावात होते. हा प्रस्ताव जसाच्या तसा ठेवून पहिल्या टप्प्यात १०.४४ किलोमीटरचा टप्पा प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे. मूळ प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यातून प्रायोगिक तत्त्वावरील मार्गिका वगळण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यास अद्याप अवकाश असला, तरी तो पूर्ण होण्यासाठी सर्व प्रक्रिया वेगाने सुरू आहे.


- नील कुलकर्णी

अग्रलेख
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..