५० प्रवासी जखमी : चालकांच्या बेपर्वाईमुळे बीआरटी मार्गात अपघात
01-Aug-2023
Total Views | 508
पुणे : नगर रस्त्यावरील खराडी बायपास जवळ बीआरटी मार्गामध्ये पीएमपीएमएलच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास ५० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. या बसचे चालक आणि वाहक हे देखील जखमी झाले आहेत.
ही घटना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीएमपीएमएल'ची एक इलेक्ट्रिक बस आणि एक डिझेलवरील बस या बीआरटी मार्गांमधून जात होत्या. या बस अचानक समोरासमोर आल्या आणि एकमेकांना जोरात धडकल्या. बसमधून प्रवास करीत असलेले प्रवासी सीटवर व बसमधील रेलिंगवर जोरात आदळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रवाशांना तात्काळ खाली उतरवून उपचारांसाठी मिळेल त्या वाहनाने ससून रुग्णालयामध्ये हलवले. खराडी बायपास जवळ असलेल्या जनकबाबा दर्ग्याशेजारी ही घटना घडली. या बस समोरासमोर येऊन एकमेकांना इतक्या जोरात आदळेपर्यंत चालकांना कसे लक्षात आले नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेततेच्या बाबतीत त्यांनी गंभीर आणि अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे. या दोन्हीही बसेस आणि त्यावरील चालक हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले आहेत. यामधील कोणती बस विरुद्ध बाजूने मार्गात घुसली हे तपासण्यात येत आहे.