थेट काकांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या अजित दादांची अशी आहे, राजकीय कारकीर्द!

    03-Jul-2023
Total Views | 197
Ajit Dada
 
कालपासून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात अजित पवारांच नाव केंद्रस्थानी आलंयं. काल अजित पवारांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षाच्या ९ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. यात शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसलायं. सोबतच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुध्दा आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे शरद पवारांचं राजकारण सपल्यांच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीयं. त्यामुळेच आपण या लेखात देशाच्या राजकारणात कथित चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या विरुध्द बंड करणाऱ्या अजित पवारांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे जाणून घेऊयात.
 
अजित पवार यांचे वडिल अनंतराव पवार हे शरद पवार यांचे मोठे भाऊ. पवार कुटुंबात आधीपासूनच राजकीय वारसा होता. शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्य होत्या. पण शरद पवारांनी १९६७ साली काँग्रेच्या तिकीटावर निवडणुक लढवली. या निवडणूकीत अजित पवारांचे वडिल अनंतराव पवार यांनी शरद पवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
 
शरद पवारांनंतर राजकारणात पवार घराण्यातील दुसरे सदस्य राजकारणात आले ते म्हणजे अजित पवार. अजित पवारांच्या आधी शरद पवार वगळता पवार घराण्यातील कोणीही सक्रीय राजकारणात रस घेतला नाही. अजित पवारांनी राजकारणात प्रवेश घेतला तो १९८२ ला. पण त्यांना शरद पवारांनी १९९१ पर्यत मुख्य धारेच्या राजकारनापासून दुर ठेवलं.१९९१ साली पहिल्यांदा त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. आणि ती जिंकली. पण त्यांना अवघ्या तीन महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. यालाही कारण ठरले काकाच. राज्यात मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना केंद्रात संरक्षण मंत्री व्हायचं होत. यासाठी संसदेच सदस्य असणं आवश्यक होत. यामुळे पवारांनी आपल्याच पुतण्याला राजीनामा द्यायला लावून स्वत: बारामती मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली.
 
त्यांनतर अजित पवारांनी त्याचवर्षी पुन्हा बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतं विजय मिळवला. अजित पवार मागच्या ३२ वर्षापासून बारामती मतदार संघाचे आमदार आहेत. ही त्यांची आमदारकीची सातवी टर्म आहे. मागच्या निवडणूकीत ही त्यांच्याविरोधातील उमेदवारांच डिपॉजिट जप्त झालं होतं.आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्री करण्यात आलं. तेव्हा त्यांच्याकडे कृषी खातं होतं. शरद पवार केंद्राच्या सत्ताकारणात व्यस्त असतांना अजित पवारांनी आपला बारामती, पुणे, पिपंरी चिचवड येथे स्वातंत्र असा जनाधार निर्माण केला.
 
१९९३ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांनतर शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात परतले. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. काकांच्या मंत्री मंडळात अजित पवारांना ऊर्जामंत्री बनवण्यात आलं. १९९५ ला शरद पवारांचा पराभव होऊन. राज्यात भाजपा-शिवसेना युतीच सरकार आलं. त्यानंतर शरद पवारांनी १९९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. आणि काही काळातच त्यांना पुन्हा काँग्रेससोबत युती करत विलासराव देशमुखांच्या सरकारला पाठिंबा द्यावा लागला. या सरकारमध्ये सुध्दा अजित पवार जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाचे मंत्री होते.
 
२००४ पर्यत सर्व काही सुरळीत चालू होतं. पण २००४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर काका-पुतण्यात वादाची पहिली ठिणगी पडली. झाल असं की, २००४ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या. यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री या सुत्रानूसार अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक होते. पण शरद पवारांनी मुख्यमंत्री पद काँग्रेसला देण्याच ठरवलं. याला अजित पवारांनी विरोध केला. काही राजकीय जाणकार सांगतात की, अजित पवारांना मुख्यमंत्री पद देऊ नये अशी शरद पवारांची इच्छा होती. त्यामुळेच पक्षाचे आमदार जास्त असतांना सुध्दा शरद पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला नाही.
 
याचं काळात शरद पवार हे युपीएच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते. त्यांनी हे पद २००४ ते २०१४ पर्यत भुषवलं. पण या दहा वर्षाच्या काळातच अजित पवारांनी राज्यात राष्ट्रवादीची संघटन बांधणी केली. त्यांनी आपल्या विश्वासातील लोकांना संघटनेत महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. यावेळी त्यांच्या संघटन कौशल्याचे विरोधक पण कौतुक करत.
 
पण याचं काळात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना राजकारणात सक्रिय केलं. त्यांना २००६ मध्ये थेट राज्यसभेवर पाठवण्यात आलं. त्यानंतर २००९ मध्ये पवारांनी आपली बारामतीची जागा पण सुप्रिया सुळेंना देऊ केली. सुप्रिया सुळेंच राजकीय महत्व वाढवलं जात होत. पण सुप्रिया सुळे यांच्याकडे अजित पवार यांच्यासारखे संघटन कौशल्य नव्हत. यामुळे अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा मोठेच नेते राहिले.२००४ ते २०१४ या काळात अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पदाचा वापर राजकीय ताकद वाढवण्यासाठी केला. त्यामुळेच राष्ट्रवादीत अजित पवारांचे राजकीय वजन शरद पवारांपेक्षा जास्त आहे, असं जाणकार सांगतात.
 
२०१४ मध्ये आघाडीच सरकाराचा पराभव झाल्यानंतर अजितदादा विरोधी पक्षनेते बनले. तो पर्यत अजितदादा हे राष्ट्रवादीचे सर्वमान्य नेते झाले होते. पण त्याच्या प्रतिमेला धक्का बसला तो २०१९ ला. २०१९ मध्ये राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यात महाविकास आघाडी बनवण्यासाठी चर्चा सुरु होती. पण अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पण याला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी जाहीर केल. आणि अजित पवार यांनी बंडखोरी केली असल्याच त्यावेळी माध्यमांना सांगितल. पण तो बंड पुरता फसला. आता येवू थेट २०२३ ला. काही दिवासांपुर्वीच शरद पवारांनी अजित पवारांना डावलून सुप्रिया सुळे यांना पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष बनवल. एकार्थी पवारांनी उत्तराधिकाऱ्याची घोषणाच केली. यामुळे अजित पवार नाराज झाले. मागच्याच आठवड्यात २०१९ ला झालेला शपथविधीला पवारांचा पाठिंबा होता,असा दावा देवेंद्र फडवणीस यांनी केला. त्यांच्या या दाव्याला शरद पवारांनी देखील दुजोरा दिला. मग राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की,अजित पवारांना बदनाम करण्यासाठीच शरद पवारांनी २०१९ मध्ये राजकीय कट रचला होता. यामागे त्यांचा उद्देश अजित पवारांना अविश्वासू दाखवून सुप्रिया सुळे यांच्याकडं नेतृत्व द्यायच होत का?, असा प्रश्न ही आता उपस्थित होतो.
 
याच सर्व प्रकरणामुळे अजित पवार हे व्यथित होते. यासर्व प्रकारणाला कंटाळून त्यांनी आपल्याच काकांच्या विरोधात बंड करुन, राष्ट्रवादीचा खरा नेता कोण हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलायं. त्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवेल.
 
श्रेयश खरात
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121