मुंबई : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारात राष्ट्रवादी आमदारांसोबतच ९ मंत्रीपदासह कारभार सुरु केला असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी सदर आमदारांवर पक्षीय कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शिवाजीराव गर्जे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसे आदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहेत.
दरम्यान, जयंत पाटील बडतर्फ करताना म्हटले की, दि. २ जुलै, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी असून ही कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या सदस्यत्वावरुन व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असून त्यांनी पक्षाचे चिन्ह, नाव यांचा वापर करु नये असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. तसे आढळल्यास पक्षाकडून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.