सोनगाव : कोकणातील मगरींचे गाव...

    03-Jun-2023
Total Views | 150
ratnagiri

‘कांदळवन प्रतिष्ठान’मार्फत रत्नागिरीतील सोनगाव येथे ‘कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली आणि समितीमार्फत या गावातील लोकांना एकत्रित करून येथे ‘कांदळवन निसर्ग पर्यटन, सोनगाव‘ असे गट स्थापन करण्यात आले. त्यामुळे कांदळवनांच्या जैवविविधतेबरोबर येथे ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रमदेखील आहे. त्यानिमित्ताने सोनगावच्या जैवविविधतेचा परिचय करुन देणारा हा लेख...

जैवविविधतेने नटलेले आणि समृद्ध अशा वाशिष्ठी नदीच्या किनारी वसलेले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील एक लहानसं गाव म्हणजे सोनगाव. सोनगाव हे चिपळूण शहरापासून जवळ-जवळ १७ ते १८ किलोमीटर, तर खेड शहरापासून २४ किमी अंतरावर. तसेच लोटे या शहरातून अगदी सहा किमी इतके अंतर. तीन नद्यांचा संगम होऊन तयार झालेल्या खाडी पात्रावर वसलेले हे गाव. वाशिष्ठी नदी ही पश्चिम घाटातील तिवरे या गावातून उगम पावते आणि अरबी समुद्राला येऊन मिळते. भरतीच्या वेळी या नदीपात्रामध्ये खाडीचे पाणी आत येते आणि त्यामुळे या गावाला खाडी पात्रही लाभले आहे.

कांदळवनांच्या पर्यावरणीय परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धन, किनारपट्टी व सागरी परिसंस्थेतील लोप पावणार्‍या प्रजातींवरील संशोधन कार्यक्रम आणि शाश्वत उपजीविका उपक्रमांद्वारे किनारपट्टीलगत अधिवास करणार्‍या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन विभागाअंतर्गत २०१२ मध्ये ‘कांदळवन कक्षा’ची स्थापना केली. तसेच, त्याअंतर्गत ’महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान’ (कांदळवन प्रतिष्ठान) ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाअंतर्गत संस्था स्थापन करण्यात आली आहे. किनारी जैवविविधतेबरोबरच कांदळवनांचे संवर्धन आणि देखरेखीचेही कार्य ’कांदळवन प्रतिष्ठान’ करते. राज्य सरकारच्या ’कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजने’ची अंमलबजावणी करण्यासाठी ‘कांदळवन प्रतिष्ठान’ काम करते. याव्यतिरिक्त क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठानाकडून करण्यात येते.

महाराष्ट्र शासनाने २०१७ पासून महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ ही योजना सुरू केली. कांदळवन कक्षाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’मार्फत किनारी गावांमध्ये ‘कांदळवन समिती‘ स्थापन करण्यात आली आणि समितीमार्फत गावामध्ये गट स्थापन करून योजना राबवण्यात आल्या. ‘कांदळवन प्रतिष्ठान’मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील दहा हेक्टरपेक्षा जास्त कांदळवन क्षेत्र निवडण्यात यावे, असे घोषित करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील सोनगाव आणि बहिरवली या गावांची निवड करण्यात आली. त्यानंतर ‘कांदळवन प्रतिष्ठाना’च्या तज्ज्ञ लोकांची सोनगाव आणि बहिरवली गावात क्षेत्रभेट झाली आणि त्यामध्ये सोनगाव गावाचे भौगोलिक दृष्टीने अभ्यास करून हे गाव पर्यटनासाठी पूरक आहे, असे ठरवण्यात आले व अशाच प्रकारे कांदळवन कक्ष आणि ‘कांदळवन प्रतिष्ठान’ यांच्यामार्फत सोनगाव येथे ‘कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली आणि समितीमार्फत या गावातील लोकांना एकत्रित करून येथे ‘कांदळवन निसर्ग पर्यटन, सोनगाव‘ असे गट स्थापन करण्यात आले. पर्यटनासोबतच गावातील लोकांना रोजगार आणि कांदळवन संवर्धन करण्याचे काम सुरू झाले. या उपक्रमासाठी ९० टक्के अनुदान मिळाले.

गावांमधील स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यामध्ये कांदळ प्रजातींची ओळख, पक्षी प्रजातींची ओळख, पक्षीनिरीक्षणाचे तंत्र, किनारी आणि सागरी जैवविविधतेची ओळख, निसर्ग पर्यटनाची संकल्पना व त्यामधील तत्वे, स्थानिक पदार्थांना अधिक बाजारयोग्य बनवण्याचे प्रशिक्षण, तारका निरीक्षण आणि जीवरक्षण प्रशिक्षण, मोटर बोट चालक इ. उपक्रमांचा समावेश आहे. मिळालेल्या ९० टक्के अनुदानातून प्रकल्पासाठी लागणारे साहित्य खरेदी करून प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यामध्ये आठ आसनी मोटार बोट, दुर्बिणी, निसर्ग व पक्षी निरीक्षांसाठी पुस्तके, केटरिंगसाठी लागणारे उपयुक्त साहित्य पुरवण्यात आले. येणार्‍या पर्यटकांना ग्रामीण संस्कृती विषय कुतूहल असते, या गोष्टींचा विचार करून या गावातील स्थानिक लोकांनी ‘होम स्टे’ असा उपक्रमही सुरू केला. पर्यटकांना ग्रामीण ठिकाणी राहण्याची दर्जेदार सुविधा उपलब्ध करून सोनगावच्या पर्यटनास चालना मिळेल व स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. असा हेतू समोर ठेवून स्थानिकांनी उपक्रमास सुरुवात केली. येथे पर्यटनअंतर्गत मगर सफारी, कांदळवन सफारी, निसर्ग भ्रमंती आणि त्याचबरोबर पक्षीनिरीक्षण व ‘होम स्टे’ असे उपक्रम राबवले जातात.

निसर्ग पर्यटनामध्ये येणार्‍या पर्यटकांना कांदळवन सफारी व सोनगावला आकर्षित करणारे मुख्य अशी जैवविविधतेचा भाग म्हणजे मगर. या गोड्या पाण्याच्या खाडीमध्ये भरपूर प्रमाणात मगरींचे सहजच दर्शन होते. ‘मार्श क्रोकोडाईल’ या प्रजातीची मगर आपल्या या खाडीमध्ये दिसून येते. या मगरी कांदळवनामध्ये राहतात व त्याच ठिकाणी घरटी बांधतात. एकंदरीत पाहिले तर मगर पाहण्यासाठी लोक चेन्नईची निवड करत असत. परंतु, आपल्या महाराष्ट्रामध्ये ही काही ठिकाणी मगरीचे सहज दर्शन होते. त्यापैकी एक म्हणजे सोनगाव. म्हणूनच ‘मगरीचे गाव‘ म्हणून या गावाला एक नवी ओळख मिळाली आहे. ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. अशी ही मगर हा घटक सोनगावच्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण आहे.

सोनगावच्या या वाशिष्ठी नदीचे पात्र हे कांदळवनाच्या वनस्पतीने अगदी सजलेले आहे. तसेच इतर जैवविविधतासुद्धा त्या पात्राला लाभली आहे. जसे की, स्थानिक पक्ष्यासंहित स्थलांतरित पक्षी हे सोनगावच्या जैवविविधतेचा आस्वाद घ्यायला जरूर येतात. मग त्यामध्ये उघड्या चोचीचा करकोचा, काळ्या डोक्याचा शराटी किंवा मग तो कैकर असो, असे अनेक पक्षी भेट देतात. या खाडीत साधारणतः पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी दिसतातच. पण, ‘वूली नेक्ड स्टॉर्क‘, ‘ओरिएंटल हनी बझार्ड‘, ‘लिटल रिंग प्लोव्हर‘, ‘प्लेन प्रिनिया‘, ‘अ‍ॅशी प्रिनिया‘, ‘लिटिल स्टिंट‘, ‘कॉमन आयोरा‘, ‘सिट्रिन वॅगटेल‘, ‘ब्लॅक हेडेड आयबीस‘, ‘कॉमन रेडशॅक‘, ‘चेंजेबल हॉक इगल‘, ‘ब्राह्मणी काइट‘, ‘पेंटेड स्टॉर्क‘, ‘जांभळी पाणकोंबडी‘, ‘आयबीस‘, ‘डार्टर‘, ‘हेरॉन‘ आदी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शनही इथे होते.

उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे कांदळवन. कांदळवन निसर्ग पर्यटन हे स्थानिक समुदायांसाठी उपजीविकेचे साधन आहेच. सोबतच कांदळवन अधिवासाबद्दल जनजागृती निर्माण करण्यास मदत करते. सोनगावमध्ये एकूण कांदळवनाच्या सात प्रजाती पाहायला मिळतात. परंतु, येणार्‍या पर्यटकांना आकर्षित करेल अशी एकमेव प्रजाती आपल्याला सोनगावच्या नदीपात्रात पाहायला मिळते ते म्हणजे ‘कांदळ‘ ही प्रजात. तिचे शास्त्रीय नाव ‘कँडेलिया कँडेल‘ आहे. (घरपवशश्रळर लरपवशश्र) सदाहरित छोटे वृक्ष आहे. खोडाचा आकार अगदी जमिनीलगत मोठा. साल पांढर्‍या रंगाची व पाने अगदी नाजूक, चकचकीत व गडद हिरवी. फुले पांढरी व रेखीव. शेंगा नाजूक, गुळगुळीत, टोकदार व १५ ते २० सेमी लांब आधारमुळे जास्त पसरलेली नसतात. नदीच्या पात्राचे दोन्ही काठावर अगदी तटरकक्षकाच्या भूमिकेत डौलदार उभे असलेले पाहायला मिळतात आणि हे दृश्य सोनगावमध्येच आपल्याला बघायला मिळते. खाडीमध्ये डौलदार आणि रुबाबात उभे असलेल्या कांदळवन वृक्षांचे म्हणजे ‘कँडेलिया कँडेल‘ या प्रजातीच्या वनस्पतीचे प्रतिबिंब खाडीच्या काठाची शोभा वाढवते. शांत आणि मोठ्या प्रमाणात पसरलेला खाडीचा काठ आपले मन अगदी भारावून टाकते. गावातील स्थानिकांनी या प्रजातीच्या रोपवाटिका तयार केल्या होत्या व तीन हेक्टरमध्ये १३ हजार, ३२० रोपांची लागवडसुद्धा शासनाच्या मदतीने केले होती. या रोपवाटिकेतून त्यांना पुरेसा रोजगारसुद्धा प्राप्त झाला.

तसेच, लहान-लहान बेट आणि त्या बेटांचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब हे इथे भेट देणार्‍या प्रत्येकाला आठवणीत ठेवण्यास भाग पाडेल असेच आहे. ही वैशिष्ट्येे डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सोनगाव येथील शांतता आणि अमाप नटलेल्या निसर्गाचा आस्वाद घेतल्यास, निसर्गाच्या अनमोल खजिन्यात आपण आलो आहोत, याचा आनंद मनाला मिळू शकतो. वाशिष्ठी नदीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं आहे आणि हे सौंदर्य जपण्याचे काम किनार्‍यालगत राहणारे येथील स्थानिक लोक करीत आहेत. अनेक पर्यटक या उपक्रमाला भेट देतात. तसेच, शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी ‘कांदळवन निसर्ग पर्यटन, सोनगाव‘ची निवड केली जाते व त्यामुळे मुलांना शिक्षण आणि जनजागृती अशा दोन्ही गोष्टी येथे अनुभवायला मिळतात.

मनसोक्त संचार करणार्‍या मगरी आणि केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे व हे सर्व दृश्य जवळून अनुभवायचे असेल, तर सोनगावला जरूर भेट द्या. चला तर मग आपण सर्वांनी या कांदळवन सफरीचा आनंद लुटण्यासाठी आणि सोनगाव गावातील ग्रामीण संस्कृती आणि लोकजीवनाचा सुंदर अनुभव घेण्यासाठी सोनगाव कांदळवन निसर्ग पर्यटनाला आवश्यक भेट द्या..

क्रांती मिंडे
(लेखिका कांदळवन प्रतिष्ठानच्या प्रकल्प समन्वयक आहेत.)
(कांदळवन सफारीसाठी संपर्क क्र.: +९१८४२१९९२७२४ +९१९६२३९९९१६२)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121